प्रतिक्रांतीचे आव्हान रोखण्यासाठी संघर्षा शिवाय तरणोपाय नाही -प्रा.प्रतिभा अहिरे यांचे प्रतिपादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 13 April 2022

प्रतिक्रांतीचे आव्हान रोखण्यासाठी संघर्षा शिवाय तरणोपाय नाही -प्रा.प्रतिभा अहिरे यांचे प्रतिपादन

औरंगाबाद दि.13:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी मूल्यव्यवस्था रुजवली त्याला उखडून टाकण्याचे काम सुरू आहे. प्रतिक्रांतीचे आव्हान परतवून लावण्यासाठी प्रखर संघर्षाशिवाय तरणोपाय नाही असे परखड प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. प्रतिभा अहिरे यांनी मुकुंदवाडी येथे भारतीय दलित पँथरच्या मार्चला संबोधित करताना (दि.13)केले.

     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भारतीय दलित पँथरच्या वतीने अँड.रमेशभाई खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मोटार सायकल रँली व पँथर मार्च उपक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.या रँलीला निळा झेंडा दाखवून,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला. हार घालून सुरवात करण्यात आली. उदघाटनपर भाषण करतांना प्रा.अहिरे बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की,छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिबा जोतिबा, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा माणसाचे माणूसपण उन्नत करणारा क्रांतिविचार प्रवाह आहे. परिवर्तनवादी चळवळीने बाबासाहेबांच्या निर्देशावर वाटचाल न केल्याने देश प्रतिक्रांतिच्या विळख्यात सापडला आहे. शिका,संघटित व्हा,संघर्ष करा याकडे दुर्लक्ष झाले. शत्रू संघटीत झाला आहे.खासगीकरणामूळे शिक्षण,आरक्षण,संरक्षण आणि संविधान धोक्यात आहे. याचा प्रतिवाद संघर्ष करूनच करता येईल. यावेळी अँड.रमेशभाई खंडागळे म्हणाले की,आता गाफील राहीलो तर जे चळवळीने कमावले ते गमावले जाणार आहे.जागृतीचा जागर करण्यासाठी शहरातून हा मार्च काढण्यात आला आहे.

प्रास्ताविक  राज्य प्रवक्ता सुभाष ठोकळ यांनी केले.भारतीय दलित पँथरच्या वतीने वर्षभर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

 यावेळी गणेश चव्हाण,दिलीप गजहंस, रवी मगरे,दत्तू मगरे,संभाजी साबळे, हिरालाल मगरे,सिध्दार्थ ठोकळ,अशोक श्रीखंडे,भगवान बनकर,संजय साळवे,देविदास वाघमारे ,रत्नाकर खंडागळे,प्रमोद ढाले,सिध्दार्थ नरवडे,गौतम इंगळे,बालाजी कांबळे,सुरेश खरात,सुमित वेलदोडे आदिंसह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कार्यकर्ते मोटारसायकल रँलीत सहभागी झाले. क्रांतिचौक,मिलकॉर्नर राजर्षी शाहू महाराज पुतळा,महात्मा जोतिबा फुले,सावित्रीबाई फुले पूतळा औरंगपुरा अभिवादन करून भडकलगेट येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ रँलीची सांगता झाली.या रँलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. आभार रत्नाकर खंडागळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages