किनवट,ता.१९(बातमीदार): महाराष्ट्रातील कुपोषण संपुष्टात यावे यासाठी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तयार झालेल्या राज्यस्तरीय गाभा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या समितीचे अध्यक्ष राज्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी किनवट व माहूर तालुक्यातील अंगणवाडीच्या असलेल्या रिक्त जागा त्वरीत भरण्याचे आदेश दिले आहे. ह्या जागा त्वरीत भराव्यात, वरील कार्यवाही त्वरीत करून तसा अहवाल सादर करण्याचे महीला व बालविकास अधिकारी जि.प. नांदेड यांना सुचविले आहे. सदर मागणी या राज्य स्तरीय गाभा समितीचे मराठवाड्यातील एकमेव असलेले सदस्य किनवटचे डॉ. अशोक बेलखोडे यांनी मागील अनेक दिवसांपासून लावून धरली होती. प्रत्येक बैठकीत त्यांनी यासंबंधी पाठपुरावा करून हे आदेश प्राप्त केले आहेत.
किनवट व माहूर हा आदिवासी शेड्युल भागात मोडत असतांना सुध्दा या परिसराकडे कायमच दुर्लक्ष झालेले आहे. या दोन्ही तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण इतर आदिवासी भागाच्या तुलनेने कमी असले तरी कुपोषण कमी करणारी यंत्रणाच कुपोषीत असल्याचे अनेक दिवसांपासूनचे वास्तव चित्र आहे.
किनवट तालुक्यात अंगणवाडी सेविकांच्या (३७० पैकी २८) तर मदतनीसाच्या (३७९ पैकी ९१) अशा एकुण ११९ जागा मागील दोन – तीन वर्षापासून रिक्त आहेत. माहूर तालुक्यातही एकुण अंगणवाडी ताई व मदतनीस यांच्या ३०८ पैकी ११३ जागा रिक्त आहेत, ही बाब अत्यंत गंभीर असून सातत्याने दुर्लक्षीत केल्या गेलेली आहे, असे डॉ. अशोक बेलखोडे यांनी जिल्हा व राज्य स्तरावरील बैठकांमध्ये पोटतिडकीने सातत्याने हा प्रश्न मांडून शेवटी आदेश पदरात पाडून घेतले आहे.
या संदर्भात प्रधान सचिव यांच्या आदेशाचे पालन ताबडतोब करून अहवाल सादर करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा महिला व बालकल्याण अधिकारी यांनी सदर बैठकीत सांगितले आहे.
अनेक दिवसापासून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे व पुन्हा पुन्हा हा विषय ऐरणीवर आणल्यामुळे सदरचे यश प्राप्त झाले आहे व हा आदेश दोन्ही तालुक्याच्या कुपोषण निर्मुलनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असे सांगून डॉ. अशोक बेलखोडे यांनी या बाबत समाधान व्यक्त केले आहे. याच प्रमाणे उपजिल्हा रूग्णालय, गोकुंदा येथे जिल्हा पातळीवरील पोषण पुनर्वसन केंद्र अशाच पध्दतीने पाठपुरावा करीत मंजूर करून घेतले व त्याचे बांधकामही लवकरच सुरू होणार आहे, अशीही माहिती डॉ. बेलखोडे यांनी दिली.
No comments:
Post a Comment