करोना काळात मदत करणाऱ्या कमल उदवाडीया फाऊंडेशन, मुंबईचे डॉ. अनैता व डॉ. हेमंत हेगडे यांची साने गुरूजी रूग्णालयास भेट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 30 March 2022

करोना काळात मदत करणाऱ्या कमल उदवाडीया फाऊंडेशन, मुंबईचे डॉ. अनैता व डॉ. हेमंत हेगडे यांची साने गुरूजी रूग्णालयास भेट

किनवट,दि३०(प्रतिनिधी): करोना महामारीच्या संकटकाळात तालुक्यातील अतिदुर्गम भागात करोनाग्रस्त लोकांना मदत करणाऱ्या कमल उदवाडीया फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. अनैता हेगडे व हेमंत हेगडे यांनी साने गुरूजी रूग्णालयास व परिसरातील गावास नुकतीच भेट देऊन व लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

   साने गुरूजी रूग्णालयात नुकत्याच आयोजीत केलेल्या छोटेखानी सत्कार समारंभाप्रसंगी करोनामुळे विधवा झालेल्या स्त्रिया, करोना पॉजिटीव्ह रूग्ण, या काळात मदत झालेले कुटुंब, इतर निराधार महिला व रूग्णालयात मोठ्या शस्त्रक्रिया करून घेतलेले रूग्ण यांच्याशी याप्रसंगी त्यांनी  संवाद साधला.

   कमल उदवाडीया फाऊंडेशन, भारत जोडो युवा अकादमी व साने गुरूजी रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १ जून २०२१ पासून मार्च २०२२ पर्यंत करोना संदर्भाने २६५ गावात जनजागरण केले.तसेच १७१ गावातील १८ हजार नागरिकांचे समुपदेशन केले.१ हजार किट गरजु लोकांना वाटप  केले. या मदतीचा फायदा किनवट व माहूर तालुक्यासह हिमायतनगर व हदगांव तालुक्यांनाही झाला आहे.

   हा संपुर्ण कार्यक्रम शासकीय आरोग्य सेवा विभागासोबत राबविण्यात आला. त्यामुळे या तालुक्याचे काम चांगल्या रितीने होऊ शकले. या प्रसंगी डॉ. हेगडे दाम्पत्यांनी किनवट तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला भेट देऊन संवाद साधला. डॉ. संजय मुरमुरे व डॉ. संतोष गुंटापेल्लीवार यांनी पाहूण्यांच्या सत्कारासोबतच करोनाची लढाई यशस्वी करण्यात केलेल्या योगदानाबद्दल कमल उदवाडीया फाऊंडेशनचे आभार मानले व हा कार्यक्रम पुढेही चालू ठेवून सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

   डॉ. हेगडे दाम्पत्य व त्यांचे सहकारी विजय उत्तरवार, श्रीमती सोनिया यांनी साने गुरूजी रूग्णालयातील सर्व विभागांना भेट देऊन रूग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे यांच्याशी सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांबद्दल संवाद साधत विचार विनिमय केला व  साने गुरूजी रूग्णालयाच्या आरोग्य सेवांबद्दल समाधान व्यक्त केले.    सत्कार प्रसंगी या सर्व पाहूण्यांचा सत्कार करोनाग्रस्त लाभार्थी व रूग्णांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी रूग्ण लिला व त्यांचे पती, विद्यार्थी समीर शेख, पुष्पाताई लैचट्टीवार, पत्रकार ॲड.मिलिंद सर्पे इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी या कार्यक्रमातील समुपदेशक विशाल मोरे, अजय वल्लेवार, राजेश बावणे, लैला कुमरे यांचा प्रमुख अतिथी डॉ. हेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे यांनी केले.

  दिवस अखेरीस एम.आय.डी.सी. येथील साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या बांधकामस्थळी भेट देऊन समाधान व्यक्त केले. पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले या प्रसंगी हिमायतनगरचे प्रभाकरअण्णा मुधोळकर, डॉ. शिवाजी गायकवाड, व संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages