भीमगीतांची लेखणीचा जादूगार हरपला प्रतापसिंग बोदडे काळाच्या पडद्याआड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 June 2022

भीमगीतांची लेखणीचा जादूगार हरपला प्रतापसिंग बोदडे काळाच्या पडद्याआड


जळगाव:

आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ प्रबोधनकार,वामनदादा कर्डक ह्यांचे पटशिष्य गीतकार,शाहीर,कव्वाल प्रतापसिंग बालचंद  बोदडे  ह्यांचे दि 3 रोजी जळगाव येथे उपचारादरम्यान वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. 


जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगर तालुक्यातील बामनोद हे त्यांचे जन्मगाव दि.२२ जून १९४९ साली त्यांचा जन्म झाला,एदलाबाद हे त्यांचे मूळ गाव जलसाकार बालचंद बोदडे ह्यांचे हे चिरंजीव मुक्ताई नगर येथेच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले मिलिंद महाविद्यालयातून एम.ए इंग्रजी चे शिक्षण घेतलेल्या प्रतापसिंगांचे इंग्रजी,हिंदी व उर्दू भाषेवर विशेष प्रभुत्व होते.

माजी मंत्री गंगाधर गाडे,शिक्षणमहर्षी स्मृतिशेष माधवराव बोरडे, निवृत्त पोलीस उप अधीक्षक दौलतराव मोरे औरंगाबाद शहरातील सर्व गायक,कलावंत ह्यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता.

नागसेनवनात शिक्षण घेत असतानाच प्रतापसिंग ह्यांनी गीत गायन आणि गीते लिहण्यास सुरवात केली तिथेच ते वामनदादांच्या सानिध्यात आले. वामनदादा च्या सोबत अनेक ठिकाणी कोरस करताना प्रतापसिंग ह्यांनी पन आपली ओळख निर्माण केली.

उर्दू व हिंदीत सादरीकरण करण्याची विषेश अदा व रचलेल्या कव्वाल्या ह्या मुळे त्यांना बब्बू कव्वाल म्हणून ओळखले जायचे.

प्रल्हाद शिंदे आणि प्रतापसिंग ह्यांचे रंगलेले सामने खडकी,पुणे येथील रसिकांच्या विशेष लक्षात राहिले.

त्याच कार्यक्रमात प्रल्हाद शिंदे नी तबला व प्रतापसिंग ह्यांनी सुरपेटी वाजवत प्रतापसिंग ह्यांचे चिरंजीव कुणाल ह्यांना गायला लावले होते.

कव्वालीच्या क्षेत्रात राणी रूपलता (अल्ताफ राजा ची आई),अब्दुल रफ चाउस,अजीज शादा ह्यांच्या सोबत कव्वालीचे सामने त्यांनी गाजवले आहेत.

उत्तरा केळकर ह्यांनी गायलेले भीमराज की बेटी,सिने गायक शंकर महादेवन ह्यांनी गायलेले गीते विशेष लोकप्रिय झाली.

कलावंतांनी स्थापन केलेल्या परिवर्तन कला मंचाचे ते उपाध्यक्ष होते.


रेल्वे खात्यातून चीफ गुड्स इन्स्पेक्टर पदावरून निवृत्त झाल्यानंतर आपल्या मूळ गावी मुक्ताईनगर येथे ते स्तिरावले वयाचा त्यांच्यावर कधी परिणाम जाणवला नाही.प्रबोधनासाठी खेडे-पाडे,तांडे,वाड्या-वस्त्या वर उपाशी तापाशी प्रबोधनाचा वसा घेऊन रात्रंदिवस गात राहत असतानाच हाती लेखणी असली की कागदाच्या चिटोऱ्यावर एखादे गीत आपसूकच साकारले जात आणि त्याचे शब्द सुरात गुंफून ते गुणगूणू लागत.


बाबासाहेब-रमाई ह्यांच्या जीवनातील प्रसंगावर भाष्य करणाऱ्या गीतातून आपसूकच ऐकणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळायचे अशी लेखणी असणाऱ्या प्रतापसिंगानी आजवर सुमारे 10 हजार भीमगीतांची रचना केली आहे त्यांनी लिहलेली गीते आनंद शिंदे,मिलिंद शिंदे,प्रकाशनाथ पाटणकर,नागसेन सावदेकर, शंकर महादेवन,उत्तरा केळकर व्हाच्या सह हजारो गायकांची जगण्याची शिदोरी झाली.


भीमराज की बेटी,दोनच राजे इथे गाजले,गुलामी का तूट गया जाल, जयभीम वाला साहेब माझा,नकली जयभीम तुम्हाला करणारे ओळख,तुझ्या पाऊलखुणा भीमराया, तुझं प्रथम नमो हे गौतमा ही गीते अजरामर झाली.

वामनदादा कर्डक ह्यांच्या मुशीत तयार झालेल्या शिष्यांपैकी प्रतापसिंग बोदडे ह्यांनी अल्पावधीतच आपल्या गायकीचा-लेखणीचा ठसा उमटविला वामनदादा-प्रतापसिंग ह्यांच्या अनेक गीतांची शैली सारखीच असायची त्यामुळे वामनदादा चा खरा वारसा समर्थपणे प्रतापसिंग ह्यांनी पुढे चालवला त्यांनी लिहलेले हजारो भीमगिते,कवाल्या अनेक गायकांच्या जगण्याला समृद्ध करत राहिल्या समाजाला दिशा देणाऱ्या,महिलांचे आत्मभान जागृत करणाऱ्या,अन्यायाविरुद्ध पेटून उठवयास लावणाऱ्या,शिक्षणाचे महत्व सांगणाऱ्या गीतातून अनेक युगे समाजाचे प्रबोधन करत राहील.

त्यांच्या पश्चात पत्नी माया,चार मुली,एक मुलगा गायक कुणाल,नातवंडे व शिष्य असा मोठा परिवार आहे.

मुक्ताईनगर येथे हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत प्रतापसिंग-वामनदादा ह्यांनी लिहलेल्या गीतांच्या स्वरात,समता सैनिक दलाच्या संचलनात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यांचा अंत्यविधी पार पडला.


गीतात लिहून ठेवली होती अंतिम इच्छा


माझ्या अस्थी वरी फुलत्या फुलांची बाग राहावी 

त्याच बागेची फुले सकाळी भीमाला वाहावी


महुला दीक्षाभूला चैत्यभूला अस्थी पसरवा 

त्याच पवित्र मातीला ही माझी माती मिळावी


माझ्या अस्थीमधूनी पिंपळाचे वृक्ष फुलावे 

त्या वृक्षावरीच पाखरांची घरटी असावी


आंधळया माणसाला माझे डोळे दान करावे 

डोळे भरून त्याने भीमाची तसवीर पाहावी


जयभीम बोलताच अंती माझा श्वास सुटावा

 प्रतापसिंगा अंत्य यात्रा गाता गाता निघावी


असा हे भीमशाहीर,गीतकार,गझलकार,कव्वाल एक उमदे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...!

No comments:

Post a Comment

Pages