नवी दिल्ली, 15 : भारतीय स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सचिव तथा प्रभारी निवासी आयुक्त डॉ.निधी पांडे यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह राष्ट्रगीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलन झाले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ.निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योतकौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.महाराष्ट्र सदनात निवासास असणारे अतिथी तसेच दिल्ली स्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
तिरंगा रॅली
कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर डॉ.निधी पांडे आणि डॉ.निरुपमा डांगे यांच्या नेतृत्वात कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनापर्यंत ‘तिरंगा रॅली’ काढण्यात आली. महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी ,महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान या रॅलीत सहभागी झाले. ‘घरोघरी तिरंगा’ , ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘स्वातंत्र्यदिन चिरायु होवो’ अशा घोषणांनी वातावर देशभक्तीमय झाले होते.
महाराष्ट्र खाद्य महोत्सवाला खवय्यांची पसंती
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात ‘महाराष्ट्र खाद्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले, यास खवय्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सदनाच्या उपहार गृहात सचिव तथा प्रभारी निवासी आयुक्त डॉ.निधी पांडे यांच्या हस्ते व निवासी आयुक्त डॉ.निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार आणि प्रभारी उपसंचालक अमरज्योतकौर अरोरा यांच्या उपस्थित या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन झाले. या खाद्य महोत्सवात दिल्लीकरांनी मोठया संख्येने सहभागी होत महाराष्ट्राच्या पारंपरिक व्यंजनांचा आस्वाद घेतला . यावेळी राज्याच्या वैविद्यपूर्ण खाद्य संस्कृतिचे दर्शन घडले व लज्जतदार व्यंजनांचा खवय्यांनी आस्वाद घेतला.
दरम्यान, राजधानीतील लाल किल्ल्यावर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व त्यांनी देशाला संबोधित केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
No comments:
Post a Comment