विकास कामांमुळे अपघात होणार नाही याची काळजी घ्या : आपत्कालीन व्यवस्थापनाच्या बैठकीत महापौरांच्या प्रशासनाला सूचना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 12 July 2022

विकास कामांमुळे अपघात होणार नाही याची काळजी घ्या : आपत्कालीन व्यवस्थापनाच्या बैठकीत महापौरांच्या प्रशासनाला सूचना

नांदेड: शहर व परिसरात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावरील खड्डे आणि सुरू असलेल्या कामांमुळे अपघात होऊ नये यासाठी महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने खबरदारीच्या उपायोजना कराव्यात अशा सूचना महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांनी आज दिल्या . महानगरपालिकेत आज महापौर सौ. जयश्री निलेश पावडे यांचे अध्यक्षतेखाली शहरातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली या बैठकीत त्या बोलत होत्या. नांदेड शहराचा कायापालट करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विकासाची अनेक कामे सुरू आहेत. शहरातील रस्ते विकासाची कामे झपाट्याने सुरू असून अनेक भागात रस्त्याची कामे प्रगतीपथावर आहेत . मात्र ज्या भागात रस्त्याची कामे सुरू आहेत अशा भागात एक पदरी रस्ता सध्या वाहतुकीसाठी खुला आहे . ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे त्या ठिकाणी संबंधित कंत्राटदाराने रस्त्याचे काम सुरू आहे किंवा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे अशा प्रकारचे सूचनाफलक लावावेत. बॅरिकेट उभारून रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करावा. ज्यामुळे रात्री आणि पावसाच्या वेळेत अपघात होणार नाहीत. नागरिकांच्या जीविताला धोका होणार नाही .त्यांना इजा पोहोचणार नाही .यासाठी काळजी घेतली जावी अशा सूचना महापौर सौ. जयश्री पावडे यांनी दिल्या. यासोबतच शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पाऊस उघडल्यानंतर तातडीने खड्डे बुजविण्याचे अनुषंगाने उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांनी दिल्या आहेत. बैठकीस उपमहापौर अब्दुल गफार ,मनपाचे आयुक्त डॉ.सुनील लहाने,  अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे , गिरीश कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्यासह महानगरपालिकेतील विविध विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages