किनवट तालुक्यात 75.98 टक्के रब्बीची पेरणी गतवर्षीप्रमाणे यंदाही हरभरा पिकास प्राधान्य - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 21 November 2021

किनवट तालुक्यात 75.98 टक्के रब्बीची पेरणी गतवर्षीप्रमाणे यंदाही हरभरा पिकास प्राधान्य

किनवट,  : यंदाच्या वर्षी झालेला दमदार पाऊस, तालुक्यातील एकूण 21 जल प्रकल्पांत झालेला उपयुक्त पाणी साठा तसेच याच आठवड्यात चार दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने जमिनीत झालेल्या भरपूर ओलाव्यामुळे शेतकर्‍यांनी यंदाच्या रब्बी हंगामात गतवर्षीचीच री ओढून सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी केली आहे. किनवट तालुक्यात आतापर्यंत 7 हजार 411 हेक्टरवर 75.98 टक्के रब्बीपिकांची पेरणी झाली असून, यात केवळ हरभर्‍याची 5 हजार 903 हेक्टरवर पेरणी झालेली आहे.


           किनवट तालुक्यात बोधडी, जलधरा, इस्लापूर, शिवणी, दहेली, उमरीबाजार, सिंदगी मोहपूर, मांडवी व किनवट अशी 9  महसुल मंडळे असून, तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 1 लाख 56 हजार 753 .68 हेक्टर आहे. किनवट तालुक्यात बागायत वा सिंचन क्षेत्र हे खरीप क्षेत्राच्या केवळ पाच टक्क्याच्या आसपास असल्यामुळे, कोरडवाहू पिकेच जास्त घेतली जातात. त्यामुळे कृषी विभागाच्यावतीनं  तालुक्यात यंदा 9 हजार 754  हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचं नियोजन केले गेले होते. खरीप हंगामातील अतिवृष्टी,पूरपरिस्थिती व परतीच्या पावसाने कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद आदीपिकांचे अतोनात नुकसान झाले. याचा  शेतकर्‍यांना जबर आर्थिक फटका बसल्यामुळे हतबल झाले होते. मात्र काही प्रमाणात मिळालेला पीकविमा परतावा सोबतच शासनाच्या मदतीची  घोषणा झाल्यामुळे त्यांना थोडाफार दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे खरीपाचे घाव विसरून तो कशीबशी पैशाची तजवीज करून रब्बी   हंगामाची आशा घेऊन सज्ज झालेला आहे. कारण उत्पादन मिळो अथवा न मिळो शेतकर्‍यांना कष्टाशिवाय पर्यायच नसणे हेच त्याचे विधिलिखित आहे.


      शेतकर्‍यांनी यंदाच्या रब्बी हंगामात गव्हापेक्षा हरभर्‍याच्या पिकाला पसंती दिल्याचे पेर्‍यावरुन दिसून येते. हरभरा पिकाला येत असलेला कमी खर्च व त्यातून मिळणारे अधिक उत्पादन तसेच सिंचनासाठी लागणारे कमी पाणी यामुळे हरभर्‍याच्या नियोजित क्षेत्रापेक्षा पेरणीत आतापर्यंत 18.87 टक्के वाढ झाल्याचे दिसते. मात्र तृणधान्यातील  रब्बी गहू, ज्वारी व  मका यांच्या सर्वसाधारण लागवड क्षेत्रात मात्र कृषी विभागाच्या नियोजनापेक्षा कमी पेरणी झालेली आहे. गळीत धान्यातील करडई,   सूर्यफूल, जवस, मोहरी या पिकांना मात्र शेतकर्‍यांनी पूर्णपणे फाटा दिलेला असून, रब्बी तीळ केवळ चार हेक्टरवर तर रब्बीतील सोयाबीनची 2 हेक्टरवर पेरणी झालेली आहे.


     तालुक्यात यंदा कडधान्यामध्ये हरभर्‍यासाठी 4 हजार 966 हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी होते. मात्र शेतकर्‍यांच्या पसंतीमुळे यंदा आतापर्यंत 5 हजार 903 हेक्टर क्षेत्रावर हरबरा पेरला गेला आहे. तृणधान्यात रब्बी गहू लागवडीच्या क्षेत्राचे नियोजन 2 हजार 358 हेक्टर होते. मात्र प्रत्यक्षात 689 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. रब्बी ज्वारीसाठी 1 हजार 667 हेक्टर क्षेत्राचे नियोजन असतांना त्यात 80 टक्के  घट होऊन फक्त  334  हेक्टरवर यंदा रब्बी ज्वारी पेरल्या गेली आहे. रब्बी मक्यासाठी 741 हेक्टर लागवडीचे क्षेत्र असतांना, केवळ  335 हेक्टरवर मक्याची लागवड झालेली आहे. ज्वारी व मका पिकांची झालेली लागवड शेतकर्‍यांनी उन्हाळ्यात पशूंच्या चार्‍याच्या सोयीसाठी   केलेले नियोजन वाटते. तालुक्यात यंदाच्या रब्बी हंगामात आतापर्यंत केवळ 49 हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड झालेली असून, कोथिंबीर (धने) 9 हेक्टरवर पेरल्या गेली आहे. यंदा केळीची लागवड  अजून झालेली नाही.  ऊसाची लागवड  फक्त 5 हेक्टरवर झाली असून, कांद्याची लागवड करण्यात आली नाही.  डिसेंबर महिन्याअखेर पर्यंत रब्बीची पेरणी चालू राहणार असून, अंतीम पीक पेरणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच, तालुक्यातील रब्बीच्या पेरणीचे चित्र स्पष्ट होईल.

No comments:

Post a Comment

Pages