आंबेडकरी चळवळीत आता राजकीय प्रबोधनाची गरज - सुरेशदादा गायकवाड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 28 March 2022

आंबेडकरी चळवळीत आता राजकीय प्रबोधनाची गरज - सुरेशदादा गायकवाड

नांदेड - आंबेडकरी राजकीय चळवळीची पुर्णतः वाताहत झाली असून ती फक्त जयंती आणि धम्म परिषद साजरी करण्यापुरतीच राहिली आहे. गटातटात आणि विविध राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेल्या नेतृत्वामुळे समाज एकसंघ राहिलेला नाही. दादासाहेब गायकवाड आणि पँथरच्या झंझावातानंतर आंबेडकरी समाज एकत्र येऊ शकेल असे नेतृत्व मिळालेले नाही. आंबेडकरी चळवळीत आता राजकीय प्रबोधनाची गरज असल्याचे ठाम मत येथील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांनी व्यक्त केले. ते महाविहार परिवाराच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलत होते. यावेळी भंते शिलरत्न, भगवान येवले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती यशवंत चावरे हे होते. 


       कोरोना काळानंतर महाविहार परिवार यांच्या वतीने दरमहा एका व्याख्यानाच्या आयोजनाला प्रारंभ झाला. शहरातील सहयोग नगरस्थित  माता रमाई बुद्ध विहार परिसरातील हॉलमध्ये आंबेडकरी चळवळीची सद्यस्थिती या विषयावर महाराष्ट्रातील  आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांची यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते दीक्षाभूमी स्मारक समिती नागपूर चे सदस्य मामा़ येवले यांचा चळवळीतील योगदानाबद्दल कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना सुरेशदादा म्हणाले की, आंबेडकरी नेतृत्वाला मर्यादा निर्माण केली जात आहे.  प्रस्थापितांविरोधी विचार नष्ट करण्याचे किंवा काबूत ठेवण्याचे डावपेच आखले जात आहेत. नव्याने उभ्या राहिलेल्या परिस्थितीचे आकलन करून घेण्याच्या क्षमतेचा अभाव किंवा उदासीनता, संघटनेची ताकद उभी करण्यापेक्षा, सवतेसुभे मांडून राजकीय सौदेबाजी करून सत्तेची चव चाखण्याची अभिलाषा यामुळे आंबेडकरी चळवळीची वाताहत झाली आहे.  ज्याचे प्रतिनिधित्व करायचे आहे त्या दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, ओबीसी, भूमिहीन शेतमजूर, गरीब-कष्टकरी माणूस यांच्या भौतिक समस्यांवर आंदोलने उभी करण्यापेक्षा भावनिक प्रश्नांभोवती चळवळ फिरवत ठेवण्यात प्रस्थापित यशस्वी झाले आहेत. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते दीप धूप आणि पुष्प पूजन करण्यात आले. याचनेनंतर भंते शीलरत्न यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर कार्यक्रमाला रितसर सुरुवात झाली. यावेळी उद्धव सरोदे, अंकुश सोनसळे, सदाशिव गच्चे, प्रज्ञाधर ढवळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक यशवंत गच्चे यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय एल.एन.गरजे व भीमरावजी हटकर यांनी करून दिला. अध्यक्षीय समारोप करताना यशवंत चावरे यांनी आंबेडकरी चळवळीतील न्यायवादी दृष्टिकोन सिद्धांत स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   आकाशवाणी निवेदक आनंद गोडबोले यांनी केले तर आभार प् रमेशजी कोकरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविहार परिवाराच्या वतीने उपासक साहेबरावजी पुंडगे, ईश्वरराव सावंत, बी .जी .पवार, अशोक गायकवाड डी.डी.भालेराव आदींनी परिश्रम घेतले.


आंबेडकरी चळवळ देणाऱ्यांची चळवळ व्हावी

           आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड व्याख्यानादरम्यान म्हणाले की, आंबेडकरी चळवळ समग्र समाजाला नवा विचार देणारी चळवळ आहे. समाजाच्या पुनर्रचनेची चळवळ आहे. परंतु ही वस्तुस्थिती पुर्णपणे बदलली असून प्रस्थापित राजकीय पक्षांकडे भीक मागणाऱ्यांची चळवळ बनली आहे. समाजानेच एकत्र येऊन चळवळीला भक्कम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण एकत्र आलो, भरकटलेल्या समाजात आंबेडकरी विचारधारेची पुनर्बांधणी केली तर या चळवळीला निश्चित भवितव्य आहे, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Pages