उठावचा एक बंडखोर कवी, बबन सरवदे. - विवेक मोरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 14 May 2022

उठावचा एक बंडखोर कवी, बबन सरवदे. - विवेक मोरे

        तसा बबन आमच्या उठावला खुपच उशीरा जाॅईन झाला. अगदी नेमकं सांगायचं तर जेंव्हा उठावचे दुसरे पर्व भोईवाड्यातील महात्मा फुले तांत्रिक विद्यालयात सुरु झाले तेंव्हा बबन आमच्यात सामिल झाला. कोळशालाही लाजवेल असा काळाकुट्ट रंग आणि डोक्यावरचे सगळे केस पांढरे शुभ्र असणारा बबन जरी वयाने लहान असला तरी त्याच्या या एकंदर स्वरुपामुळे तो खुपच प्रौढ दिसायचा. म्हणजे तो त्यावेळेस चाळीस, पंचेचाळीस वयाचा असावा. एकदा भांडुपच्या एका कार्यक्रमात गंमतच झाली. कार्यक्रम संपल्यावर आम्ही चहापानासाठी एका कार्यकर्त्याच्या घरी गेलो. तेंव्हा त्या घरातल्या एका वयोवृध्द बौध्दाचार्याने बबनच्या पाया पडण्याचा हट्टाग्रहच केला. आम्ही त्यांना अनेक वेळा सांगीतले की,;बाबा, तुम्ही आमच्या पेक्षा खुप मोठे आहात. आणि तुम्ही बौध्दाचार्यही आहात.  तुम्ही आमच्या पाया पडणं हे अत्यंत चुकीचं आहे. पण तो बौध्दाचार्य काय ऐकायला तयारच नव्हता..शेवटी तो बबनच्या पाया पडलाच. नंतर कळलं की तो बौध्दाचार्य हा भूतपूर्व पँथर आहे. बबनची पँथरची कविता ऐकून तो अत्यंत प्रभावीत झाला होता. याच कवितेमुळे पुण्याच्या शनिवार वाड्यावर पँथर कवी भाऊ पंचभाई यांनीसुध्दा प्रभावित होऊन त्यांनी बबनला चक्क प्रेमभराने मिठी मारली होती. यापेक्षा मोठा पुरस्कार दुसरा कोणता असू शकतो!

        असे असुनही बबनने आपल्या केसाला कलप लावण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. का केला नाही हे बबनच जाणे. पण बबनला अशा प्रकारचा नकलीपणा अजिबात पसंत नसावा. आपण जसे आहोत तसेच समाजासमोर सादर व्हायला हवे, असे बहुदा त्याला वाटत असावे. बबन हा सिध्दार्थ काॅलनीमध्ये राहतो. रिपब्लिकन पक्षाचे जे अभुतप्रिय ऐक्य ज्या चेंबुरच्या नऊ तरुणांच्या आमरण उपोषणामुळे झाले त्या नऊ तरुणांच्या पडद्यामागचा दहावा तरुण म्हणजे बबन सरवदे होय. या उपोषणामागची सर्व तयारी ही बबनने केली होती. आपण सर्व काही करायचं पण पडद्यावर आपलं नाव येता कामा नये, हा त्याचा स्वभाव मला खुपच आवडला. आणि बघता, बघता बबन उठाव साहित्य मंचाचा प्रमुख कवी झाला.

        बबन उठावमध्ये सामिल झाला आणि त्याच्या आगळ्या वेगळ्या कवितेने त्याने आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. त्यानंतर मात्र उठावच्या प्रत्येक कविसंमेलनात बबन हा माझा उजवा हात झाला. बबन हा घाटकोपरच्या बिएमसीच्या वाॅर्डमध्ये कामाला होता. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्याच्या मुलीचं करोना काळात लग्न झालं आणि ती आता सुखाने संसार करतेय. त्याचा मुलगाही परदेशात कामाला आहे. एकंदर अत्यंत गरीबित आयुष्य कंठणारा बबन आता स्थिरस्थावर होऊ लागलाय. 

        बबनच्या तशा सगळ्याच कविता ह्या जबरदस्तच आहेत. पण मला आवडलेली त्याची एक कविता खुपच जबरदस्त आहे. ही कविता नामांतर आंदोलनात सर्वस्व उध्वस्त झालेल्या एका आईची आहे. त्यात तो म्हणतो......,

ये आये, बाहेर ये!

विद्यापिठाला बाबासाहेबांचं नाव मिळालय!

तुझ्या घरादाराची राखरांगोळी करुन का होईना,

तुझ्यावर पाच,पाच जणांनी बलात्कार करुनका होईना,

तुझा हिरवा चुडा फोडून का होईना,

तुझं कपाळ पांढरं करुन का होईना,

तुझ्या लेकराबाळांचं कत्लेआम करुन का होईना,

पण हे नामांतर झालय!

ये आये, बाहेर ये,

साखर वाट,

आनंद साजरा कर.

आज मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालय! 

नामांतर झालय!

ये आये, बाहेर ये,

आनंद साजरा कर!

ही कविता शब्दशः अशी नसेलही. पण या कवितेचा अन्वयार्थ हाच आहे. सतरा, अठरा वर्षे चाललेल्या नामांतर चळवळीची ही कहाणी. या चळवळीने आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा रोखठोक हिशेब मांडणारी ही कविता. ज्या आंदोलनात आपण सर्वस्व गमावलं आणि आपली एक पिढी बर्बाद केली त्या आंदोलनाची खरच गरज होती काय?; हा रोखठोक प्रश्न विचारणारी ही कविता. नामांतरानंतरची एक वेगळी बाजू मांडून आपल्याला विचार करायला भाग पाडणारी ही कविता निश्चितच आंबेडकरी कवितेतली महत्वाची कविता आहे, असे मला वाटते.

        आणि म्हणूनच मला ही कविता खुपच आवडते. तशा बबनच्या अनेक कविता आहेत की ज्या आपल्या अंगावर चाल करुन येतात. त्याची, 'मनोहर कदमचं काय झालं?' ही कविता फारच लोकप्रिय आहे. त्या कवितेत बबनचा मुलगा त्याला प्रश्न विचारतो की, आपली दहा, अकरा माणसे किड्यामुंग्याप्रमाणे मारणार्‍या त्या नराधम मनोहर कदमचं तुम्ही काय केलत. तेव्हा बबन पँथरचा इतिहास सांगून त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करतो तरीही मुलाचा प्रश्न उभाच असतो. सरते शेवटी बबन आपल्या मुलासमोर आम्ही गांडू झाल्याची प्रांजल पणे कबुली देतो. बबनची ही कविता सगळ्यांनाच स्तब्ध करुन जाते. 

        बबनने त्याचा पहिला वाहिला कवितासंग्रह प्रकाशित केला त्याचे नाव होते, 'आता सूर्यच आमचा आहे'!' याचा थोडक्यात आशय हा की, अरे तुम्ही आम्हाला सवलती काय देताय. आता हा देश, ही दुनिया, हे चंद्र तारेच नव्हे तर आता हा सूर्यच आमच्या मालकीचा झालाय. या कवितेचं मुखपृष्ठ संजय पवारनेच बनवावे, हा बबनचा आग्रह होता. मी फोनवरून संजयला तशी विनंती केली. संजयने सुध्दा हे मान्य केलं. बबनचा हा हस्तलिखित काव्यसंग्रह संजयकडे पोहोचविण्याची जबाबदारी आनंद भंडारेंनी पार पाडली. संजयनेसुध्दा त्याला दहा दिवसानंतर येण्यास सांगीतले. दहा दिवसानंतर आनंद संजयकडे गेला. संजयने त्याला मुखपृष्ठ दिले. ते मुखपृष्ठ पाहताच आनंदचा खुपच गोंधळ उडाला. त्याने संजयला विचारले की, या मुखपृष्ठाचा अर्थ काय? संजय त्याला म्हणाला की, हे मुखपृष्ठ विवेकला दाखव. मग तोच तुला याचा अर्थ सांगेल. परतताना पुण्याच्या एसटीत चढताना आनंदने मला हा किस्सा सांगीतला. मी त्याला म्हटले, संजयने तुला जे काही दिलय ते प्रथम घेऊन ये. मग बघू. आनंद मुंबईत पोहोचल्याबरोबर त्याने आम्हाला ते मुखपृष्ठ दाखविले. एका तव्यामध्ये सिंगल अंड्याचे हाफ फ्राय केलेले ते चित्र होते. ते चित्र पाहताच मी संजयला मनोमन सॅल्युट केला. त्यानंतर मी या चित्राचा अर्थ आनंदला समजाऊन सांगीतला. मी त्याला म्हटलं, कवितासंग्रहाचं नाव काय आहे, की आता सूर्यच आमचा आहे. पण आता तो किती आमचा आहे तर आमच्या घरात आम्ही जो अंड्याचा हाफ फ्राय करतो, इतका तो आता आमचा सहजसाध्य झालाय. हा तव्यातला जो सफेद भाग आहे ती संपूर्ण दुनिया आहे. आणि हा जो पिवळा बलक दिसतोय तो म्हणजे सूर्य आहे. काव्यसंग्रहाच्या नावाला परिपूर्ण न्याय देणारं यासारखं दुसरं मुखपृष्ठ असूच शकत नाही. खरोखर स॔जय पवारच्या या अफलातून कल्पकतेला दाद द्यावीच लागेल. 

        मग काही दिवसातच आम्ही उठाव साहित्य मंचाच्या वतीने माटुंग्याच्या कालिदास नाट्यगृहात बबनच्या या कवितासंग्रहाचे अत्यंत थाटामाटात प्रकाशन केले. अर्थात हा सगळा खर्च आनंद भंडारेंनी केला होता. उठावच्या वतीने आम्ही याबद्दल आनंद भंडारेचे अगदी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. बबनच्या या कविता संग्रहाचं प्रकाशन जेष्ठ कवी भिमसेन देठे यांच्या हस्ते 

झालं. प्रचंड गर्दीत हा कार्यक्रम अत्यंत देखणा झाला. स्टेजवर मोठ्या स्क्रीनवर उठावच्या काही कवींच्या कवितांचा टिझर दाखविला गेला. त्यानंतर काही जेष्ठ साहित्यिकांची बबनच्या कवितेवर भाषणे झाली. शेवटी बबनने आपल्या दोन कविता म्हटल्या आणि या कार्यक्रमाची समाप्ती झाली. हा कार्यक्रम फक्त बबनच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाचा नसून तो उठावच्या परिवाराचाच होता. आणि म्हणूनच या कार्यक्रमात उठावचे सर्व कवी, उठावचे हितचिंतक आणि उठावचा रसिक वर्ग अगदी हक्काने आला होता. 

        साधारण २००५ मध्ये बबनचा हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. या प्रकाशन समारंभाला बबनचे आई वडिल आवर्जून उपस्थित होते. आपल्या पोराचं हे कोडकौतुक त्याच्या आईवडिलानी पाहुन ते कृतकृत्य झाले. बबनचा बाप हा माझ्या बापासारखाच आंबेडकरी चळवळीतील एक सर्वसामान्य कार्यकर्ता होता. बि.सी. कांबळे असो, गवई असो, खोब्रागडे असो किंवा दादासाहेब गायकवाड असो. यांची एकही सभा बबनचा बाप चुकवायचा नाही. आंबेडकरी चळवळीतील ग्रास रुट कार्यकर्ता अर्थात या चळवळीचे जे पायाचे दगड असतात त्या पैकी बबनचा बाप होता. बबनच्या बापानेच बबनला आंबेडकरी चळवळीचे बाळकडू पाजले होते. म्हणून तर बबनसारखा एक विद्रोही कवी आंबेडकरी चळवळीला मिळाला. 

         असा हा बबनचा बाप २००६ मध्ये मरण पावला. जणू काही तो बबनच्या कवितासंग्रहाची वाट बघण्यासाठीच जीवंत राहिला होता. कधीही न रडणारा बबन आपल्या बापाच्या मढ्यावर ढसढसा रडताना पाहून माझेही डोळे ओलावले. त्याच रात्री घरी आल्यावर जे काही वहीवर खरडले त्याची कविता झाली. त्या कवितेचे नाव होते, 'बाप कूणाचा मरु नये!' बबनच्या वडिलांच्या श्रध्दांजली सभेत मी या कवितेचे प्रथम वाचन केले आणि सगळा श्रोतृवर्ग या कवितेने भावनाविवश झाला. नंतर हीच कविता आपल्या नावावर करुन अनेक वाङ्मयीन चोरानी या कवितेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. पण याच वर्षांत ही कविता वृत्तरत्न सम्राटमध्ये प्रसिध्द झाल्याने ही कविता माझीच आहे, याचा सज्जड पुरावा प्राप्त झाल्याने या वाङ्मयीन चोरांची पळता भुई थोडी झाली. असो.

         तर सांगायचा मुद्दा हा की, आज बबन सरवदे हा प्रथितयश कवी म्हणून समाजात प्रस्थापित झाला आहे. अनेक ठिकाणी त्याला कविसंमेलनाचे अध्यक्ष, परिक्षक म्हणून सन्मानाने बोलावले जात आहे. नुकतेच त्याचे एक गाणे आनंद शिदेंच्या आवाजात रेकॉर्ड झाले आहे. हे सगळं ऐकून खुपच समाधान वाटते. आयुष्यात महाविद्यालयाची पायरीही न चढलेल्या बबनला आज मुंबई विद्यापीठ, सिध्दार्थ महाविद्यालय, बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सन्मानपूर्वक आमंत्रित केले जात आहे, हे बघून माझी छाती स्वाभिमानाने छप्पन इंचाची होतेय. कारण एकच की, बबन आमच्या उठावचा कवी आहे. बबनची भावी आयुष्यात अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, ही सदिच्छा व्यक्त करुन इथे थांबतो. जयभीम!

                  - विवेक मोरे

1 comment:

  1. ग्रेट.. बबन सरवदे यांना मानाचा जयभीम

    ReplyDelete

Pages