शिरसमाळ येथे लाखो वृक्षांचे होतेय रोपण - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण; • शिरसमाळ येथे 120 हेक्टरवर एक लक्ष 32 हजार वृक्षांचे होणार रोपन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 7 July 2022

शिरसमाळ येथे लाखो वृक्षांचे होतेय रोपण - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण; • शिरसमाळ येथे 120 हेक्टरवर एक लक्ष 32 हजार वृक्षांचे होणार रोपन

औरंगाबाद, दि. 07  :  मराठवाड्यातील वनक्षेत्र कमी आहे. परंतु वन विभाग, मराठवाडा इको टेरियर्सकडून शिरसमाळ येथे 120 हेक्टरवर एक लक्ष 32 हजार वृक्षांचे रोपन करून वनक्षेत्रात वाढ करण्याचे प्रयत्न होत आहेत. याशिवाय शिरसमाळ परिसरातील 46.79  हेक्टरवरील गायरान जमीनही वृक्षलागवडीसाठी  देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज स्पष्ट केले. ग्रामस्थांच्या सहकार्यानेच शिरसमाळचे जंगल साकारत असल्याचे श्री.चव्हाण म्हणाले.

वन, मराठवाडा  इको टेरियर्स, सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद तालुक्यातील  शिरसमाळ येथे वृक्ष रोपाची लागवड करून जिल्ह्यातील वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ ‍जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्याहस्ते आज झाला. या कार्यक्रमास मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, वनसंरक्षक शिवाजीराव फुले, मराठवाडा इको टेरियर्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम.ए. खान, कॅप्टन हीत मेहता आदींची  उपस्थिती होती. यावेळी इतर मान्यवरांनीही वृक्षरोपाची लागवड केली.  

दाट झाडीतून शुद्ध ऑक्सिजन मिळतो. निरोगी आयुष्यासाठी शुद्ध हवा प्रत्येकाला आवश्यक आहे. वन विभागाच्या नियमांप्रमाणे याठिकाणी वन विभाग, मराठवाडा इको टेरियर्सकडून वृक्षारोपन करण्यात येत आहे.  वनाचे सर्व कायदे, नियम या भागात लागू होतात. त्यानुसार ग्रामस्थांनीही वन कायद्याची अंमलबजावणी करण्यास सहकार्य करावे. ग्रामस्थांना आवश्यक पिण्यासाठी पाणी, वीज, रस्ता, शाळा, शेतीला जोड व्यवसायासंबंधी आवश्यक मार्गदर्शन, पात्र लाभार्थ्यांना गाय-म्हैस मिळावी यासाठी सहकार्य व प्रस्ताव तयार करण्याचे मार्गदर्शन आदीप्रकारची सर्वोतोपरी मदत जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याची ग्वाही श्री. चव्हाण यांनी ग्रामस्थांना संवाद साधताना दिली. वृक्ष लागवड मोहिमेतून सध्या उपलब्ध होत असलेल्या रोजगार निर्मितीचा लाभही ग्रामस्थांना मिळत असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. जंगलाच्या संवर्धन, संरक्षणासाठी शिरसमाळ  ग्रामस्थांनी सहकार्य करावे, वृक्ष लागवड मोहिमेत हिरीरीने सहभाग घ्यावा, असेही ते म्हणाले.

रोप लावणे, त्यांचे संवर्धन करत वृक्षात रूपांतर करणे मेहनतीची,  मोठी प्रक्रिया आहे. परंतु मराठवाड्याच्या वनक्षेत्रात वाढ व्हावी यासाठी वन विभाग, मराठवाडा इको टेरियर्स, सामाजिक वनीकरण, ग्रामस्थ, महसूल प्रशासन एकोप्याने व चांगले काम करत असल्याचा आनंद असल्याचेही श्री. चव्हाण म्हणाले. जिल्हाभरात  2017 पासून 672 हेक्टरहून अधिक ठिकाणी वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली आहे. आता शिरसमाळच्या या वृक्ष लागवडीमुळे मराठवाड्याचे वृक्षाच्छादन वाढेल, अशी अपेक्षाही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर वृक्ष लागवड मोहिमेसाठी आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याची ग्वाही अधिकारी, कर्मचारी यांना श्री. चव्हाण यांनी दिली.

पुढच्या पिढीचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी माती, पाणी, वृक्षाचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्याचबरोबर शिरसमाळ येथील अतिक्रमण काढून या भागात मोठ्याप्रमाणात वनक्षेत्रात वाढ करण्यात येत असल्याचे श्री. गुजर म्हणाले.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्नल खान यांनी  केले. शिवाय जिल्हा प्रशासन इको टेरियर्सला करत असलेल्या सहकार्याबद्दल आभारही त्यांनी मानले.


No comments:

Post a Comment

Pages