कल्याण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १०२ वर्षापूर्वी सुरु केलेलं मूकनायक पाक्षिक मराठी पत्रकारितेतील ऐतिहासिक परंपरेची स्थापना करणारी घटना ठरली. मूकनायकचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी मुंबईत प्रकाशित करण्यात आला. आपल्या चळवळीची भूमिका आणि आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी वृत्तपत्राची गरज असल्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आलं होतं. त्या भूमिकेतूनचं बाबासाहेबांनी मूकनायक पाक्षिकाची सुरुवात केली.
मूकनायकाच्या याच धरतीवर दि. १५ मे २०२२ रोजी कल्याण तालुक्यात मूकनायक ते प्रबुद्ध भारत टीम द्वारा आंबेडकरी पत्रकारितेचा वैचारिक जागर घालण्यात येणार आहे. सायं. ५.०० वा. पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगण येथे हा सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार सुजत प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार असून प्रबुद्ध भारतचे वृत्तसंपादक जितरत्न पटाईत, फिल्ममेकर सोमनाथ वाघमारे यांचीही मुख्य उपस्थिती असणार आहे.
यावेळी होणाऱ्या कविसंमेलनात संविधान गांगुर्डे, अनिल शिंदे आणि नवनाथ रानखांबे हे सहभागी होणार असून शाहिर मेघानंद जाधव यांच्या वादळवारा कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. तसेच चित्रकार (Artist) किर्तीराज, पूजा कदम आणि सुनील अवचार यांच्या कलाकृतीचेही मुख्य आकर्षण असणार आहे.
सदर कार्यक्रमास कल्याण तालुका व आसपासच्या सर्व भागातून आंबेडकरी जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीकडून केले जात आहे.
No comments:
Post a Comment