नांदेड,दि.23 :
'माझ्या कवितेचं वर्णन समीक्षकांनी विविध प्रकारे केलं आहे.कुणी दलित भूमीनिष्ठ स्त्रीवादी,तर कुणी आंबेडकरवादी स्त्रीवादी असं म्हटलं आहे.पण माझ्या मते ती राजकीय कविता आहे' असे विचार प्रख्यात कवयित्री डाॅ.प्रज्ञा दया पवार यांनी व्यक्त केले.मराठी विभाग,पीपल्स काॅलेज व नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केन्द्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रकट मुलाखत प्रसंगी त्या बोलत होत्या.मराठी विभाग प्रमुख डाॅ.अनंत राऊत यांनी ही मुलाखत घेतली.आपले मत स्पष्ट करताना डाॅ.पवार म्हणाल्या,'इथे राजकीय म्हणजे संसदीय राजकारणाच्या दृष्टीने मांडणी करणारी कविता असा अर्थ नाही.एखादी कवयित्री स्त्रीच्या दु:खाबद्दल लिहिते तेव्हा ती समस्त स्त्रीशोषणाबद्दलची कविता असते.अशा ठिकाणी जे व्यवस्थात्मक राजकारण असतं त्याचं चित्रण करण्याचं काम माझी कविता करते.जेवढं वंचितांचं साहित्य आहे ते सगळं हस्तक्षेपाचं साहित्य असतं.हा हस्तक्षेप राजकीय स्वरूपाचा असतो.या अर्थानं माझी कविता राजकीय आहे'
जवळपास दीड तास रंगलेल्या या प्रकट मुलाखतीतून डाॅ.प्रज्ञा दया पवार यांनी आपला काव्यप्रवास उलगडून सांगितला.भारतीय स्त्रीवाद आणि पाश्चिमात्य स्त्रीवाद यामधे आपल्याला फरक वाटत नाही असेही ठाम प्रतिपादन त्यांनी केले.आधुनिक स्त्रीवादाने भगिनीभाव निर्माण केला.त्यामुळं जगातील सर्व स्त्रीशोषणाची दु:खं आणि त्याविरुध्द बंडाची भावना आपली कविता चित्रित करते,असं त्या म्हणाल्या.व्यवस्था परिवर्तनाकडे जाण्याचा एक मार्ग म्हणून आपण कवितेकडे बघतो,असं डाॅ.पवार म्हणाल्या.
सूत्रसंचालन प्रा.कल्पना जाधव यांनी केले तर आभार डाॅ.आर.पी.बारबिंड यांनी मानले.या कार्यक्रमास प्रा.दत्ता भगत,श्री.अभय कांता,उपप्राचार्य डाॅ.अशोक सिध्देवाड,डाॅ.श्रीनिवास पांडे,डाॅ.यशपाल भिंगे,डाॅ.बालाजी पोतुलवार,प्रा.माया खरात,डाॅ.रेखा वाडेकर,डाॅ.विजयकुमार माहुरे आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment