उपजतच कलेचा वारसा लाभलेले व आंबेडकरी चळवळीत गीतगायनाच्या माध्यमातून समाज सेवेचे व्रत अंगिकारून जनजागृती करत आंबेडकरी विचाराची पेरणी करणारे नांदेडच्या रविवारपेठ इतवारा भागातील पहिले आंबेडकरी गायक म्हणून कालवश विठ्ठलराव जोंधळे यांच्या कार्याची नोंद अग्रक्रमाने घ्यावीच लागते.
1960 -1974 च्या दशकातील समाज प्रबोधनाचा धनी असलेला हा गुणी कलावंत.फारसे शिक्षण नसलेला पण स्वरात हातखंडा असलेला,आवाजाचा जादुई किमयागार,हरहुन्नरी गायक कलावंत म्हणून विठ्ठलराव जोंधळे यांचा नावलौकिक होता. त्यांचे गीतगायन ऐकण्यासाठी लोकांची तुफान गर्दी असायची. त्यांचे खास वैशिष्ठय असे की ते हार्मोनियम मांडीवर ठेवून डाव्या हाताने वाजवून गीतगायन करायचे. हार्मोनियमच्या मंद्र,मध्य व तार अशा तिन्ही सप्तकात त्यांचा आवाज सहजपणे चालायचा.अतीशय गोड,सुमधुर आणि तेवढाच उंच असा आवाज होता.तयामुळे भजनी मंडळात त्यांच्या मागे गीताचा कोरस करण्याची इतर सहकलाकाराची हिम्मत होत नसे.असे त्यांच्या सोबतचे सहकारी कलावंत गायक सुनील जोंधळे आज ही सांगतात.
रविवारपेठ इतवारा भागात त्यांची "दिनबंधू"नावाची गायन पार्टी होती.या गायन पार्टीत त्यांच्या सोबतीला नारायणराव सोनकांबळे टेळकीकर हे झांज वाजवत असत. झांज वादनात ते फारच तरबेज होते.त्यांची झांज वादनाची कला एखाद्या नृत्येकेच्या पायातील घुंगराचा जसा आवाज येतो,तसा त्यांनी वाजवलेल्या झांजचा आवाज यायचा. गायन पार्टीत सहकलाकार म्हणून गायक सुनील जोंधळे,रमेश जोंधळे, प्रकाश जोंधळे,कपिल जोंधळे आदी कलावंत मंडळी असायची.जस-जशी रात्र होत असे,तस-तशी कार्यक्रमात खूपच रंगत येत असे.गायन ऐकण्यात रसिक मंत्रमुग्ध होत.रात्र जावून सकाळ कधी झाली हे समजायचे देखील नाही.
गायन पार्टीत महाकवी वामनदादा कर्डक,दिनबंधू, लक्ष्मण राजगुरू,बाबादलितानंद,विदर्भातील कवी मधूरत्न डोंगरे आदी गीतकरांचे गीत ते आवडीने गात असत. वामनदादा कर्डक यांचे "तुझीच कमाई आहे ग भीमाई"हे गीत विठ्ठलराव जोंधळे यांच्या अतिशय आवडीचे होते. हे गीत देहभान विसरून अतिशय तल्लीन होवून बेंबीच्या देठापासून गात असत.त्यामुळे लोक रात्रभर जागचे उठत नसत.त्यांच्या गीत गायनाने लोक खूप प्रभावित होत असत. हे दुर्मिळ गीत लोकांच्या संग्रही राहावे म्हणून मी या ठिकाणी उधृत करीत आहे.
तुझीच कमाई आहे ग भीमाई !
कुणाचेच काही इथे कष्ट नाही!!धृ!!
लाभले ना जेथे प्यावयास पाणी !
ज्ञानाची धारा अशा माळरानी !
तुझ्याच प्रतापे आणलीस आई !!१!!
वाळून ज्यांची पाने गळाली !
घालून पाणी आशा फुलविली !
फुलवून गेली तूच ठायी-ठायी !!२!!
कालचे रिकामे आजचे निकामे !
जगतात आड तुझियाच नामे !
इथे गीत "वामन" खरे तेच गायी !!३!!
एका-पेक्षा एक अशी सरस प्रेरणादायी गीते त्या काळी विठ्ठलराव जोंधळे यांनी गायली आहेत.आताच्या पिढीला अशा कलावंताची ओळख नाही,नव्या पिढीला त्यांचा परिचय व्हावा असा कुणी प्रयत्न ही केला नाही.ही फार मोठी सामाजिक खंत वाटते.ज्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार परिवर्तनाचे वादळ सुरू होते,अशा काळात विठ्ठलराव जोंधळे यांनी घरादाराची पर्वा न करता सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात समाज प्रबोधनासाठी स्वतःला झोकून दिले होते. नांदेड शहरासह धनेगांव,वाजेगांव,बाभूळगाव,शिराढोण, उस्माननगर,कलंबर, मंगल सांगवी,काकांडी,आदी गावो-गावी अतिशय तळमळीने समाज कार्य नेटाने सुरूच ठेवले.त्यांचे हे कार्य नव्या पिढीला आदर्श असेच आहे.
शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृह असायचे.वसतिगृहाचे संचालक चोखोबा पैलवान,रघुनाथ सावते गुरुजी,चोखोबा निवडंगे ही मंडळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शिक्षणा सोबतच भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख होवून त्यांना प्रेरणा मिळावी या करिता विठ्ठलराव जोंधळे यांच्या गीतगायनाचे कार्यक्रम आवर्जून ठेवायचे.आपल्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना ते शिक्षणाचे महत्व समजावून सांगायचे.
डॉ.बाबासाहेबांच्या पश्चात दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर खोब्रागडे,बी.सी.कांबळे अशा वेगवेगळ्या गटात आंबेडकरी चळवळ विभागल्या गेली. शेगावचे गीतकार दिनबंधू यांचं गीत आपल्या पहाडी आवाजात विठ्ठलराव जोंधळे अतिशय जोशपूर्ण आवाजात गीत गायचे. तेंव्हा लोक अंतर्मुख व्हायचे.
हाकारूनी सांगतो साऱ्या जगाला !
समाजाचा घात माझ्या दादूल्यानं केला !!धृ!!
ज्या लोकांनी समाजापासून व चळवळीपासून दूर राहाण्याचा प्रयत्न केला.अशा लोकांना दिनबंधू यांनी लिहिलेल्या गीतातून विठ्ठलराव जोंधळे सांगायचे....
यारे दांभिकांनो चटक चांदण्यात !
दावा भीम जगता चटक चांदण्यात !
गीतकार लक्ष्मण राजगुरू यांनी लिहिलेलं वीर रसातील स्फूर्ती गीत विठ्ठलराव जोंधळे आपल्या पहाडी आवाजात खूपच छान गात असत.तेंव्हा लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळायचा.....
चमचमचम तलवारीसम धाव रणी घे मर्दा !
तू शूर सैनिक भीमाचा चल चल चल !!
अशी वीररसाची तर कधी करुणरसाची स्फुर्तिदायकआणि तेव्हढीच प्रेरणादायी गीते ते
कोणत्या ही मानापाणाची किंवा मानधनाची अपेक्षा न करता. रात्रभर गात असत.
विठ्ठलराव जोंधळे यांना आपल्यातुन जावून किमान पंचवीस वर्षाचा काळ लोटला आहे.परंतु त्यांनी त्यांच्या काळात गीत गायनाच्या माध्यमातून भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समाजमनात रुजविण्याचे जे काम केले आहे ते नक्कीच प्रेरणादायी असून विसरण्याजोगे नाही.विठ्ठलराव जोंधळे आज आपल्यात नाहीत,परंतु नांदेडच्या आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीत त्यांचे पाहिले स्थान आहे. नव्या पिढी करिता त्यांचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे आणि राहील.त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !
-सदाशिव गच्चे
No comments:
Post a Comment