पैनगंगा अभयारण्यात करता येणार जंगलसफारी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 6 May 2022

पैनगंगा अभयारण्यात करता येणार जंगलसफारी

किनवट,  (प्रतिनिधी) :   निसर्ग तथा वन्यजीवप्रेमींच्या मागणीवरून पैनगंगा (वन्यजीव) अभयारण्य क्षेत्रातील खरबी वनपरिक्षेत्रात खरबी सफारी गेट येथून शुक्रवारी (दि.06) निसर्ग पर्यटन सुरू करण्यात येत आहे. या जंगलसफारी उपक्रमामुळे अभयरण्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन सहा.वनसंरक्षक (वन्यजीव) रवींद्र कोंडावार यांनी केले.


       पैनगंगा अभयारण्य हे यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा ह्या दोन विभागांना विभागणार्‍या पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूस असलेला संरक्षित वनास दिलेले नाव आहे. तीन बाजूंनी पाणी असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी पैनगंगा अभयारण्याची स्थापना ही 1 जानेवारी 1916 रोजी झाली. या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 325 चौरस किलोमीटर आहे. पैनगंगा ही नदी महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी आहे. पैनगंगेच्या उजव्या तीराला कयाधू ही एकमेव नदी मिळते. तर डाव्या तीराला पुस, आरना, अडाण वाघाडी आणि खुनी या नद्या मिळतात. जलाशयाने परिपूर्ण असलेल्या पैनगंगा नदीच्या तीरावर घनदाट पैनगंगा अभयारण्य आहे. या अभयारण्यात साग हा प्रमुख वृक्ष आढळते. या नदीमुळे यवतमाळ जिल्ह्याला अलौकिक वनसंपदा लाभलेली असून, या अभयारण्यात औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या सुमारे 200 जाती आहे.


       घनदाट जंगल आणि आजू बाजूला असलेल्या जलाशया मुळे या अभयारण्यात प्राणी जीवन सर्वाधिक आहे. पैनगंगा अभयारण्याच्या खरबी वनपरिक्षेत्रात  कुसळी, खस, तिरकडी, पवण्या, मारवेल यांसारख्या गवताच्या जाती उगवत असल्याने येथे वाघ, बिबट, अस्वल, लांडगा, रानकुत्रे, तरस, चितळ, सांबर, चौसिंगा, खवले मांजर, मसण्या ऊद, भेकर, काळवीट इत्यादी सोबतच विविध पशुपक्ष्यांचा मोठ्याप्रमाणात वावर आहे. तसेच, या अभयारण्यात सापांच्या विविध जाती व प्रजाती आढळतात. त्यात अजगर, घोणस, धामण, फुरसे, घोरपड आणि लाल तोंडाचा साप या अभयारण्यात बघायला मिळतो. प्राण्यांच्या विविध जातींसोबतच पैनगंगा अभयारण्यात अनेक पक्षी सुद्धा बघायला मिळतात. जकाना, पाणकावळा, पाणपिपुली, अडई, पांढर्‍या मानेचा करकोचा, कुट, हळदी कुंकू


( सॉफ्टबिल बदक ), कोतवाल, पारवा, भोरी, शिक्रा, मोर, गरुड आणि हेरॉन इत्यादी पक्षी पैनगंगा अभयारण्यात आढळतात.


       जंगल जैवविविधतेने समृद्ध असल्यामुळे वन्यप्रेमी पर्यटकांची या अभयारण्यात मुक्तपणे फिरून निसर्गाचा आनंद लुटण्याची फार दिवसांची इच्छा व मागणी होती. पर्यटकांच्या मागणीनुसार क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथील ज्योती बॅनर्जी, तसेच विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) पांढरकवडा येथील किरण जगताप व सहाय्यक वनसंरक्षक पैनगंगा अभयारण्य उमरखेड येथील रवींद्र कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार (दि.06) खरबी सफारी गेट पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या निसर्ग पर्यटनाचे बुकिंग क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या नियंत्रणाखाली ऑनलाईन पद्धतीने ‘ www.magicalmelghat.in ’ या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे. सदर प्रवेशद्वारावरून दररोज सकाळी 05:30 ते 09:30 या कालावधीत सात वाहने व दुपारी 03:00 ते 06:30 या कालावधीत सात वाहने दररोज जंगल सफारी करिता सोडण्यात येणार आहेत. तसेच गर्दीच्या एप्रिल, मे व जून या कालावधीत दोन ऑफलाईन वाहने असे एकूण सोला वाहने सोडण्यात येतील. पैनगंगा (वन्यजीव) अभयारण्य मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असून, लागूनच तेलंगाना या राज्याची सीमा असल्यामुळे सदर प्रवेशद्वार किनवट, नांदेड, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर, आदिलाबाद व हैद्राबाद येथील वनप्रेमी पर्यटकांसाठी पर्वणीचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages