ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत यांना 'जीवनगौरव' पुरस्कार जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 9 May 2022

ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत यांना 'जीवनगौरव' पुरस्कार जाहीर

नांदेड - येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा नाटककार प्रा. दत्ता भगत यांना त्यांच्या वाङमयीन योगदानाबद्दल सत्यशोधक फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून २१ मे रोजी शहरात होणाऱ्या एकदिवसीय महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी राज्यस्तरीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष बालाजी इबितदार, निमंत्रक जी. पी. मिसाळे आणि संयोजन समितीचे अध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे यांनी दिली. यावेळी मानव विकास संस्थेचे अध्यक्ष राज गोडबोले, सत्यशोधक फाऊंडेशनचे अध्यक्ष कोंडदेव हटकर, प्रभू ढवळे, अशोक मल्हारे, मारोती कदम, नागोराव डोंगरे, एन. टी. पंडित, भीमराव हटकर आदींची उपस्थिती होती. 


         प्रा. दत्ता भगत हे नाटककार, समीक्षक आणि फर्डे वक्ते म्हणून मराठी विश्वाला परिचित आहेत.नांदेड येथे संपन्न झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष  होते. जालना येथील मराठवाडा साहित्य संमेलनाचेही हे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. 'वाटा-पळवाटा' हे त्यांचे बहुचर्चित नाटक या शिवाय 'अश्मक', 'खेळीया,' 'पुस्तकी वांझ चर्चा' ही त्यांची नाटके प्रकाशित झाली आहेत. तर 'आवर्त आणि इतर एकांकिका', 'जहाज फुटलं आहे' हे त्यांचे एकांकिका संग्रह आहेत.  पीपल्स कॉलेज, नांदेड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे त्यांनी मराठी विषयाचे  अध्यापन केले आहे, विदयापीठाच्या मराठी विभागाचे ते विभाग प्रमुख ही होते. 


     'दिशा आणि दिशांतर', 'निळी वाटचाल', 'पिंपळपानांची सळसळ', 'समकालीन साहित्य आणि साहित्यिक', 'साहित्य समजून घेताना' आदी समीक्षा ग्रंथातून त्यांनी साहित्य आणि संस्कृती व्यवहाराची परखड समीक्षा केली आहे.  २०१० मध्ये महाराष्ट्र राज्याचे पुढील ५० वर्षांसाठीचे सांस्कृतिक धोरण तयार करण्यासाठी डॉ. आ. ह. साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचे ते उपाध्यक्ष होते. महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीचे ते सदस्य सचिव होते. त्यांना राज्य शासनाच्या पुरस्कारांसह अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.  अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनचा दलित साहित्य लेखन गौरव पुरस्कारही मिळालेला आहे. स्वा.रा.ती.म. विद्यापीठाने जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय कार्याचा वेध घेणारी तब्बल ७५० पानांची कालिक सूची तयार केली आहे. आंबेडकरी चळवळीसाठीचा तो अत्यन्त महत्वपूर्ण असा दस्तावेज आहे.

No comments:

Post a Comment

Pages