स्वारातीम विद्यापीठात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त परिसंवाद व प्रदर्शन स्वातंत्र्य चळवळीतील आदिवासींच्या शौर्यगाथेचा विसर पडू देऊ नका -प्रोफेसर डॉ.श्यामराव कोरेटी यांचे प्रतिपादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 13 September 2022

स्वारातीम विद्यापीठात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त परिसंवाद व प्रदर्शन स्वातंत्र्य चळवळीतील आदिवासींच्या शौर्यगाथेचा विसर पडू देऊ नका -प्रोफेसर डॉ.श्यामराव कोरेटी यांचे प्रतिपादन


नांदेड: आदिवासी समाजाने इंग्रजांची गुलामगिरी कधीच स्वीकारली नाही. ब्रिटिशांविरुद्ध वेळोवेळी सशस्त्र बंड आणि संघर्ष करून आदिवासी समाजाने आपल्या शौर्याने व बलिदानाने राष्ट्र रक्षणात मोलाची  भूमिका पार पाडली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करतांना हा खरा इतिहास जाणून घ्यायला घ्या. स्वातंत्र्य चळवळीतील  आदिवासींच्या शौर्यगाथेचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथील प्रोफेसर डॉ.श्यामराव कोरेटी यांनी केले.   
  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वातंत्र्य चळवळीत अनुसूचित जमातींच्या नायकांचे योगदान” या विषयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी होते. यावेळी प्र.कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, दिल्ली येथील  जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील  प्राध्यापक फिरमी बोडो तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याच्या सेंद्रिय शेती बीज प्रमाणीकरण समितीचे सदस्य श्री.चैत्रामजी पवार आणि किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उत्तम धुमाळे हे उपस्थित होते.
यावेळी डॉ.श्यामराव कोरेटी म्हणाले की, तिलका मांझीचे पहाडिया आंदोलन, कोया जमातीचे बंड, कोल जमातीचा सशस्त्र संघर्ष, बिरसा मुंडाचा अविस्मरणीय संघर्ष, सिद्धू-कान्हू यांच्या नेतृत्वाखालील संथाल चळवळ, नागा चळवळ कधीच विसरता येणार नाही.  आदिवासीची ही संघर्ष गाथा प्रकाशात आणायला हवी. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील  प्राध्यापक फिरमी बोडो म्हणाल्या की, आदिवासी नायकावर अजूनही पुरेसे संशोधन झालेले नाही. अनुसूचित जनजाति आयोगाची माहिती अजूनही आदिवासी पर्यंत पोहचली नाही, असे सांगून आदिवासींच्या विकास व न्याय्य हक्काच्या विविध योजनांची  माहिती अशा लोकांपर्यंत पोहचली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. 
अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरू डॉ.उद्धव भोसले म्हणाले की, विद्यापीठाचे किनवट येथील कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र आता अधिक गतिमान झाले आहे. संशोधन व प्रशिक्षण यासाठी तेथे विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा अधिकाधिक लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. 
महाराष्ट्र राज्याच्या सेंद्रिय शेती बीज प्रमाणीकरण समितीचे सदस्य श्री.चैत्रामजी पवार आणि किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उत्तम धुमाळे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी या आदिवासी नायकाच्या शौर्यगाथा विषयावरील पोस्टर प्रदर्शन देखील भरविण्यात आले.दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत शहाणे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक तथा सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ.घन:श्याम येळणे यांनी केले. या कार्यक्रमास आदिवासी विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages