दमदार पावसामुळे किनवट तालुका झाला पाणीदार नऊही मंडळात जोरदार पाऊस; नदीनाल्याकाठच्या शेतीचे नुकसान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 13 July 2022

दमदार पावसामुळे किनवट तालुका झाला पाणीदार नऊही मंडळात जोरदार पाऊस; नदीनाल्याकाठच्या शेतीचे नुकसान

किनवट,दि.13 (प्रतिनिधी) :   गत चार दिवसापासून किनवट तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग चालू असून,  मंगळवारी सकाळी संपलेल्या गत चोवीस तासात तालुक्यातील एकूण नऊ मंडळामध्ये धोधो पाऊस बरसला आहे. नऊ मंडळातील एकूण पाऊस 375.5 मि.मी.झाला असून, त्याची सरासरी 41.72 आहे.  तालुक्यातील नदी,नाल्यांसह पैनगंगा दुथडी भरून वहात असल्यामुळे, काठालगतच्या शेतात पाणी शिरून पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बाधित शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. पूर परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून सर्व विभाग सतर्क झाले आहेत.


  मंगळवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून,  कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे.  किनवट- 38.0 (369.7 मि.मी.); बोधडी- 38.0 (445.6 मि.मी.); इस्लापूर- 32.5 (543.3 मि.मी.); जलधरा- 32.5 (470.4 मि.मी.); शिवणी- 46.3 (543.7 मि.मी.); मांडवी- 47.8(308.9 मि.मी.);  दहेली- 47.8 (307.3 मि.मी.), सिंदगी मो. 44.8 (302.5 मि.मी.); उमरी बाजार 47.8 (336.7 मि.मी.).

   तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 3,628.1  मि.मी.असून, त्याची सरासरी 403.12 मि.मी.येते.  आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस इस्लापूर मंडळात झाला होता. तो आता बदलला असून, सध्या आतापर्यंतच्या सर्वात जास्त पाऊसाची नोंद शिवणी मंडळात झालेली आहे. आतापर्यंत सर्वात कमी दहेली मंडळात झालेला होता तो बदलून आता सर्वात कमी पावसाची नोंद सिंदगी मोहपूर मंडळाच्या नावाने झाली आहे.. तालुक्यात मंगळवार 12 जुलै पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस 304.5 मि.मी.असून, या तुलनेत 132.4 टक्के पाऊस पडलेला आहे. जो की, अति समाधानकारक आहे. 01 जून ते 30 सप्टेंबर या चार महिन्यादरम्यान तालुक्यात पडणारा वार्षिक पाऊस 951.90  मि.मी. असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात 42.35 टक्के पाऊस पडलेला आहे.  मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत पडलेला पाऊस 417.90 मि.मी. होता.  30 सप्टेंबर पर्यंतच्या वार्षिक पावसाच्या तुलनेत  त्याची टक्केवारी 137.24 होती.


             गत तीन वर्षापासून रेंगाळत होणार्‍या महामार्गावरील प्रधानसांगवी गावाजवळील पुलाच्या बाजूचा वळणरस्ता दरवर्षी सारखा वाहून गेल्यामुळे, सकाळपासून वाहतुक पूर्णत: खोळंबलेली असून दुधगावजवळील नदीच्या पाण्यात एका अवजड वाहनाने पलटी खाल्लेली आहे. शनिवारपेठ येथे एका घराची मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याचे कळते. मालमत्ता वा जिवित हानीबाबत तहसील प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

No comments:

Post a Comment

Pages