चवदार तळे ते सुराणा घटना.. जाती संस्थेचा विध्वंस हाच उपाय दीपक कदम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 20 August 2022

चवदार तळे ते सुराणा घटना.. जाती संस्थेचा विध्वंस हाच उपाय दीपक कदम

 


सुराणा जिल्हा जालोर राजस्थान या गावातील अनु जाती तील इंद्रकुमार मेघवाल या तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाने सुवर्णांसाठी ठेवलेल्या मडक्यातून पाणी का पिले या कारणास्तव बेदम मारहाण केली , यात या विद्यार्थ्यास आपले प्राण गमवावे लागले. ही घटना संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना 15 ऑगस्ट च्या पूर्वसंध्येला  घडली व स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर भारतातील सामाजिक विषमता यातून पुढे आली. 

 15 ऑगस्ट रोजी गुजरात मध्ये बिलकीस बानो यांच्यावर बलात्कार करणाऱ्या व त्यांच्या कुटुंबातील तीन वर्षाच्या मुलगी  सोबत 14 व्यक्तींची हत्या करणाऱ्या 11 आरोपीं ची जन्मठेपेची शिक्षा माफ करून त्यांना मुक्त करण्यात आले. देशभरात दहा लाख पेक्षा अधिक कच्चे कैदी आहेत ज्यात अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे त्यांना मात्र जेलमधून सोडण्यात येत नाही. याच दरम्यान भंडारा येथे एका आदिवासी महिलेवर अत्यंत क्रूरपणे अत्याचार करण्यात आला निर्भया कांडसारखे ही घटना पण याकडे ना शासनाचे लक्ष आहे ना मीडियाचे ना कोणत्या मेणबत्ती पेटवून आंदोलन करणाऱ्या संघटनेचे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भारतातील अनुसूचित जाती जमाती ओबीसी व अल्पसंख्यांक यांना मिळणारी विषमतेची वागणूक व त्याविषयी असंवेदनशील असलेली मीडिया शासन प्रशासन व संघटना यांचे खोटे राष्ट्रवादी मुखवटे गळून पडत आहेत.

मानवी मूलभूत अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा इतिहासिक सत्याग्रह केला होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा शाळेत अस्पृश्य म्हणून वर्गात बसू दिले जात नसे व  सुवर्णांच्या भांड्यातून पाणी पिऊ दिले जात नसत. कोलंबिया विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन परत आल्यावर बडोदा संस्थान येथे सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुवर्णांच्या भांड्यातून पाणी दिले जात नसेल. अस्पृश्य असल्यामुळे त्यांना संस्कृत ही भाषा घेता आली नाही त्या ऐवजी त्यांना पारशी या भाषेची निवड करावी लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्तर काळामध्ये ज्यावेळेस ते अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या पाहण्यासाठी आले त्यावेळेस सुद्धा पाण्याचा हौद बाटवला म्हणून स्थानिक अल्पसंख्यांक व्यक्तींनी बरीच आरडाओरड केली होती. एवढेच नाही तर लाहोर येथील जात पातक तोडक मंडळाच्या अध्यक्षपदावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे Annihilation of cast  हे भाषण मतभेदामुळे  करू देण्यात आले नाही जे पुढे पुस्तक रूपात त्यांनी प्रकाशित केले.   डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपण ते उच्च शिक्षण घेऊन परत आल्यानंतर बडोद्यातील अनुभव, लाहोर जात तोडक मंडळाचा अनुभव, वेरूळ अजिंठ्याचा अनुभव ,उच्चशिक्षित होऊन मंत्री असो वां  देशाचे संविधान निर्माते  जातीच्या आधारावर अस्पृश्यतेची वागणूक मिळते म्हणजे शिक्षण घेऊन आपण कितीही मोठे झालो किंवा आर्थिक दृष्ट्या आपण कितीही सक्षम झालो तरी या देशात शेवटी तुमचे मूल्यांकन मनुवादी जाती व्यवस्थेच्या आधारावरच होते.

राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे व काँग्रेसच्या नेत्या लोकसभेच्या माजी अध्यक्ष व मंत्री मीरा कुमार यांनी आपले वडील जगजीवन राम यांना सुद्धा शाळेत पाणी न देता भेदभाव केल्याचे घटनेचे स्मरण याप्रसंगी केले. जगजीवन राम यांनी आयुष्यभर गांधीवादाचा पुरस्कार केला व काँग्रेसची कास धरली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता समूळ उच्चाटन करण्यासाठी गांधींचा विरोध केला व त्यांनी धर्मांतरांच्या माध्यमातून जाती संस्थेच्या समूळ नष्ट करण्यासाठी

 उपाय दिला. जगजीवन राम यांचा मार्ग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मार्ग यामध्ये ही भिन्नता आहे.

नवभारताच्या निर्मितीसाठी व राष्ट्र म्हणून  राष्ट्रवादाच्या निर्मितीसाठी जाती संस्थेचा विध्वंस होणे ही पहिली अट असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 च्या भारतीय संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणामध्ये स्पष्ट केले. जाती संस्थेच्या विध्वंस तून भारत एक राष्ट्र म्हणून उभे टाकणार नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये ठासून सांगितले. त्यामुळे उठता बसता राष्ट्र व राष्ट्रवाद म्हणणाऱ्या भारतातील सर्व राजकीय पुढारी सामाजिक क्षेत्रात काम करणारे , विचारवंत हे भारतातील जाती संस्थेच्या समूळ उच्चाटनासाठी नेमका काय उपाययोजना करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. जातीसंस्थेचे उच्चाटन न करता  प्रथम उपचार करणाऱ्या विचारवंत ,नेते ,संघटना यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उपाय अमलात आणण्यासाठी कृत संकल्पबद्ध होणे आवश्यक आहे तेव्हाच या देशात समता प्रस्थापित होईल व हे राष्ट्र म्हणून उभे टाकेल.


सुराणा सारख्या घटने वर आपल्या तीव्र प्रतिक्रिया रस्त्यावर देण्यापूरते आंदोलने न करता जाती व्यवस्थेचे समूळ उच्चाटन कसे होईल यासाठीची दीर्घकालीन रणनीतीवर आपण काम करणे आवश्यक आहे. बुद्धिजीवी विचारवंतांनी आपले जातीतील अनुभवावर आधारित आत्मकथन लिहून प्रसिद्धी मिळवण्यापुरता विचारवंत न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या आधारावर जातिव्यवस्थेच्या समूळ उच्चाटनासाठी  सामाजिक रणनीती ,राजकीय रणनीती व आर्थिक रणनीती तयार करण्यावर भर दिला पाहिजे

अशा घटना ंना समोर ठेवून मनूवादी राजकीय ताकत ही आपल्या काही प्याद्यांना  पुढे आणते व त्यांना प्रसिद्धी माध्यमात आपला नेता म्हणून प्रसिद्धी दिली जाते किंवा काही अपरिपक्व संघटना व नेते स्वतःला चमकवण्यासाठी अशा घटनेचा दुर्दैवाने वापर करतात .

आम्हाला वीज निशुल्क मिळेल, पाणी, अन्न ,कपडे ,निवारा किंवा थोडेफार शिक्षण सुद्धा आम्हाला निशुल्क मिळेल पण या देशातील जातीव्यवस्था संपुष्टात आणण्याचे काम कोणीही करणार नाही ते फक्त आंबेडकरवादी संघटना व आंबेडकरवादी शासनच करू शकेल

संविधान सभेत बाबासाहेबांनी सामाजिक लोकशाही व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट भारतीय समोर ठेवले होते ज्याचा विसर सर्वांना पडलेला आहे.

तेव्हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आर्थिक लोकशाही व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध होऊ या व देशात समता स्वातंत्र्य बंधुत्व व न्याय याच्या आधारावर येथील समाज व्यवस्था  व अर्थव्यवस्था निर्माण करून नवभारत निर्माण करण्याचा संकल्प  करुया.

दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन, नांदेड

जयवर्धन भोसीकर , मिडलपथ न्यूज

No comments:

Post a Comment

Pages