किनवट,(प्रतिनीधी) : महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा येत्या 23 ते 25 जून या कालावधीमध्ये नांदेड जिल्हा दौरा प्रस्तावित असून, ही समिती दि. 24जून रोजी किनवट प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या तालुकानिहाय क्षेत्रांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा-वसतीगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणांकडून करण्यात आलेल्या कामांना ही समिती भेट देऊन त्याची पाहणी करणार आहे. त्यानंतर या सर्व कामांबाबत संबंधित अधिकार्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी दिली असून, या समितीत त्यांचाही समावेश आहे.
सदर अनु.जमाती कल्याण समिती जिल्ह्यांतील विविध कार्यालयांतर्गत सन 2018-19 ते एप्रिल 2022 अखेरपर्यंत अनुसूचित जमाती प्रवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी इत्यादीसह सदर प्रवर्गातील लोकांसाठी राबविण्यात येणार्या कल्याणकारी योजनासंदर्भात चर्चा करणार आहे.
या समितीचे प्रमुख आमदार दौलत दरोडा हे असून, यात जिल्ह्यातील तीन आमदारांचा समावेश आहे. त्यात भाजपचे आ.डॉ.तुषार राठोड, किनवट आदिवासीबहुल भागातील आमदार भीमराव केराम आणि काँग्रेसचे आ.अमरनाथ राजूरकर यांचा समावेश आहे. समितीत स्थानिक आमदार राहिल्यास अधिकार्यांना त्यांचा काहीसा आधार मिळतो व प्रशासनाची एखादी लंगडी बाजू ते सांभाळून घेऊ शकतात असा कयास असू शकतो. यांच्या सोबतच समितीत डॉ.अशोक उईके, श्रीनिवास वनगा, महेंद्र दळवी, अनिल पाटील, शिरीष चौधरी, सहसराम कोरोटे, राजेश मडावी, राजकुमार पटेल, दिवाकर रावते, रमेशदादा पाटील किरण सरनाईक व बाळाराम पाटील असे एकूण 15 विधिमंडळ सदस्य आहेत.
पहिल्या दिवशी दि.23 जून रोजी सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे समिती सदस्य प्रथम लोकप्रतिनिधींची बैठक घेतील या तीन दिवसांच्या भेटीदरम्यान ही समिती जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद यांच्याकडील अनुसूचित जमातीविषयक तसेच निधीचा विनियोग, आस्थापना बाबी यांचा आढावा घेणार आहे. ही समिती शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतीगृह तसेच विविध योजनांच्या सुरू असलेल्या कामांनाही भेटी देणार आहे. दि. 25 जून रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व यंत्रणांच्या अधिकार्यांसोबत आढावा बैठक घेऊन ही समिती कामांना दिलेल्या भेटींच्या अनुषंगाने आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात करावयाची कार्यवाही याबाबत चर्चा करणार आहे. तसेच वेगवेगळ्या कार्यालयातील अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान उपस्थित झालेल्या मुद्द्यांविषयीसुद्धा चर्चा करणार आहेत.
No comments:
Post a Comment