नांदेड शहर नागरी प्रशासनाचे ६४ वर्ष : नगरपालिका ते महानगरपालिका - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 30 April 2022

नांदेड शहर नागरी प्रशासनाचे ६४ वर्ष : नगरपालिका ते महानगरपालिका

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या स्थापनेला नुकतेच २५ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने सध्या नांदेड मनपा रौप्य महोत्सव सोहळा साजरा करीत आहे. नांदेड नगराचा इतिहास जरी जूना असला किंवा नांदेडचे नागरी स्वरूप जरी प्राचीन काळापासून अस्तित्वात असले तरी, नांदेड शहराचे नागरी प्रशासन मात्र सन १९५२ ते आजतागायत विचारात घेतल्यास केवळ ६४ वर्षाचे झाले आहे


नांदेड शहराच्या विकासाचा व निर्मितीचा उल्लेखनीय असा इतिहास असून प्राचीन, मध्ययुगीन आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंड इत्यादीमध्ये नांदेड शहर हे सामाजिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक इत्यादी बाबतीत महत्वाचे ठिकाण राहिलेले आहे. त्यासोबतच  कधी मोगलांच्या तर कधी निझामाच्या राजवटीखाली राहिलेला नांदेड जिल्हा मराठवाड्यातील दुसऱ्या नंबरचे शहर म्हणून  उल्लेख करावा लागेल. 


औद्योगिक, व्यापार, पर्यटन, तीर्थक्षेत्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व अनेक मान्यवर शिक्षण संस्था इत्यादीमुळे या शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे व वाढत राहणार आहे. शहराचा वाढता आवाका लक्षात घेता सन १९५२ मध्ये स्थापन झालेली व 'अ' दर्जा प्राप्त नगरपालिका असलेली नांदेड नगरपालिका आणि सन १९९५ मध्ये स्थापन झालेली व 'क' दर्जा प्राप्त असलेली वाघाळा नगरपालिका या दोन नगरपालिकांचे क्षेत्र एकत्रीकरण करून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची स्थापना २६ मार्च १९९७ रोजी झालेली आहे. ही स्थापना ‘मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गत व ७४ वी घटना दुरुस्ती कायदा १९९२ (CAA)' अनुसार झालेली असून 'क' वर्ग दर्जा प्राप्त नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत नांदेड शहराबरोबरच खालील ६ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. १) वसरणी, २) कौठा, ३) असरजन, ४) फतेहजंगपूर, ५) असदवन, ६) सिडको व हडको. 


नांदेड नगरपालिकेचा इतिहास : 


नांदेड नगरपालिकेचा कालावधी सन १९५२ ते १९९६ असा ४४ वर्षाचा कार्यकाल आहे. या कालावधी दरम्यान नांदेड नगरपालिकेचे एकूण १८ नगराध्यक्ष झालेले आहेत.


नांदेड नगर प्रशासनात पहिले नगराध्यक्ष म्हणून मा. कै. शंकरराव चव्हाण तर अखेरचे नगराध्यक्ष म्हणून सौ. अन्नपूर्णा ठाकूर ह्या होऊन गेल्या. इतर नगराध्यक्षांमध्ये व्यंकटराव देशमुख, प्रभूसिंग चौधरी, अन्सारी गौस, मोहियाद्दीन, शेषप्पा राखेवार, राधाकिशन अग्रवाल, रामनारायन काबरा, हेमराज मूथा, आयूबखाँ, इलियास खाँ, मोहनराव गोडबोले, मधुकर जालनेकर, म. मकबुलम म. खाजा, पुरूषोत्तम माहेश्वरी, नरेंद्रपाल बरारा, गोविंदसिंह तेहरा, ओमप्रकाश पोकर्णा, चंद्रकांत पाटील, सौ. अन्नपूर्णा ठाकूर इत्यादी नगराध्यक्ष होऊन गेले. सन १९५२ मध्ये नांदेड शहरास केवळ आठ वार्डामध्ये विभाजित केले होते. त्यावेळी १९५१ च्या जनगणनेनुसार नांदेडची लोकसंख्या ६५ हजार एवढी होती. नांदेड नगरपालिकेचे उत्पन्न देखील दोन लाखापर्यंत असेल तेव्हा नगरपालिकेकडे दोन इंजिनियर, दोन स्वच्छतानिरीक्षक आणि २० कारकून असा कर्मचारी वर्ग होता असे असले तरी निझाम कारकिर्दीमध्ये रस्ते, नाल्या, ड्रेनेज ही विकास कामे झालेली असल्यामुळे कार्याचा फारसा ताण पडत नसे. त्याचप्रमाणे रस्ते साफसफाईसाठी लागणारा चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्ग पण होता. सदरील नगरपालिकेला सन १९५६ पासून शासकीय अनुदान सुरू झाले आणि सन १९६० पासून पालिका क्षेत्रात जकात सुरू करण्यात आलेली होती. तेव्हा नगरपालिकेचे उत्पन्न ५ लाख १७ हजाराच्या घरात गेले होते याच दरम्यान ड्रेनेजची भूमीगत व्यवस्था करून हे विकास कार्य करणारी मराठवाड्यातील पहिली नगरपालिका होण्याचा मान नांदेड नगरपालिकेने मिळवला होता. 


नांदेड-वाघाळा महानगरपालिका 


नांदेडच्या औद्योगिक वसाहतीचे रूपांतर नागरी वस्तीमध्ये फारच झपाट्याने होत होते. नागरीकरणाच्या या वेगामुळे सिडको, हडको या परिक्षेत्राची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती आणि वाघाळा ग्रामपंचायतीवर कार्याचा ताण पडू लागला होता. वाघाळा परिसरातील कृषीउद्योग जमीन अकृषीक फारच वेगाने होत होती. म्हणून एम. आय.डी.सी., सिडको, हडको या वस्त्यांना घेऊन वाघाळा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेमध्ये सन १९९५ मध्ये करण्यात आले. पण ही नगरपालिका जास्त काळ काम करू शकली नाही. सन १९९७ मध्ये पहिल्या नगराध्यक्षांच्या कारकिर्दीत नांदेड शहर नगरपालिका जी 'अ' दर्जाची नगरपालिका होती तेव्हा नांदेड नगरपालिका आणि वाघाळा नगरपालिका या दोन नगरपालिकांना एकत्रित करून सन १९९७ मध्ये नांदेड वाघाळा महानगरपालिका स्थापन करण्यात आलेली आहे. त्यावेळी वाघाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संतोष शर्मा होते. तर नवनिर्मित नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणूका आक्टोबर १९९७ मध्ये होऊन पहिला महापौर होण्याचा मान सुधाकर पांढरे यांना प्राप्त झाला, त्यावेळी एकूण ६५ सदस्य होते.

- जयपाल गायकवाड

No comments:

Post a Comment

Pages