तूर पिकावर कोरडी मूळकूज व मर रोगाचा प्रादुर्भाव किनवट तालुक्यातील परिस्थिती ; 50 टक्क्यापेक्षा जास्त नुकसानीची शक्यता - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 28 December 2021

तूर पिकावर कोरडी मूळकूज व मर रोगाचा प्रादुर्भाव किनवट तालुक्यातील परिस्थिती ; 50 टक्क्यापेक्षा जास्त नुकसानीची शक्यता

किनवट, दि.28 : अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस हातचे गेल्यानंतर आता मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे तुरीचे पीक धोक्यात आल्याने, तालुक्यातील शेतकरी चिंतातूर झाले आहेत. ‘फायटोप्थोरा ब्लाईट’ कोरडी मूळकूज आणि मर रोगाच्या संयुक्त प्रादुर्भावामुळे गुणात्मक  आणि संख्यात्मक  नुकसान 50 टक्क्यापेक्षा जास्त होण्याची शक्यता तालुका कृषी कार्यालयातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.


    किनवट तालुक्यातील तूर पिकाचे लागवडीखालील सरासरी सर्वसाधारण क्षेत्र 6 हजार 564 हेक्टर असून, प्रत्यक्षात 6 हजार 796 हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झालेली आहे.   तालुक्यात मागील काही वर्षापासून एकाच जमिनीवर वर्षानुवर्षे तूर पीक घेण्यात येत असून, बियाण्यासाठी स्थानिक जातीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. तसेच खरीप हंगामातील सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर पिकावर मोठ्या प्रमाणात ‘फायटोप्थोरा ब्लाईट’ खोडावरील करपा आणि मर या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यात ऑक्टोबर महिन्यातच पोषक वातावरण तयार झाले होते. या रोगाचे दृश्यपरिणाम नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात दिसायला चालू झाले. तसेच या दोन रोगाबरोबरच नोव्हेंबर महिन्यात हलक्या ते मध्यम जमिनीत ओलाव्याचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळे आणि जमिनीचे तापमान वाढल्यामुळे  तूर पिकावर (ड्रायरूट रोट )कोरडी मुळकुज रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत गेला. प्रामुख्याने याचे कारण म्हणजे लागवडीपूर्वी बीजप्रकिया न केल्यास तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. जमिनीत याची बुरशी असते आणि मुळाच्या माध्यमातून याचा प्रसार होतो. परिणामी, झाडाची अन्नशोषण प्रक्रिया थांबून झाड वाळते.  सदर रोगाच्या प्रादुर्भावाची तीव्रता हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये जास्त आढळून आलेली आहे. सध्या भारी जमिनीत सदरील रोगाचा प्रादुर्भाव तुलनात्मकदृष्ट्या कमी आढळून आला ; परंतु येत्या काही दिवसात सदर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असल्याचे तालुका कृषी विभागाने सांगितले आहे.


    तालुका कृषी कार्यालयाने सुचविलेल्या या रोगावरील दूरगामी करावयाच्या उपाययोजनेंतर्गत एकाच शेतामध्ये तूर पिकाची लागवड करणे थांबवून, पिकाची फेरपालट करत राहणे अत्यंत आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती जशा बीडीएन 711 आणि बीडीएन 716 इत्यादी आधुनिक जातीचा वापर करावा. पुढील वर्षी पेरणीपूर्वी बियाण्याला  चांगल्या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. तूर पिकात पुढील वर्षी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात ज्या वेळी जमिनीत चांगला ओलावा असेल तेव्हा ट्रायकोडरमा किंवा बायोमिक्स यांची पाण्यातून ड्रेंचिंग आळवणी करावी. तुरीच्या खोडावर फायटोप्थोरा ब्लाईट राखी कलरचे ठिपके दिसतात तेव्हा मॅटॅलॅक्झील 4 टक्के आणि मेन्कोझेब 64 टक्के (रिडोमिल गोल्ड) 25 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यातून फवारणी करण्याची शिफारस शेतकर्‍यांना करण्यात आली आहे.

  यापुढे शेतकर्‍यांनी एकाच जमिनीत वारंवार तूर पीक घेण्याचे टाळावे. तसेच  बीज प्रक्रिया केल्याशिवाय तूर पिकाची पेरणी करू नये.

मुनेश्वर बी. आर.

मंडळ कृषी अधिकारी, किंनवट

1 comment:

  1. मुनेशवर सरांनी तुर या पिकाबददल चांगली माहीती दिली निश्चित शेतकरयांना फायदेशीर ठरते.

    ReplyDelete

Pages