किनवट तालुक्यात दुसर्‍या दिवशीही पावसाचे थैमान ; नऊ महसूल मंडळापैकी आठमध्ये अतिवृष्टी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 13 September 2022

किनवट तालुक्यात दुसर्‍या दिवशीही पावसाचे थैमान ; नऊ महसूल मंडळापैकी आठमध्ये अतिवृष्टी

किनवट, दि.13 (प्रतिनिधी) :  तालुक्यातील तीन महसूल मंडळात रविवारी अतिवृष्टीची नोंद झाली होती. लगेच दुसरे दिवशी सोमवारी एकूण नऊ मंडळापैकी किनवट थोडक्यात बचावले असून, इतर आठही मंडळात पावसाने कहर केल्यामुळे जबरदस्त अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. जुलैमध्ये सहा वेळा तर सप्टेंबरच्या गत 12 दिवसात तीन वेळा धरून या मान्सूनमध्ये तालुक्यात तब्बल नऊवेळा अतिवृष्टी झालेली आहे.  किनवट तालुक्यात सोमवारी (दि.12) सकाळी साडेदहा पर्यंत संपलेल्या 24 तासात तालुक्यात एकूण 1,060.5 मिलीमीटर पाऊस पडला असून, त्याची सरासरी 117.83 येते.


      या मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली आहे. बर्‍याच विश्रांतीनंतर परवाच्या दमदार पावसाने अतिवृष्टीचे किनवट, जलधारा व इस्लापूर हे तीन मंडळ वगळता इतर मंडळातील पिकांना बराच दिलासा मिळालेला होता.  पावसाच्या कालच्या रौद्ररूपाने उरल्या-सुरल्या पिकांची पूर्णत: वाताहत झालेली आहे. अनेक भागातील शेतांच्या सखल भागात पाणी साचले असून, नदीकाठच्या शेतात पाणी शिरून, पिके खरडल्या गेली आहेत. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे.


     बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दबाव प्रणालीच्या प्रभावामुळे दक्षिण-पूर्व विदर्भाचा काही भाग व मराठवाड्याच्या बहुतांश भाग दाट ढगांनी व्याप्त राहून, या भागात पावसाचा जोर वाढेल, असे भाकित हवामान विभागाने  केले होते. त्यानुसार, सर्वत्र पावसाचे थैमान सुरू आहे. भारत मौसम विभागाच्या निकषानुसार 0.1 ते 2.4 मि.मी.पर्यंत पडलेला पाऊस हा खूप हलका पाऊस समजला जात असल्यामुळे, तेवढा पाऊस पडल्यास त्या दिवशी पाऊस पडल्याची नोंद घेतल्या जात नाही. 2.5 ते 15.5 मि.मी.पर्यंत पडणार्‍या पावसाला ‘हलका’ पाऊस समजले जाते. 15.6 ते 64.4 मि.मी.पर्यंत पडणारा पाऊस हा ‘मध्यम’ स्वरूपाचा समजला जातो. 64.5 ते 115.5 मि.मी.पर्यंत पडणारा पाऊस हा ‘अतिवृष्टी’ अथवा ‘जोरदार’ पावसात गणल्या जातो. त्यानंतरचा 115.6 ते 204.4 मि.मी.पर्यंत पडणारा पाऊस म्हणजे ‘जोरदार अतिवृष्टी’ अन् 204.5 मि.मी.च्या पुढे ‘अत्यंत जोरदार अतिवृष्टी’ समजल्या जाते.


      उपरोल्लेखित मानदंडानुसार किनवट तालुक्यातील बोधडी, मांडवी, दहेली, सिंदगी मोहपूर व उमरी बाजार या  पाच मंडळात अतिवृष्टी तर इस्लापूर, जलधारा व शिवणी या तीन मंडळात जोरदार अतिवृष्टी झालेली आहे. तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून सोमवार (दि.12) पर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 11,055.7 मि.मी.असून, त्याची सरासरी 1,228.41  मि.मी.येते. तालुक्यात सोमवार दि.12 सप्टेंबर पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस 849.4 मि.मी.असून, या तुलनेत 144.6 टक्के पाऊस पडलेला आहे.  तालुक्यातील 01 जून ते 30 सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यातील पावसाची सरासरी 951.90 मि.मी.आहे. या अपेक्षित पावसाच्या  तुलनेत आतापर्यंत तालुक्यात 129.05 टक्के पाऊस पडलेला आहे.  मागील वर्षी 12 सप्टेंबरपर्यंत पडलेला पाऊस 1,149.80 मि.मी. होता. 30 सप्टेंबर पर्यंतच्या वार्षिक पावसाच्या तुलनेत  त्याची टक्केवारी 135.37 होती.


 रविवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून,  कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे.  किनवट- 54.0 (1,146.9 मि.मी.); बोधडी- 76.3 (1,221.1 मि.मी.); इस्लापूर- 191.8 (1,495.5 मि.मी.); जलधरा- 191.8 (1,416.3 मि.मी.); शिवणी- 158.0 (1,271.7 मि.मी.); मांडवी- 87.3 (1,117.8 मि.मी.);  दहेली- 100.8 (1,154.2 मि.मी.), सिंदगी मोहपूर 94.0(1,129.4 मि.मी.); उमरी बाजार 106.5 (1,102.8 मि.मी.).

No comments:

Post a Comment

Pages