औरंगाबाद : राज्यात आलेल्या नवीन सरकारमध्ये औरंगाबादच्या वाट्याला मंत्रीपद, पालकमंत्री , कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. तर या पार्श्वभूमीवर शहरातील गुलमंडी भागात व्यापारी आणि नागरिकांनी शौचालय नसल्याने आम्हाला मंत्री नको आम्हाला शौचालय द्या, अशा प्रकारचे बॅनर बाजारपेठेत ठिकठिकाणी लावले आहेत. त्यामुळे या बॅनरची एकच चर्चा सध्या रंगली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार बंड करत शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत हात मिळवणी करत सत्ता स्थापन केल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याला अनेक मंत्रीपद मिळण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
एकीकडे बंडखोर आमदार मंत्रीपद मिळावा म्हणून मुंबईत शक्तिप्रदर्शन करत आहेत.
तर दुसरीकडे याच औरंगाबादच्या मुख्य बाजारपेठ गुलमंडी भागात व्यापारी एक वेगळ्या समस्येने त्रस्त आहेत. गुलमंडी ही औरंगाबाद शहराची प्रमुख बाजारपेठ समजली जाते. या बाजारपेठेत रोज हजारो ग्राहक खरेदीसाठी येत असतात. मात्र या परिसरामध्ये अनेक वर्षापासून असलेले शौचालय हे महानगरपालिकेने तोडले आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, स्थानिकांनी बाजारपेठेच्या अवतीभवती आम्हाला मंत्रीपद नको, आम्हाला पालकमंत्री नको, आम्हाला केंद्रीय मंत्री नको आम्हाला शौचालय द्या, अशा आशयाचे बॅनर विविध ठिकाणी लावले आहे. त्यामुळे या बॅनरची एकच चर्चा सध्या रंगली आहे.
No comments:
Post a Comment