नवी दिल्ली, १९ : मुंबई येथील इंदू मिल मध्ये उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळा निर्माणाचे कार्य वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीची आढावा बैठक गाझियाबाद(उत्तर प्रदेश) येथील राम सुतार आर्ट कंपनी येथे आज आयोजित करण्यात आली. समितीचे अध्यक्ष, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे आणि समितीच्या सदस्य शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी गाझियाबाद येथे सुरू असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी करून बैठकीत आवश्यक सूचना केल्या.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा ३५० फुट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. जगविख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हा पुतळा उभारणार असून गाझियाबाद येथे या पुतळ्याची २५ फुटाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या आधारावरच मूळ पुतळा उभारण्यात येत असल्याने मंत्रिमंडळ उपसमितीने आज या प्रतीकृतीची पाहणी केली. उभय मंत्री महोदयांनी यावेळी पाहणीनंतर राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांना प्रतीकृतीतील आवश्यक रेखीव बाबींविषयी काही बदल करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांनुसार एमएमआरडीए,जे.जे स्कुल ऑफ आर्ट,आय.आय.टी.बॉम्बेची तज्ज्ञ मंडळी आणि स्मारक सल्लागारांच्या मार्गदर्शनाधारे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीत आवश्यक बदल करून मूळ पुतळयाच्या कामाला सुरुवात करावी असे निर्देश श्री. मुंडे यांनी बैठकीत दिले. तसेच, यासाठी राज्यशासनाच्यावतीने आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री द्व्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमीत भांगे, विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंते प्रकाश भांगरे, सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे, शापुरजी पालनजी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक उमेश साळुंखे, शशी प्रभु अँड असोशिएट्सचे प्रकल्प सल्लागार अतुल कविटकर आदि यावेळी उपस्थित होते.
श्री. मुंडे यांनी सांगितले की इंदू मिल येथे नियोजित डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारित संकल्पनेस जानेवारी २०२० मध्ये राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यानुसार स्मारकातील पुतळयाची उंची वाढवून ३५० फूट करण्यात आली. पुतळा उभारण्यासाठी चवथरा निर्माणाचे कार्य सुरु असून याचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. गाझियाबाद येथील राम सुतार कंपनीत पुतळयाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यात आजच्या आढावा बैठकीत काही बदल सुचविण्यात आले आहेत. बदलाअंती उपसमितीच्या मंजुरीनंतर मूळ पुतळा निर्माण कार्यास सुरुवात होणार आहे. मार्च २०२४ पर्यंत स्मारक पूर्ण करण्याचे राज्यशासनाने उद्ष्टि आहे व त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे श्री मुंडे यांनी अधोरेखित केले.
प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्यशासनाने ११०० कोटींच्या सुधारीत निधीस मंजुरी दिली आहे. राज्यशासनाने मार्च २०२२ अखेर २२८ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात स्मारकासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली असून यातील यापैकी २८ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी ३०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यास राज्यशासन कटीबध्द असून बाबासाहेबांचा पुतळा या स्मारकाचे खास वैशिष्ट आहे. देश- विदेशातील बाबासाहेबांचे अनुयायी या स्मारकाला भेट देवून त्यांच्या भव्य पुतळयापासून प्रेरणा घेतील, असा विश्वासही उभय मंत्रिमहोदयांनी यावेळी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment