मनरेगा’ चे नोंदणीकृत मजूर लाखावर तर प्रत्यक्ष कामावर तेराशे तालुक्यातील चित्र : शेकडो मजूरांचे विविध कारणाने स्थलांतर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 5 February 2022

मनरेगा’ चे नोंदणीकृत मजूर लाखावर तर प्रत्यक्ष कामावर तेराशे तालुक्यातील चित्र : शेकडो मजूरांचे विविध कारणाने स्थलांतर

किनवट,दि.५  :  तालुक्यात जॉब कार्ड धारकांची संख्या ५६ हजार ८४९ आहे. त्यात अनुसूचित जातीेचे ६ हजार ३२, अनुसूचित जमातीचे ११ हजार ३३६ तर इतरमध्ये ३९ हजार ४८१ जॉबकार्डधारक आहेत. त्यातील एकूण मजूरांची संख्या एक लाख २३ हजार १८२ असली तरी त्यापैकी फक्त २० हजार ९४३ मजूर गत तीन वर्षापासून नियमितपणे कामावर सक्रिय आहेत. सध्या तालुक्यात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून घरकुलाची ५३, सिंचन विहीरीची ४७, सार्वजनिक विहीरीची २, शेततळ्याची ५ तर एक क्रिडांगणाचे काम मिळून एकूण १०८ कामे सुरू आहेत. त्यावर ९२१ मजूर काम करीत आहेत. तसेच  वनविभाग किनवट, मांडवी, बोधडी, इस्लापूर, अप्पारावपेठ  अंतर्गत रोपवाटिकेची ६, अनगड दगडी बांधाची १९ तर, सलगसम पातळीच्या चरेचे एक काम मिळून एकूण २६ कामे सुरू आहेत. त्यावर ४२५ मजूर उपस्थित आहेत.

‘मागेल त्याला काम’ हे ब्रीद तंतोतंत खरे ठरवत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण  रोजगार हमी योजनेअंतर्गत  तालुक्यात टाळेबंदीच्या काळातही शेकडो ग्रामीण अकुशल लोकांना रोजगार देऊन पं.स.मनरेगा विभागाने दिलासा दिलेला होता. मात्र,  सद्यस्थितीत तालुक्यात नोंदणीकृत मजुरांची संख्या १ लाख २३ हजार १८२ आहे. त्या तुलनेत  ग्रामपंचायतीसह विविध यंत्रणेच्या १३४ कामांवर तूर्तास केवळ एक हजार ३४६ मजूर कार्यरत आहेत.


       महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत काम मागणार्‍या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. यामध्ये १०० दिवसांपर्यत रोजगाराची कमी केंद्र सरकारची आहे व त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते. रोजगाराच्या माध्यमातून विविध विकासकामांना चालना देण्यात येते. कालौघात मजुरीचे दर अपेक्षित वाढले नाहीत. तसेच अग्रीमची सुविधा व रोजच्या रोज मजुरी मिळत नसल्यामुळे किनवट तालुक्यातील शेकडो मजूर शेजारच्या तेलंगणातील आदिलाबाद जिल्हयात कापूस जिनिंगमध्ये कामासाठी तर काहींनी शेतातील मजूरीसह बांधकाम आदीला प्राधान्य दिलेले आहे.

   तालुक्यात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून घरकुलाची परोटी येथे १०, मार्लागुंडा ४, मलकजाम १, मलकजामतांडा ४, थारा १४, चिखली बु. १, दिगडी मंगाबोडी २, नागझरी २, सिरपूर १, कनकी २, वझरा बु. १, निचपूर ८, सक्रूनाईक तांडा १, आमडी १ व बेंदीतांडा १ असे एकूण ५३ घरकुलाची कामे चालू आहेत. सिंचनविहिरीची डोंगरगाव येथे १, पारडी खु. १३, बोधडी बु.७,  अंबाडी १, मांडवा कि. २, पिंपळगाव सिं.१, टेंबी ८, उमरी बा.१, भिलगाव १, राजगडतांडा ४, मारेगाव खालचे येथे एक सार्वजनिक विहीर व ४ सिंचन विहिरी, तर  बोधडी खु. एक सार्वजनिक विहीर व ४ सिंचन विहिरी मिळून ४७ कामे चालू आहेत. शेततळ्याची कनकी येथे एक तर पार्डी खु. येथे ४ आणि उमरी बा.येथे एक क्रिडांगण मिळून ग्रा.पं.यंत्रणेअंतर्गत एकूण १०८ कामे सुरू असून त्यावर ९२१ मजूर काम करीत आहेत.


         वनविभाग  किनवट, मांडवी, बोधडी, इस्लापूर, अप्पारावपेठ  अंतर्गत रोपवाटिकेची बोथ, बोधडी खु. जलधारा, फुलेनगर येथे प्रत्येकी एक तर, वाळकी बु. २ मिळून एकूण ६ कामे, अनगड दगडी बांधाची दहेली येथे २, सारखनी 3, सिंगोडा १, उनकदेव १, निराळातांडा १, वडोली २, धामनदरी २, निचपूर २, राजगड २, अप्पारावपेठ २,मूळझरा १ असे एकूण १९ कामे, तर  सारखनी येथे सलगसम पातळीच्या चरेचे एक काम मिळून एकूण २६ कामे सुरू आहेत. त्यावर ४२५ मजूर उपस्थित आहेत.

No comments:

Post a Comment

Pages