पैनगंगा अभयारण्यात चितळाची शिकार करणार्‍या तीन आरोपींना रंगेहाथ अटक खरबी (वन्यजीव) वनपरिक्षेत्राची कारवाई - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 22 June 2022

पैनगंगा अभयारण्यात चितळाची शिकार करणार्‍या तीन आरोपींना रंगेहाथ अटक खरबी (वन्यजीव) वनपरिक्षेत्राची कारवाई

किनवट,दि. :  पैनगंगा अभयारण्यामध्ये चितळाची शिकार करणार्‍या तीन आरोपींविरुद्ध खरबी वनविभागाने वनगुन्ह्याची नोंद करून  सोमवारी (दि.20) सकाळी 7.30 वाजता अटक केली आहे.


   वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरबी वनपरिक्षेत्राच्या वनअधिकार्‍यांना रविवारी (दि.19) रोजी रात्री नऊ वाजता खबर्‍यांकडून गुप्त माहिती मिळाली की, पैनगंगा अभयारण्याच्या वडगाव नियतक्षेत्रालगत कोठारी येथील डायमंड ज्युबली शाळेच्या पाठीमागे अभयारण्यातून चितळ या वन्यप्राण्याची अवैध शिकार करून आणलेली आहे. सदर बातमीची व त्यातील आरोपींची खातरजमा करून घेतल्यानंतर वनकर्मचार्‍यांनी आरोपीच्या डुकराच्या फार्महाऊसजवळील आडोशाला रविवारी रात्री दहा वाजेपासून  नियोजनबद्ध सापळा लावून दबा धरून बसले.  सोमवारी सकाळी 7.30 वाजता आरोपी बाबू बुद्धाजी हनुमानदास याला चितळाच्या अवयवासहित फार्महाऊसवर आल्यानंतर त्यास झडप घालून रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी आरोपीकडून वन्यप्राणी चितळाचे अवयव मुंडके (शिंगासहित), कातडी, पाय (चार नग), जप्त करण्यात आले. दरम्यान त्याची कसून चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यातील त्याचे सोबती मारोती नामदेव आरमाळकर  व मारोती माधव मेंडके यांची नावे त्याने सांगितले. त्यातील आरमाळकराच्या घराची झडती घेतली असता,त्या घरामध्ये शिकारीसाठी वापरण्यात येणारे जाळे (वाघुर) 5 नग जप्त करण्यात आले. सदर जाळे मारोती मेंडकेच्या मालकीचे असल्याचे त्यांच्याकडून कळाले. यातील मारोती आरमाळकर याच्यावर यापूर्वीही अभयारण्यामध्ये रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार केल्याचा गुन्हा दाखल आहे. या तिघां आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9,27,29,44 व 51 अन्वये वनगुन्हा क्रमांक 06075/03/2022 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

      सदर आरोपींना उमरखेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असून, या शिकारीत अजून किती आरोपींचा समावेश आहे याची चौकशी सुरू आहे.  सदरील चौकशी विभागीय पांढरकवडा येथील वनाधिकारी (वन्यजीव) किरण जगताप, पैनगंगा अभयारण्याचे सहा.वनसंरक्षक  भारत खेलबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खरबीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर, वनपाल व्ही.बी.इंगळे व व्ही.आर.सिंगनजुडे, वनरक्षक एस.एल.कानडे, ए.के.मुजमुले,बी.आर.काशीदे, जे.व्ही.शेंबाळे,जी.एस.मुंडे, पी.आर.तांबे  हे करीत आहेत. सदर मोहीम फत्ते करण्यात तौसिफखान, विनोद कागणे, मारोती पाचपुते, कृष्णा देवरे, संजय वंजारे,देवराव भरकाडे यांचा सहभाग होता

No comments:

Post a Comment

Pages