किनवट,दि.02 (प्रतिनिधी) : खावटी योजनेअंतर्गत कीड लागलेल्या डाळी तसेच मुदत संपलेले मसाले,मिरची व खाद्य तेलाचे वाटप करून गोर गरीब आदिवासींच्या जीवाशी खेळणार्या संबंधित अधिकारी व ठेकेदारावर त्वरित कठोर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार कमठाला भाजपा आदिवासी मोर्चा ग्रामीणचे जिल्हाउपाध्यक्ष जितेंद्र कुलसंगे व कमठाला ग्रा. प. चे माजी सदस्य अशोक नैताम यांनी राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे केली आहे.
तक्रारीत नमूद केले आहे की, आदिवासी विभागाकडून शबरी महामंडळामार्फत गोरगरीब आदिवासी कुटुंबांना खावटी योजनेतून अन्नधान्याचे ‘कीट’ देण्यात येते. या ‘कीट’मध्ये विविध प्रकारच्या डाळी, मसाले, कडधान्य व खाद्यतेलाचा समावेश आहे. दि. 22 जानेवारी रोजी किनवट तालुक्यातील कमठाला या गावात आदिवासी कुटुंबांना आधार कार्डच्या आधारे या खावटी धान्य ‘कीट’चे वितरण करण्यात आले. परंतु धान्याची ‘कीट’ उघडून बघितल्यानंतर मसाल्याच्या पदार्थात अळ्या आणि चवळी, तूरडाळ, मटकी, चना इत्यादी कडधान्याला कीड लागलेली दिसून आली. तसेच मसाले, चटणी व खाद्यतेल हे मुदत संपलेले असल्याचे दिसून आले.
हे अन्नधान्य खाण्यास योग्य नसून याच्या सेवनामुळे गोरगरीब आदिवासी कुटुंबांना विविध आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर विषबाधा होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदिवासी विभाग तसेच शबरी महामंडळातील अधिकारी व ठेकेदाराने या योजनेत गैरव्यवहार करण्याच्या उद्देशाने निकृष्ट व मुदतबाह्य धान्याच्या ‘कीट’ आदिवासी लाभार्थ्यांना वितरित करून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केल्याचा आरोप जितेंद्र कुलसंगे व अशोक नैताम यांनी तक्रारीत केला आहे. याप्रकरणी तात्काळ चौकशी करून संबंधित दोषी अधिकार्यांसह ठेकेदारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. तसेच कमठाला गावासह तालुकाभर वितरित करण्यात आलेल्या खावटी योजनेतील अन्नधान्य ‘कीट’ची अन्न व औषध विभागाकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे.
No comments:
Post a Comment