जगातल्या कुठल्याही कुशल आणि यशस्वी नेतृत्वाचा पाया दोन गोष्टीवर आधारित आहे एक म्हणजे शिक्षण आणि दुसरी म्हणजे विद्यार्थी नेतृत्वाची पार्श्वभूमी. कारण शिक्षण हे सर्व परिवर्तनाचे द्वार आहे.तर विद्यार्थी चळवळ ही क्रांतिची बीजपेरणी .ज्यात प्रवेश केल्यानंतर व्यक्ती, कुटुंब समाज,राष्ट्र या सर्वांच्या विकास वाटा आपोआपच समृद्ध होतात. पण शिक्षण हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच त्यातील आव्हानेही जिकिरीची आहेत. कारण ज्या अर्थी शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, गोरगरीब तळागाळातील व्यक्ती हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असायला हवा. पण धनदांडग्यांच्या बाजूने रेंगाळणारी शिक्षण व्यवस्था इथल्या सामान्य ,दलित, पीडित, दुर्लक्षित, मागासवर्गीय, तळागाळातील, लोकांचे हक्क नाकारते .तरीही शिक्षण महत्त्वाचे. कारण शिक्षणाने माणूस जागृत होतो. तर उच्चशिक्षणाने त्यावर आवाज उठवतो. या सर्वांची जाणीव करून देते ती चळवळ. म्हणून प्रत्येक विद्यापीठात व महाविद्यालयात चर्चा, चळवळी, संघटन, डिबेट, निनादले पाहिजेत. शिक्षणव्यवस्थेत जेवढ्या समस्या आढळतात तेवढ्याही त्या व्यक्तीच्या न्याय, हक्क, अधिकाराशी निगडित आहेत. अशा अनेक समस्यांचे समाधान करण्यासाठी विद्यार्थी संघटन आणि त्यांचे नेतृत्व महत्त्वाचे असते. चळवळी अनेक प्रकारच्या असतात . पण विद्यार्थी चळवळी सारखी प्रभावी अन्य कुठली चळवळ नाही. म्हणूनच बहुदा देशाच्या राजकारणात ध्येय धोरणात जे काही शिजत त्या चुलीला आग देण्याची ठिणगी विद्यापीठातूनच पेटते. पण जी ठिणगी न्यायासाठी, शिक्षणासाठी, समतेसाठी, हक्क, अधिकारासाठी ,आरक्षण, शिष्यवृत्ती, विचारधारा या सामाजिक न्यायासाठी आगेकूच करणारी असेल तर ती एक मानवी लढा बनते. अशाच लढ्याचा राष्ट्रीय चेहरा म्हणजेच विद्यार्थी नेतृत्वाचा न्यायिक आशावाद डॉ.डी. हर्षवर्धन हे होय.नॅशनल एससी, एसटी, ओबीसी, स्टुडन्ट ,अँड युथ फ्रंट अर्थातच नसोसवायएफ हे युवा व विद्यार्थी यांचं देशातील एक मोठं संघटन आहे. त्याचे संस्थापक निवृत्त आय आर एस डॉ. उदित राज हे असून याची यशस्वीपणे धुरा सांभाळणारे डॉ. डी.हर्षवर्धन हे दिवसेंदिवस राजकारण ,शैक्षणिक धोरणे, सामाजिक न्याय, लोकशाही, संशोधन, आरक्षण ,शिष्यवृत्ती, या सर्व प्रश्नावर आवाज उठवत व्ययावस्थेचं दुखणं होत आहेत.डॉ.डी. हर्षवर्धन यांच्यावर वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच आंबेडकरी विचार,संस्कृती,संस्कार झालेत.वडील किशनराव दवणे यांना आंबेडकरी संस्काराचा कमालीचा लळा.त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात ते डी. हर्षवर्धन यांना सोबत घेऊन जायचे .तर कधी स्वतःला वेळ नसेल हर्षवर्धन यांना पाठवायचेच. डॉ. यशवंत मनोहर, राजा ढाले यासारख्या अनेक साहित्यिक ,विचारवंत या सगळ्यांचा परिणाम डॉ. हर्षवर्धन यांच्या मनावर होत गेला. पुढं त्यांच्यातला तो जागल्या महाविद्यालयीन शिक्षणात जागृत झालाच. आपल्या हक्क अधिकाराचे हनन म्हणजे आपल्यावर होणारा अन्याय याची जाणीव त्यांना झाली .त्यातूनच त्यांनी उभरत्या महाविद्यालयीन जीवनातच मोठा लढा लढला.नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील तात्काळ वटणारे धनादेश रोखून धरत होती. परिणाम हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू लागले . अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मग यातून मार्ग कसा काढायचा? बँकेत पैसा नाही सेवा नाही तर ती बँक कसली? यावर आक्रमक होऊन बँकेला ताळे ठोकून विविध वर्तमानपत्रातून फ्रंट पेज ने झळकणारे डॉ. डी हर्षवर्धन त्यावेळी फुले-आंबेडकर स्टुडन्ट असोसिएशन अर्थातच फासात कार्य करत होते. छात्रभारती, फासा यासारख्या संघटना तून त्यांच्यातील नेतृत्व वादी कलागुणांना इतका वेळ मिळाला की ते आज राष्ट्रीय नेतृत्वाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. फासाच्या संस्थापिका डॉ. इंदिरा आठवले यांचे कॅडर अटेंड करणे, व्याख्याने, परिषदा,संमेलने व त्यांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती ,शैक्षणिक हक्क, फी वाढ यासारख्या बाबी त्यांनी उचलून धरल्या. २००१ मध्ये डॉ. उदित राज यांचा धर्मांतराचा कार्यक्रम राबविण्यात आला. त्यात डॉ.उदित राज यांनी " धर्म ही व्यक्तिगत बाब आहे असे" स्पष्ट केले उदित राज यांची ही भूमिका डॉ. हर्षवर्धन यांना आकर्षक ठरली . पदव्युत्तर पदवी दरम्यान नांदेड मधील नामांकित यशवंत महाविद्यालयातून पुन्हा एकदा ते चर्चेस आले. विद्यापीठाच्या नियमांना डावलून दहा टक्केपेक्षा अधिक फीस वाढवून एक प्रकारे विद्यार्थ्यांची ही आर्थिक लूटच असून ती थांबवण्यात यावी अशी भूमिका घेत शेवटी न्याय मिळूनच घेतला. नांदेड विद्यापिठात तर विद्यार्थ्यांच्या न्यायचा एकमेव आशावाद अशी त्यांची ख्याती झाली. हर्षवर्धन हे समाजशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक एम. ए. एम. फिल. नेट पीएचडी व माध्यमशास्त्रात एम फिल अशा प्रकारची उच्च शैक्षणिक अहर्ता प्राप्त करणारे डॉ. हर्षवर्धन यांनी दलित आदिवासींच्या बाबतीत केलेले संशोधन जीवन उपयोगी ठरले. ऍड. अस्मिता वाघमारे-दवणे या त्यांच्या सहचारिणी एक उच्चपदस्थ विधी अधिकारी आहेत.चळवळ,सामाजिक, शैक्षणिक,प्रश्न यांची जाणीव असणाऱ्या ऍड.अस्मिता वाघमारे-दवणे यांची साथ,त्याग, सामंजस्य ह्या बाबीही डी.हर्षवर्धन यांच्या जीवनात महत्वपूर्ण ठरतात. शिक्षणाप्रती असणारी निस्सीम आस्था. शिक्षण हेच मानवी जीवनाचा अविष्कार तो तळागाळातील, गोरगरीब, वंचित, विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी केवळ शिक्षण घेऊन चालणार नाही, तर उच्च शिक्षण महत्त्वाचे आहे .कारण" उच्य शिक्षणातून माणसाला सामाजिक न्यायाच्या जाणिवा निर्माण होतात." ही त्यांची भूमिका आहे. डॉ. हर्षवर्धन यांच्याबाबतीत सांगायचे झाल्यास ज्या महाविद्यालयात सतत प्राचार्यांशी या त्या विषयावरून डायलॉगबाजी विद्यार्थी चळवळ, आंदोलन, हक्क ,अधिकाराची मागणी करत कॉलेज प्रशासनाच्या नाकीनऊ आणून सोडणाऱ्या त्याच विद्यार्थ्याला जर बेस्ट स्टुडंट अवॉर्डने गौरविण्यात येत आले असेल तर त्या विद्यार्थ्यांचा लढा किती न्यायीक होता हे स्पष्ट होते. त्यांच्यात असणारे नेतृत्व गुण, संघटन कौशल्य,विविधांगी अभ्यास, दूरदृष्टी, माणसं जोपासणारी वृत्ती आणि आपल्या सर्व सहकारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना समान न्याय देण्याचा त्यांचा कुशल स्वभाव. त्यामुळे कुठल्याच कार्यकर्त्याला जबाबदारी सोपवण्याची गरज पडत नाही. तर जबाबदारीच्या जाणिवेचा असणारा त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता हे त्यांच्या संघटनेचे वैशिष्ट्य आहे. आज पर्यंत त्यांनी जेवढे आंदोलने केली त्यातील प्रत्येक लाभदायक ठरल. याचं श्रेय म्हणजे त्यांचा अभ्यास होय. देशातील विविध राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि तत्सम विद्यापीठात पसरलेलं त्यांचं नेतृत्व दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असले तरी नेतेपदाचा कुठलाही अहम न बाळगणारा हा माणूस संवेदनशील मनाचा दूरदृष्टा आहे. प्रत्येक घटनेला खोलपर्यंत जाऊन त्यांनी केलेली चिकित्सा डोळ्यात अंजन भरवणारी आहे. कारण आज पर्यंत पोतराज हा कलाप्रकार म्हणून अनेकांनी लिहिले. तर पोतराज हा एक कलाप्रकार म्हणून काहींनी जोपासला.मात्र डॉ.डी. हर्षवर्धन यांच्या मते "पोतराज हे कल्चर नाहीतर गुलामीत्व आहे " कारण भीक मागण्याचा कोणताही प्रकार हा कलाप्रकार होऊ शकत नाही .असा ठाण मांडून पोतराज पद्धतीला शोषणाच्या रुपात पाहून ही पद्धत बंद झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची वैचारिक भूमिका रास्त ठरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य पुनरावर्तन करताना ते नेहमीच म्हणतात की, "ज्या जातीने माणसाचे शोषण केले ती जात संपली पाहिजे जात संपविण्याची ही प्रक्रिया अधिक जटील आणि भयावह आहे म्हणून ज्या जातीने शोषण केले तिचा उदो व्हायला नको." त्यांना गुलामीचा इतिहास व जात ही मान्य नाही. गेली बावीस वर्षापासून चळवळीत काम करणारा हा माणूस अध्यात्मिक नाहीतर वास्तववादी आहे. कम्युनिस्ट ,समाजवादी, मनुवादी ,यांच्यापेक्षा वेगळी निर्माणाची चळवळ म्हणून ते याकडे पाहतात. कार्यकर्ता हा षंड होणारा नाही तर बंड करणारा पाहिजे. अशी या माणसाची कार्यकर्त्याविषयी धारणा आहे. नैतिकतेला जपून चारित्र्याशी प्रामाणिक राहणारा हा माणूस संपूर्ण देशभरात व्याख्याने ,परिषदा, मोर्चे, आंदोलने करतो.देशाच्या राजधाणीतून क्रांतीचे रणशिंग फुंकणारा त्यांचा आवाज दलित,आदिवासी,ओबीसी,भटके, वंचित,दुर्गमित,पीडित यांच्या उत्थानाला अधोरेखित करतो. या घटकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर शिष्यवृत्त्या,शिक्षण,आरक्षण यांना डावलून चालणार नाही.म्हणून या संदर्भातील प्रत्येक भूमिकेला न्यायाच्या दालनात मांडणारे डॉ.डी. हर्षवर्धन हे आज विद्यार्थी नेतृत्वाचा न्यायिक आशावाद असून आजवरच्या त्यांच्या समस्त कार्याची दखल विद्यार्थी,पालक,शैक्षणिक संस्था,समाज आणि तमाम संघटन स्नेही कार्यकर्ते,मित्र परिवार यांच्या मनामनात जागवणाऱ्य एका अनोख्या जागल्यास त्याच्या आजच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या समस्थ स्नेहीजनाकडून मंगल कामना व त्यांच्या पुढील कार्यकर्तृत्वांना अशीच उभारी मिळो ही मंगल सदिच्छा....!
--मनोहर सोनकांबळे
(८८०६०२५१५० एम.फिल. संशोधक विद्यार्थी माध्यमशास्त्र संकुल स्वा.रा.ती.म. विद्यापीठ,नांदेड)
No comments:
Post a Comment