म्हणून जग बुद्धाकडे वळले ...!!!-यशवन्त भंडारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 15 May 2022

म्हणून जग बुद्धाकडे वळले ...!!!-यशवन्त भंडारे




आज संबंध जग २५६६ वी बौद्ध पौर्णिमा साजरी करत असताना बुद्धाचे विचार आजही मार्गदर्शक ठरताहेत...  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करण्यामागं  प्राधान्यानं काही खास हेतू होते त्यात सापेक्ष इहवादी, धर्मनिरपेक्ष आणि कर्मकांडविरोधी असलेल्या बौद्ध धम्माच्या अनुसरणामधून अस्पृशांमध्ये चिकटलेलं  पिढीजात गौणत्व नष्ट होईल आणि आधुनिक दृष्टीनं जगाकडं पाहणं त्यांना शक्य होईल... डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा धर्माच्या शोधात होते की जो धर्म  ईश्वरवादी असणार नाही, जो धर्म आध्यात्मिक असला तरी विज्ञाननिष्ठ असेल... त्याचा पाया ज्ञानावर आधारलेला असेल...  

धर्म त्यांना तर्काच्या आणि  बुद्धीच्या कसोटीवर स्वीकारायचा होता आणि बौद्ध धम्म या सर्व बाबतीत इतर धर्मांच्या तुलनेत  अधिक स्वीकार्य वाटला... इहलौकिक जीवनाला आणि मानवी मूल्यांना मध्यवर्गी महत्त्व देणारा एक अनीश्वरवादी तसेच गतिशील धर्म म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची निवड केली आहे ...  बाबासाहेबांच्या  जीवनभराच्या व्यापक चळवळीचा एक भाग म्हणूनच त्याकडं पाहिलं पाहिजे ...

बौद्ध धम्म हा जनवादी आहे... कारण बुद्धाच प्रथम उपेक्षित-शोषित जनसामान्यांसाठी आपल्या धम्माची कवाडं खुली केली... म्हणून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे धम्माचं मध्यवर्ती सूत्र आहे...  बुद्ध केवळ ‘जगात दु:ख आहे.’ सांगून थांबत नाही तर ‘दु:खालाही कारण असतं’ आणि त्या कारणांचं निराकरण करून दु:खाचं निरसन करणं  शक्य असतं , हा आशावाद त्यानं माणसाला दिला ... मानवी प्रज्ञेला आणि विचारक्षमतेला बुद्ध वेसण घालत नाही...  निवडस्वातंत्र्य आणि निवडीचे निकष तो पुरवितो...  जे तर्काला आणि बुद्धीला पटेल तेच घ्यायचे आणि जे तर्काला नि बुद्धिला मान्य होतं  नाही ते सोडून द्यायचे असं त्यानं संगीलतं ... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची  भूमिका धर्मचिकित्सकाची होती...  तर्काला पटेल ते स्वीकारण्याचं आणि न पटेल ते नाकारण्याचं धम्मात दिलेलं स्वातंत्र्य घेऊनच ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ त्यांनी नवदीक्षितांना मार्गदर्शन करण्यासाठीच लिहिला आहे... 

आपण असंही म्हणू शकतो की बाबासाहेबांनी धर्माचे तीन निकष ठेवूनच बौद्ध धम्म अंगीकारला... एक -  तर्कावर टिकेल तेच ग्राह्य ,  दोन - लोककल्याण म्हणजेच बहुजन हित आणि बहुजन सुख, आणि तीन - धर्माचा सर्वच भाग सारखा महत्त्वाचा नसतो... त्यात काही निश्चित स्वरूपाचा असतो तर बराचसा भाग अनिश्चित स्वरूपाचा असतो... म्हणून अनिश्चित भाग परिस्थितीनुरूप नव्या अन्वयार्थानं बदलला पाहिजे ...

बुद्ध म्हणजे असा व्यक्ती ज्यानं आत्मज्ञान आणि बुद्धत्व प्राप्त केलं आहे ... ज्यानं चार आर्यसत्य पूर्णपणे अंगिकारली आहेत ...त्याबाबत त्यास पूर्ण जाणीव आहे ...  बुद्धत्व म्हणजे संबोधी (ज्ञान) प्राप्त केलेला , स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी...  बुद्ध आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे  बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला ...  स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध...  

बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात...  जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात... बुद्धांच्या धम्माला (धर्माला वा तत्त्वज्ञानाला) ‘बौद्ध धर्म' किंवा ‘बुद्धिझम’ म्हटलं जातं ... तथागत बुद्धांच्या  अनुयायांत दोन भाग पडतात ... एक - बौद्ध भिक्खू - भिक्खूनींचा आणि दुसरा -  बौद्ध उपासक - उपासिकांचा... बौद्ध धम्माच्या  अनुयायांना "बौद्ध" किंवा "बुद्धिस्ट" म्हटलं जातं ... 

जगभरातील सर्व देशांमध्ये बौद्ध अनुयायी आहेत...  आशिया खंडाचा  तर बौद्ध धम्म हाच   मुख्य धर्म आहे... आशिया खंडाची जवळपास अर्धी  म्हणजे ४९ टक्के  लोकसंख्या ही बौद्ध धम्म अनुयायांची  आहे... सन  २०१० मध्ये जगभरातील बौद्ध अनुयायांची लोकसंख्या १८० कोटी ते २१० कोटी इतकी होती... जगात सर्वाधिक म्हणजे दोन अब्ज अनुयायी ख्रिस्त धर्माला अर्थात येशू ख्रिस्त यांना लाभले  आहेत ...  तथागत बुद्धांना १.८ अब्ज  लाभलेले आहेत ...  तसेच भारतातील कोट्यवधी पूर्वाश्रमीचे अस्पृश्य  हिंदू धर्मीयांनी आणि जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचं अनुयायित्व पत्करलं आहे...  या सर्व बुद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे... म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी २.३ अब्ज असलेले सर्वाधिक प्रभावशाली धर्म संस्थापक, तत्त्वज्ञ आहेत... 

मागील १० हजार वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप १०० विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठानं तयार केली, त्या यादीत विद्यापीठानं प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवलं होतं ...  जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत... आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात --     " बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारतानं  किंवा जगानं आजपर्यंत निर्माण केला नाही..."

शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) - हे गौतमाचंच  दुसरे नाव ... हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ ... त्यांची जीवन कहाणी, त्यांची प्रवचननं आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले...  गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या...  त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतरही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली... 

गौतम बुद्धांचं सर्व तत्त्वज्ञान हे पाली भाषेमध्ये मांडलं गेलं  आहे... पाली ही बुद्धाच्या काळात पाली ही लोक भाषा होती ... त्यामुळं बुद्धांनी याचं भाषेतून संवाद साधला ...म्हणून ते जगातील पाहिले संवादक ठरले ... भारत हे बौद्ध धम्माची मूळ भूमी असली  तरी भारताबाहेर ही मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार घडून आला...  आजही अनेक देशांमध्ये बौद्ध धम्म हा खूप चांगल्या स्थितीत असल्याचं  पाहायला मिळतं ...   

भारत ही बौद्ध धम्माची मूळ भूमी असली तरी या भूमीतून त्याची मुळं उखडून टाकण्याचे नियोजनबद्धपणे प्रयत्न झाले ... त्यामुळं हा धम्म भरतीयांपासून काहीसा तो दुरावलेला दिसतो...  म्यानमार, कंबोडिया ,तिबेट ,  थायलंड ,दक्षिण व उत्तर कोरिया ,जपान ,चीन आणि श्रीलंका या देशांमध्ये या धर्माचा खूप मोठा प्रभाव आजही कायम आहे ...विज्ञाननिष्ठ विचार देणाऱ्या बुद्ध धम्माकडं सध्या संबंध जग आशेनं पाहत ...

                                   यशवन्त भंडारे 
                            

         

No comments:

Post a Comment

Pages