किनवट, दि.03 : गत 40 वर्षापासून वास्तव्य असलेल्या गांधीनगरातील 26 गरीब कुटुंबाची घरे कुठलीही पूर्वसूचना न देता आणि पुनर्वसनाची व्यवस्था न करता अतिक्रमणाचे कारण देऊन पालिकेतर्फे 30 नोव्हेंबर रोजी बुलडोजरने जमीनदोस्त करण्यात आली. या उघड्यावर आलेल्या कुटुंबियांना त्वरीत त्यांच्या घराचा मोबदला देऊन, त्यांना निवारा बांधून देण्यात यावा, अन्यथा येत्या 4 जानेवारी पासून लोकशाही मार्गाने विविध प्रकारे आंदोलन व चक्री उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा विस्थापित कुटुंबांच्यावतीने अॅड. आकांक्षा आळणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात नमूद केले की, नगरपरिषद हद्दीमध्ये 40 वर्षापासून वास्तव्य करत असलेली ही कुटुंबं गत अनेक वर्षापासून पालिकेचा मालमत्ता कर भरतात. तसेच पालिकेनेही या भागात शौचालय, नळाद्वारे पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा ह्या मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्यात. सदर क्षेत्र अतिक्रमित होते तर पालिकेने सार्वजनिक सुविधा कशा उपलब्ध करून दिल्यात? असा प्रश्न उपस्थित करून गांधीनगरचे क्षेत्र हे नगरपालिकेच्या मालकीचे नसून आजमितीसही वनविकास महामंडळाच्या मालकीचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. पालिकेने जमिनीचे हस्तांतरण न करता डीपी प्लानचा हवाला देत या गरीबांच्या घरावर बुलडोजर फिरविले हे माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे म्हटले आहे. घरे पाडण्यापूर्वी पालिकेने या कुटुंबांच्या पुनर्वसनाची सोय करणे आवश्यक होते. त्यांना कुठलाही मोबदला न देता त्यांच्या मुलांबाळांसह कुडकुडत्या थंडीत समतानगर येथील एका रिकाम्या भूखंडावर बेवारस सोडून दिले. प्रशासनाकडून नंतर या कुटुंबांना हक्काची जागा किंवा घराचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही त्याच्या पूर्ततेसाठी कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. परिणामी हे विस्थापित गरीब कुटुंब खुल्या टेन्टमध्ये रहात आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन या कुटुंबांच्या निवार्याची कायमची सोय करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन व बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिलेला आहे. निवेदनावर अॅड.आकांक्षा आळणेसह इतर विस्थापित कुटुंबातील 35 नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत. निवेदनाच्या प्रतिलिपी सर्व संबंधित विभाग प्रमुखांकडे पाठविण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment