उन्हाळ्यात फुललेला चित्ताकर्षक ‘बहावा’ निसर्गप्रेमींना खुणावतोय - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 20 May 2022

उन्हाळ्यात फुललेला चित्ताकर्षक ‘बहावा’ निसर्गप्रेमींना खुणावतोय


किनवट, दि.21 (प्रतिनिधी) :  हे दिवस बहाव्याचे आहेत. निसर्गाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला सध्या तुम्हांला सोन्यासारख्या बहाव्याच्या सोनसळी फुलांचे सडे घातलेले दिसतील. ह्या रखरखीत उन्हाळ्यात झाडे सुकलेली असताना गुलमोहोर, बहावा ही झाडे मात्र पूर्ण जोमाने फुललेली असतात. बहावा उन्हाळ्यात पिवळ्या फुलांनी फुलतो. सध्या किनवट तालुक्यातील अंबाडी जंगल व पैनगंगा अभयारण्यातून जाणार्‍या मार्गाच्या दोन्ही बाजूला बहावा आपल्या पूर्ण सौंदर्याने फुललेला पाहाणं म्हणजे पर्यटकांसह निसर्गप्रेमींसाठी मनोहारी नेत्रसुखच आहे.


         उन्हाळ्यात जंगलात फिरताना आपल्याला हे झाड अनेक ठिकाणी दिसून येतं.  खूप उंच नाही आणि अगदी बुटुकबैंगणपण नाही, मध्यमचणीच्या आणि साध्यासुध्या झाडाच्या कशाही वाढलेल्या फांद्या, त्यातच लोंबकळणार्याय त्याच्या रबरी नळ्यांसारख्या शेंगा बघितल्या की लेकुरवाळ्या आईचीच आठवण येते. इतर वेळेस ह्या झाडाचं अस्तित्व सामान्य असतं, पण उन्हाळ्यात याची ‘कळी खुलते’ तेव्हा त्याचं रुपच पालटून जातं. बहावा फुलला की साधारण दीड महिन्यात पाऊस पडतो असं निरीक्षण नोंदवलं गेलंय. आपल्याकडे तसाही मे अखेरीस ‘वळीव’ पडून जातोच. त्यामुळे जूनच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात पाऊस पडायला हरकत नाही. बघू या, कावळे आणि बहावा यांच्या निसर्गखुणा किती खर्‍या ठरतात.  यामुळेच या झाडाला पावसाचा  ‘नेचर इंडीकेटर’ आणि ‘शॉवर  ऑफ फॉरेस्ट’  असेही म्हणतात आणि या वृक्षाबाबतचा अंदाज अचूक असतो असे जाणकार सांगतात. कवियत्री इंदिरा संत यांनी बहाव्यावर एक कविताच लिहिली. त्याची सुरुवात..‘नकळत येती ओठावरती, तुला पाहता शब्द वाहवा, सोनवर्खिले झुंबर लेउन, दिमाखात हा उभा बहावा’ अशी आहे.


           भारतीय उपखंडातील हे मूळचं झाड देखण्या चित्ताकर्षक फुलांच्या माळा आंगोपांगावर वागवणारं म्हणूनच नव्हे तर बहुगुणी, बहुऔषधी, बहुपयोगी म्हणूनही सर्वदूर लोकप्रियता प्राप्त करणारा हा राजवृक्ष आहे.   बहाव्याचे शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिश्चुला’ हे नाव त्याच्या शेंगेवरून पडले. यातलं कॅशिया हे नाव ग्रीक आहे आणि फिश्चुला म्हणजे पोकळ नळी. या दंडगोलाकार लांबलचक शेंगेतला गाभुळलेल्या चिंचेसारखा गर माकडे, कोल्हे, अस्वले, पोपट आवडीने खातात. बहावा ! नितांत सुंदर असलेल्या या झाडाला मराठीत बहावा, संस्कृतमध्ये कर्णिकार, इंग्रजीत लॅबर्नम, गोल्डन शॉवर, हिंदीमध्ये अमलतास, दक्षिण भारतात कणिपू या नावाने ओळखले जाते. संस्कृतमध्ये ‘आरग्वध’ अर्थात रोगांचा नाश करणारा म्हणून ओळखले जाते.


          बहाव्याच्या पिवळ्या, लिंबासारख्या रंगाच्या, 3-4 सेंटिमीटर आकाराच्या या तजेलदार फुलांमध्ये भरपूर पुष्परस असतो. त्यामुळे भुंगे आणि अन्य कीटकांना मेजवानीच मिळते. या कीटकांमुळे पक्ष्यांनादेखील अन्न मिळते. नंतर या झाडाला लांबलचक शेंगा येतात. त्या पिकून मातकट रंग घेतात. त्यात चिकट गराचे आडवे कप्पे असतात. प्रत्येक कप्प्यात एक बी असते. शेंगा पावसाळ्यात गळून पडतात. या शेंगांतील गर औषधी असतो. सारक म्हणजे पोट साफ करण्यासाठी उपयुक्त ठरतो. जंगलात अनेक प्राणी या शेंगा खातात. गुरे मात्र हे झाड खात नाहीत. बहाव्याची वाढ वेगाने होते. चार-पाच वर्षांत शेंगा लागतात. आधुनिक औषधशास्त्रातही बहावा महत्त्वाचा मानला जातो. अँटिऑक्सिडंट, अँटिइन्फ्लामेटरी, हिपॅटोप्रोटेक्टिव्ह, अँटिटयुमरस म्हणून बहावा ओळखला जातो. जखम बरी करण्यास, बुरशीजन्य आजार बरे करण्यास आणि गर्भनिरोधक म्हणूनसुद्धा बहावा ओळखला जातो. विविध त्वचारोग, कफ, रक्तपित्त, गंडमाळा, हगवण, स्त्रियांचे आजार, मधुमेह यावरही बहावा उपयुक्त ठरतो.


          पिवळ्या फुलांचा मंद मंद सुगंध रात्रीस जास्त दरवळतो. फुलांचा मंद कडसर सुगंध रातकिड्यांना मोहून घेतो. या फुलांवर फुलपाखरू, भुंगे मकरंद चाखण्यास अवतीभवती फिरत असतात. त्यांचा तो गुंजारव पाहून आपल्याही मनाला भुरळ पडते. बहावाच्या फुलाला एकसारख्या आकाराच्या पाच पिवळ्या नाजूक पाकळ्या असतात. अशा अनेक कळ्यांचे घोस उलटे जमिनीकडे वाढत राहतात आणि फुले फुलायला सुरुवात होते. मात्र तो फुलांचा गुच्छ बनत नाही. तर ते दोलकाप्रमाणे भासतात. मात्र झुलतात झुंबरासारखे. छताला टांगलेल्या झुंबराप्रमाणे ते फांदीला चिकटलेले असतात. आदिवासी लोक याच्या कळ्यांची आणि फुलांच्या झुबक्याची भाजी करतात. काही लोक याचा गुलकंदासारखा खाद्यपदार्थही बनवतात. अन्य अनेक फळांपेक्षा बहाव्याच्या गरात जास्त कॅल्शियम असते. बहावाच्या फुलांचे घोस हे पंधरा दिवसांपर्यंत टिकतात.

No comments:

Post a Comment

Pages