सशस्त्र दरोड्याच्या तयारीतील पाच दरोडेखोरांना रंगहाथ अटक सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त ; पोलीसांच्या सतर्कतेमुळे विपरित घटना टळली - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 31 July 2022

सशस्त्र दरोड्याच्या तयारीतील पाच दरोडेखोरांना रंगहाथ अटक सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त ; पोलीसांच्या सतर्कतेमुळे विपरित घटना टळली

किनवट,दि.31 (प्रतिनिधी) :  गुप्तखबर्‍याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या तब्बल सहा दरोडेखोरांपैकी पाचजणांना ताब्यात घेतले. गडबडीत सहावा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना शुक्रवारी (दि.29) रात्री 11.05 वाजता गोकुंदा मधील ईदगाह मैदानाच्या परिसरातील इरीगेशन कॉलनी जवळ घडली.


  पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, येथील पो.उपनिरीक्षक सय्यद चाँदपाशा नूरजहाँ आपल्या ताफ्यातील कर्मचार्‍यांसह शुक्रवारी रात्री पेट्रोलींग करीत होते. त्याचवेळी खबर्‍याकडून गोकुंदा येथील इरीगेशन कॉलनीजवळ एक टाटासुमोमध्ये काही माणसे संशयास्पदरित्या ‘रेकी’ करीत असून, त्यांचा दरोडा घालण्याचा उद्देश  दिसत असल्याची माहिती दिली. प्राप्त झालेली खबर वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीपथक इरीगेशन कॉलनीजवळ पोहोचल्यानंतर त्यांना तिथे आढळलेल्या टाटा सुमोवर छापा मारून अडविली असता, त्यात सहा व्यक्ती बसलेल्या दिसल्या. त्यांना पकडून चौकशी करीत असतांनाच त्यातला एकजण हिसका देऊन अंधाराचा फायदा घेत पसार झाला. सुमोची झडती घेतली असता त्यात तीन धारदार तलवारी, लोखंडी रॉड, अर्धा किलो लाल मिरची पावडर, मजबूत दोरी असा दरोडा टाकण्याकरिता वापरले जाणारे साहित्य आढळले. ताब्यात घेतलेल्या पाच जणांचे मोबाईल व टाटा सुमो क्र.एम.एच.34 - एए 9664 ही जीप मिळून 3 लाख 29 हजार 100 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेले आरोपी विकासकुमार बिरजन यादव (वय 20 वर्षे), अविनाश शंकर कुशनपल्लीवार (22) व लबज्योतसिंग हरदेवसिंग देवल (20), हे तिघेही राहणार सोमनाथपूर, वार्ड नं.13, साईनगर, राजूरा जि.चंद्रपूर येथील असून, चौथा संतोष भारत परचाके (22) रा.बेर्डी, ता.राजुरा, जि.चंद्रपूर तर पाचवा प्रज्वल राजकुमार वनकर (23) रा.मुदोली, चेक नं.02, ता.चामरोची, जि.गडचिरोली चा राहणारा आहे. पाचहीजण बेकार असल्याचे पोलीसांकडून कळाले. सहावा फरार झालेला आरोपी आशिष एकनाथ जाबोरा हाही सुरूवातीच्या तिघांसोबत सोमनाथपुर्‍यातच राहणारा आहे. पोलिसीखाक्या दाखविल्यानंतर सर्व आरोपींनी दरोडाच्याच उद्देशाने आल्याचे कबूल केल्याचे सूत्रांकडून कळाले.


   पो.उपनि.सय्यद चाँद पाशा यांच्या फिर्यादीवरून गुरनं 151/2022 कलम 399 भा.दं.वि.सहकलम 4/25 भारतीय शस्त्र अधिनियम कायद्यान्वये किनवट पो.स्टे.मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपविभागीय पो.अधिकारी विजय डोंगरे व पो.नि.अभिमन्यू साळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शक सूचना केल्यात. प्रत्यक्ष कार्यवाहीत पो.उप निरीक्षक सय्यद चाँदपाशा नूरजहाँ, जमादार पांढरे,  पो.ना.गजानन डुकरे, पो.शिपाई इनकर यांचा सहभाग होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरक्षक गणेश पवार हे पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Pages