किनवट, दि.22 : सध्या वातावरणातील बदलामुळे किनवट तालुक्यातील बर्याच भागात सोयाबीनवर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा या रोगाचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. हा रोग विषाणूमुळे होत असून, याचा प्रसार पांढरी माशी या रसशोषणार्या किडीमुळे होतो. त्वरित याचे नियंत्रण न केल्यास, जास्त प्रादुर्भाव झाल्यावर याचे नियंत्रण करणे जिकिरीचे ठरते. परिणामी या रोगामुळे सोयाबीनच्या उत्पादनात 15 ते 75 टक्के पर्यंत घट येऊ शकते, अशी माहिती बोधडी, इस्लापूर, शिवनी या अतिवष्टीमुळे सर्वाधिक बाधित झालेल्या भागाची पिक पाहणी करताना तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी ही माहिती दिली.
या केवडा रोगाची लक्षणे म्हणजे सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरांजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात. त्यानंतर पाने जशी परिपक्व होत जातात तशी त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. दाण्यामधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो. विषाणूचा प्रसार मुख्यतः पांढरी माशी या किटकाद्वारे होतो.
शेतकर्यांनी सोयाबीनवरील पांढरी माशी आणि पिवळा मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन करण्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात, अशी शिफारस तालुका कृषी कार्यालयाने केली आहे. पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव झालेली पाने, झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावीत, जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल. वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे. रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढर्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थायोमिथॉक्झाम (25 टक्के) 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. मूग, उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अशा पिकावरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे.
पांढर्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावेत. फवारणीसाठी किटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा. कमीत कमी पहिले 45 दिवस पीक तणमुक्त ठेवावं. पावसाचा ताण पडल्यास पिकाला संरक्षित पाणी द्यावं. बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी. जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.
“ किनवट तालुक्यात सोयाबीन पिकाचे यंदाचे पेरणी झालेले क्षेत्र 25 हजार 062 हेक्टर असून, कापसानंतर सर्वाधिक पेरणी झालेले दुसर्या क्रमांकाचे पीक आहे. शेतकर्यांची त्यावरच जास्त भिस्त असल्यामुळे, सोयाबीन वरील पिवळा मोझॅक (केवडा) रोगाची लक्षणे वेळीच ओळखून त्याचे त्वरित व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. पांढर्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका तंत्र व्यवस्थापक (आत्मा) यांच्याशी संपर्क साधावा.”
बालाजी मुंडे. तालुका कृषी अधिकारी,किनवट.
No comments:
Post a Comment