किनवट तालुक्यात शंखी गोगलगायींचा पिकांवर प्रादुर्भाव एकात्मिक व्यवस्थापनासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 17 July 2022

किनवट तालुक्यात शंखी गोगलगायींचा पिकांवर प्रादुर्भाव एकात्मिक व्यवस्थापनासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन


किनवट,दि.17 (प्रतिनिधी) : किनवट तालुक्यामध्ये सद्यपरिस्थितीमध्ये बर्‍याच ठिकाणी सोयाबीन, कापूस, भाजीपाला व विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सोयाबीन, कापूस यासारख्या पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगायींचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. काही भागांमध्ये पिकांचे कोंबच शंखी गोगलगायींनी फस्त केल्याने शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली आहे.  त्यामुळे शेतकर्‍यांनी गोगलगायींच्या या आपत्तीला वेळीच ओळखून उपाययोजना करण्याचा सल्ला किनवट तालुका कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.


    गोगलगायींच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने ज्या उपाययोजना सुचविल्या आहेत, त्यात शेतकर्‍यांनी शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आतमध्येच मरून जातील.



     शेतामध्ये किंवा बागेमध्ये 7 ते 8 मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर ढीग वा गोणपाटाखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावीत. लहान शंखीसाठी मिठाची फवारणी किंवा कॅल्शिअम क्लोराईडचासुद्धा नियंत्रणासाठी बर्‍याच ठिकाणी वापर केला जातो.शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा अथवा चुन्याचा 5 सें.मी. रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नियंत्रणासाठी टाकावा.सोयाबीन व कापूस यासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दोन किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे



       फळबागेमध्ये झाडांच्या खोडास 10 टक्के बोर्डोंपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाहीत. गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा. तसेच  फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे. शंखी गोगलगाय प्रामुख्याने पपईची रोपे व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात; म्हणून मेटाल्डिहाईडच्या (स्नेलकिल) गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात मरतात. जर हे आमिष उपलब्ध न झाल्यास, पुढील प्रकारे आमिष तयार करून बागेमध्ये टाकून घ्यावे. दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक 25 ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण 50 किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. 10 ते 12 तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामिथोक्झाम 50 ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे. सदरील आमिषा पासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे. सदरील गोगलगायनाशक अथवा अमिषाचा वापर प्लॅस्टिक हातमोजे घालूनच काळजीपूर्वक करावा, अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून, अधिकच्या माहितीसाठी आपल्या नजीकचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



“किनवट तालुक्यातील काही शेतकरी विषारी औषध चोळलेले चुरमुरे शेतात टाकून त्याद्वारे गोगलगाय नियंत्रणाचा प्रयत्न करीत आहेत. मात्र असे विषारी चुरमुरे खाऊन पशुपक्षी मरण्याचा धोका संभवतो. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने केलेल्या शिफारशीप्रमाणे  कार्यवाही करुन शंखी गोगलगायींचे नियंत्रण करावे. तसेच  शंखी गोगलगायीचा  प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल, त्या भागातील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या दिलेल्या उपाय योजना केल्यास गोगलगायीचे नियंत्रण लवकरात लवकर व अधिक प्रभावीपणे होते.”


- बालाजी मुंडे. तालुका कृषी अधिकारी,किनवट

No comments:

Post a Comment

Pages