झुंड प्रस्थापित व्यवस्थेला बसलेली ‘किक’ - संजय सोनवणे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 5 March 2022

झुंड प्रस्थापित व्यवस्थेला बसलेली ‘किक’ - संजय सोनवणे


नागराजचा झुंड आजपर्यंत सिने व्यावसायीक मूल्य म्हणून इंडस्ट्रीने पोसलेल्या तथाकथीत सौंदर्यशास्त्राला फूटबॉलसारखं उडवून लावतो. कटर-गटर-सॉकर ते आंबेडकर असा हा थेट प्रवास आहे. झिपर्‍या डॉन फाटक्या जीन्सच्या उसवलेल्या शिलाईत लपवलेलं 'कटर' काढून कचर्‍याच्या डब्यात टाकतो आणि पासपोर्टच्या कारवाईसाठी हातात ’पेन’ घेऊन कागदपत्रांवर सही करतो, झुंडचा हा पिक पॉईंट आहे. कपड्यात कटर लपवावं लागतं तर पेन खिशाला लावून मिरवण्याची गोष्ट असते. इथल्या कोट्यवधींना ’कटर-गटर’ पासून लेखणीपर्यंतचा हा प्रवास सिद्ध करण्यासाठी मार्ग दाखवणार्‍या बाबासाहेबांचं जयंतीतलं पोस्टर दाखवून नागराजला सिनेमाच्या एका लाईनमध्ये बाबासाहेबांकडून हेच सांगायचं असावं...


नागराजने प्रतिकांचा वापर केलेल्या झुंडमध्ये आंबेडकरी चळवळीची भविष्यातील दिशा आणि इतिहासही कथा प्रतिकातून  स्पष्ट व्हावा. झुंड मध्ये सुरुवातीला झोपडपट्टीत दिसणारं 'गटर' म्हणजे माणसंच शोषण, साचलेपण, घृणा, भीती, किळस, डबकं आणि माणसाचं हजारो वर्षांच्या व्यवस्थेनं लादलेल्या दुर्गंधीसोबतचं अस्पृश्य  म्हणून जगणं...असं जगणं असलेल्या मुलांनी त्यांच्या कपड्यात लपवलेलं 'कटर' हे सुरक्षा, अत्याचार, हत्येच्या भीतीला अर्थात हिंसेला हिंसेचं दलित पँथरसारखं 'नाईलाजी' उत्तर असावं. झुंडचं कथानक पुढे  'सॉकर'कडे वळतं तेव्हा हातात असलेल्या साधनांनिशी चळवळीचा वैचारिक  सनदशीर मार्गाने व्यवस्था बदलासाठी केलेली स्पर्धा, आरक्षण संधीसाठी सामाजिक आणि राजकीय सत्तेसाठीचा संघर्ष विजयाचा इतिहास आठवावा...त्याही पुढे जातीविहिन समाज रचनेचा 'संपूर्ण आंबेडकर' हा परिपूर्ण  माणूस बनण्याचा परीघ पूर्ण व्हावा.

 

झुंड पाहिल्यावर आमिर म्हणाला, आजपर्यंत आम्ही जे काही मागील चाळीस वर्षात पडद्यावर केलं, दाखवलं त्याचा नागराजने फुटबॉलसारखं लाथ मारून धुडकावून लावलं, सो कॉल्ड व्यावसायिक जगातलं प्रेझेंटेशन नागराजला जमत नाहीच, आणि शो बिझनेसच्या या सिनेजगतात जीवघेणं महत्व मिळवून बसलेलं वस्तूचं ’सादरीकरण’ नावाचा प्रकार त्याच्या गावीही नाही, हाडामांसांची माणसं वस्तू नसतात, म्हणून त्यांचं वस्तूसारखं झालेलं सादरीकरणही त्याला मान्य नसावं, म्हणूनच तर पडद्यावरच्या त्याच्या झुंडीच्या चेहर्‍यांवर मेकअपचे थर साचलेले नसतांत...मराठी साहित्यात नारायण सुर्वे, नामदेव ढसाळांनी जे केलं तेच नागराज हिंदी पडद्यावर झुंडमधून पुन्हा सुरू केलेलं आहे. चेहरे रंगवून मुखवटे झालेल्या माणसांची विषयवस्तू केलेल्या या विक्राळ प्रवाहाविरोधात ‘निखळ माणूसपण’ घेऊन उतरण्याचा धोका नागराजने पत्करलेला आहे. सिने इंडस्ट्रीचं नव्या सौंदर्यशास्त्राची ही सुरुवात असल्यानं त्याचं स्वागत व्हायला हवं.


     नागराज पडद्यावरच्या कोंदट खोलीतल्या जळमटांना सोनेरी झालरीची बोगस किनार जोडत बसत नाही, किंवा तसं नावही देत नाही, हिरव्यागर्द वनराईतून वाहणारे पांढरे शुभ्र झरे माणसांच्या बरहुकूम कोसळत नाहीत, हे त्याला पक्क माहित असतं, माणसांच्या हुकूमावर त्यांच्या ताब्यात असलेली वस्तीतली गटारंच वाहू शकतात, तो या माणसांची ’असोशी वाहाणार्‍या वस्तीतल्या गटारांना’ पांढरे शुभ्र फेसाळत कोसळणारे झरे म्हणण्याला स्पष्ट  नकार देतो, यावेळी तो स्वतःची आणि प्रेक्षकांची फसवणूक करण्यास नकार देतो, म्हणूनच माणसांचं आणि वस्तूंचं  ’सिनेमॅटीक प्रेझेंटशन’ नागराजला जमत नाही, तो गटाराला झरा न म्हणता गटारंच म्हणतो, तस्साच तो माणसालाही माणूसच म्हणतो, हिरो नाही, म्हणूनच झुंडच्या पडद्यावर अमिताभमधला केवळ माणूस उरतो, हिरो, सुपरस्टार अभिनेताही नाही.


 मुदलात माणसाच्या जगण्याची तेवढी चांगली नसलेली गोष्ट चांगली म्हणून सादर करावी, ही स्वच्छ फसवणूक असते, व्यावसायीक जगाने कलेचं नाव दिलेलं सादरीकरण अथवा प्रेझेंटेशन म्हणूनच नागराजच्या कलाकृतीतून दिसत नसावी.

   झाड, आभाळ, मातीचा गंध आणि माणूस ही सादरीकरणाची वस्तू बनवलेल्या भ्रमाच्या खिलाफ म्हणूनच नागराज सातत्याने ‘पडद्यावरच्या मैदानात’ उतरलेला असतो. ही ‘खिलाफत’ त्याच्या पिस्तुल्या,फँड्री, सैराट अशा प्रत्येक कलाकृतीतूनही याआधी दिसते. सिने कलाकृती म्हणजे श्रीमंतीचे उंची महाल, बर्फाळ टेकड्यांचे डोळ्यांना सुख देणारं अनेकरंगी छान छान चित्र असल्याचा भ्रम नागराज मोडीत काढतो म्हणण्यापेक्षा तो तिथं बघतच नाही आणि प्रेक्षकांनाही बघू देत नाही.

 तो दाखवतो ते निखळ-नितळ माणसांच्या जगण्याचे चांगले-वाईट भेसूर संदर्भ, त्यांचे रंग... हे रंग कमालीचे पारदर्शक असल्याने नागराजने दाखवलेला पडद्यावरचा माणूस ‘आरपार’ दिसू शकतो. मेनहोलमधल्या पाण्याच्या चिकट नर्काला जीवन म्हटलं जाणारं पाणी म्हणता येणं शक्य नसतं, तसंच इथं राहाणार्‍या माणसांना माणूस किंवा उपेक्षीत, वंचित असलं काही म्हणणं म्हणजे ’नालीच्या पाण्याला’ ‘बिस्लरी’ समजण्यासारखं धोकादायक असतं. या ठिकाणी माणूस म्हणून तथाकथीत जीवनाची संकल्पनाच बदलून पार बिघडून गेलेली असते. मग अशा वस्तीतून येणारा थेट गंध, दुर्गंध जे काय असेल ते...त्यातून माणूस म्हणवून घेणार्‍यांची सुटका होत नसते. नारायण सुर्वे आणि नामदेव ढसाळच्या गोलपिठ्यानं मराठी साहित्याच्या आशयमूल्याची जी दिवाळखोरीत निघालेली ‘औकात’ दाखवली नागराज हिंदी सिनेपडद्यावर नेमकंच तेच करतोय. त्यासाठी त्याची झुंड तयार आहे. ही झुंड माणसात यावी कि आपण त्यांच्यात सामील व्हावं, हे आता ज्याचं त्यानं ठरवायचं आहे.


नागराज या चवताळलेल्या झुंडीसमोर प्रेक्षकातल्या माणसाला खाण्यासाठी सोडून देतो.

   मागील १०० वर्षात चकाकत्या स्वित्झर्लंडमध्ये रमणार्‍या सिने नशेच्या आहारी जाऊन वास्तवापासून ‘आऊट’ होऊन पडलेल्या हिंदी प्रेक्षकांच्या नाकातोंडावर दाबून धरलेला गुलाबी नशेचा व्हाईटनर नागराजने झुंडच्या निमित्ताने ओढून काढला. या धुंदीतून बाहेर काढणारा नागराज इथं एकटाच नाही, त्याची साथ द्यायला दक्षिणेकडे आज ग्यानवेल (जय भीम), पा रंजिथ (काला, कबाली, पेरुयेरम पेरुमल), वेट्रीमारन (असुरन), मारी सेल्वराज (कर्नन), अनुभव सिन्हा (आर्टीकल १५) अशी मंडळी आहेतच. 


मराठीत अलिकडे जरी नागराजला साथ देणार्‍यांचा दुष्काळ पडला असला तरी एकेकाळी, सिनेकथानकात माणसातला ‘हिरो’ वगळून केवळ ‘माणूसपणा’ची ही कथाखिंड सत्यजीत रे, विजय तेंडुलकर, गोविंद निहलानी, श्याम बेनेगल, राजीव पाटील, गजेंद्र अहिरे, जब्बार पटेल या ‘झुंडी’ नेही यशस्वीपणे लढवली होती.

नागराजने पुन्हा नव्याने ही धडक दिली असून  झुंडीचा आजच्या या पिढीचा तो ‘म्होरक्या’ आहे. हिंदी पडद्यावर ही झुंड दाखल व्हायला ११० वर्षे लागली आहेत. त्यामुळे हे नवे सौंदर्यशास्त्र व्यावसायीक मूल्य म्हणून समोर यायलाही तेवढीच वर्षे लागली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पडद्यावर यायला आणि इंडस्ट्रीने खडा ‘जयभीम’ म्हणायला आणि जयंती साजरी करायला तेवढीच वर्षे हिंदी सिने इंडस्ट्रीला लागली आहेत. डॉ. बाबासाहेबांसोबत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराजांना एकत्र अभिवादन करायलाही तीच एकशेदहा वर्षे वाट पाहावी लागली आहेत, आणि कदाचित माणसातला सुपरस्टार किंवा ‘हिरो’ वगळून त्यातला केवळ ‘माणूस’ पडद्यावर यायलाही तेवढीच वर्षे लागली असल्याचे म्हणणेही खरे ठरावे.


बिग बजेट व्यावसायीय मूल्यांच्या हायटेक चित्रपटात नोटा छापणारा यंत्रवत रोबोट झालेल्या रजनीकांत सुपरस्टारला पा रंजिथने काला, कबालीतून ‘माणसात’ आणलं, नागराजनेही ‘स्टार ऑफ द मिलेनियर’ अमिताभचं सुपरस्टारपद वगळून त्याला विजय बोराडे या सामान्य मराठी माणसात आणलं. अमिताभमधला पडद्यावर अनेक सिनेमातून साकारलेला या आधीचा ’विजय’ दहा जणांना संवाद फेकीतूनच गप्प करणारा होता. जंजिरपासून ते अग्निपथपर्यंत अनेक उदाहरणं त्याची आहेत. 


झुंडमध्ये हा विजय साधा सरळ  आहे. तो खर्चासाठी बायकोकडून पैसे मागून घेऊ शकतो, त्याचा मुलगा त्याला ‘ कुछ तो ढंग का पहन लेते, पापा आपको कपडे पहननेका सेन्स नही है। ’ असं म्हणू शकतो.

लगान, जो जिता वही सिंकदर किंवा इतर खेळपटांसारखा झुंड हा खेळातील थरार दाखवणारा सिनेमा नाही, हा खेळापेक्षा खेळाडुंच्या कथानकाचा सिनेमा आहे. जगण्याचा खेळ झालेल्या आणि त्याची दखलही न घेणार्‍या केवळ तमाशा बघणाऱ्या बाहेरच्या प्रेक्षकांची ही कथा आहे. ‘हमारी बस्ती गटर में है पर तुम्हारे दिल में गंद है’...हा इथं आरोप नाही, सवाल नाही, खंतही नाही, हे जात आणि समाजवास्तव आहे. 


बाहेरच्या ‘गंदगी’ला नाकं मुरडणार्‍यांना त्यांच्या अंतर्मनातल्या या दुर्गंधीने ओकारीची प्रबळ इच्छा येण्यासाठी, पोटातली मळमळ बाहेर काढायला नागराज झुंड नावाची ही गोळी बेमालूमपणे आपल्या घशाखाली ढकलतो.


   माणूसपणाला दुय्यम स्थान देणार्‍या वस्तूला नागराज प्रेक्षकांवर भिरकावून लावतो. फँड्रीमध्ये जब्याच्या हातातला दगड हे काम करतो. तर झुंडमध्ये हे काम फुटबॉलने केलेलं असतं. सत्तर एमएमच्या पडद्यावर झुंड ‘छान छान’ दिसत नाही, सैराटमध्ये परशाला दिक्षितांची माधुरी वाटणार्‍या आर्चीनं झुंडमध्ये मेकअप उतरवलेला असतो, तर आकाश ठोसरला झुंडमध्ये नकारात्मक भूमिकेत, पाहाणं आमिर खानला आवडलेलं नसल्याची पोचपावती त्याने स्वतः आकाशला दिलेली असते. तर झुंडमध्ये अंकुश मेश्रामने साकारलेला अंकुश गेडाम म्हणजेच ‘डॉन’ हिंदी सिनेमाचा हिरो असू शकतो ही दिगदर्शकाने केलेली डेअरिंग असते. ही डेअरिंग नागराजने केली आहे. तीसुद्धा ज्या सुपरस्टारने डॉन ही ओळख हिंदी पडद्याला दिली त्या अमिताभसमोर.... 


चोप्रा, खान, मल्होत्रा, सिंग, मेहरा, गुप्ता अशा हिंदी पडद्याच्या चकचकीत हिरोंची पडद्यावरची नावं असलेल्या वंशावळीत ‘गेडाम’ हे हिंदीतल्या कला सावळ्या हिरोचं पडद्यावरचं आडनाव असू शकतं, हे स्वप्न नागराजनं दाखवलं आहे. तर न रंगवलेले चेहरेही सिनेमात शोभून दिसतात त्यांना केवळ ‘मौका’ मिळायला हवा, याबाबत  झुंड कथानकासारखाच ठाम असतो. 


सिनेमा पाहाण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे प्रेझेन्टेशन किंवा छान छान दिसणं, असणं म्हणजेच सिनेमा नाही, हे याआधी रुजलेले, जाणीवपूर्वक रुजवले गेलेले कलाकृतीचे मापदंड नागराजने निकालात काढलेले असतात. त्यामुळेच संवाद फेक किंवा मनोरंजनाचा डोस या चित्रपटात नसतो. सिनेमाला अपेक्षीत वेग नसल्यानं एक प्रकारचा येणारा रटाळपणा हा झुंडच्या कथाविषयाच्या उपेक्षीत उदासीनतेचंच प्रतिनिधीतत्व करतो, झोपडपट्टीच्या गटारगल्लीत राहाणार्‍या, जगणं थबकलेल्या या झुंडीकडून आपण कुठल्या वेगाची अपेक्षा करतोय, हळूवार येणारी वेदना जीवघेणी असते, कत्तलखान्यात गंज चढलेल्या धार नसलेल्या चॉपरने सावकाश कापलं जाणारं जनावर जास्त जीवघेणी वेदना झेलणारं असतं. हे सावकाशपण मशीनकटरमध्ये एका फटक्यात फन्ना उडणार्‍या जनावरापेक्षा जास्त वेदना देणारं रटाळभीषण  असावं, त्यामुळेच कदाचित झुंडच्या वेगामध्ये एक प्रकारचं साचले, रटाळपणं येतं ते कथानकाशी प्रामाणिक असल्यामुळेच....


   मनमोहन देसाईंच्या सिनेमातल्यासारखा रेल्वे पुलावरून टे्रेनवर उडी घेण्याच्या एका क्षणात लहानाचा मोठा झालेला हिरो, पडद्यावर अचानक आलेलं ‘तूफान, त्या वादळातून हिरोच्या भावंडांचं, कुटुंबाचं पुन्हा ‘मिलना बिछडना’, हादसा’ आदी प्रकारकथानकांची ओळख असलेला याआधीच्या तब्बल २२ सिनेमांमधला अमिताभ नावाचा हिरो असलेला ’विजय’ नागराजने विजय बारसेंच्या कथेतून विजय बोराडे असा साधासरळ मराठी माणूस बनवलेला आहे. 


हिंदी पडद्यावरचा हा मराठीचा झालेला 'विजय' बदल लक्षणीय आहे. मराठी आणि हिंदी प्रेक्षकांनीही झुंडच्या निमित्तानं त्याचं स्वागतच करायला हवं. गांजा, दारु, व्हाईटनरच्या नशेतल्या 'किक'पासून फुटबॉलच्या किकपर्यंत आणि ’गटर’ ’कटर’ पासून ’सॉकर’ ’आंबेडकर’पर्यंतचा हा प्रवास पडद्यावर म्हणूनच अनुभवायला हवाच...


-संजय सोनवणे, 9022 929 592

No comments:

Post a Comment

Pages