मराठवाडा मुक्तिसंग्राम चित्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रदर्शन रविवारपर्यंत राहणार खुले विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 21 September 2022

मराठवाडा मुक्तिसंग्राम चित्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रदर्शन रविवारपर्यंत राहणार खुले विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 औरंगाबाद, दिनांक 21 :  मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये सहभागींचा चित्ररूपी इतिहास, प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांची माहिती सिद्धार्थ उद्यानातील चित्र प्रदर्शनात पहावयास मिळत आहे. या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांसाठीचे चित्र प्रदर्शन रविवारपर्यंत (ता.25) सकाळी साडे नऊ ते साडे सहा वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विद्याथी, नागरिकांना केले. 

 जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा माहिती कार्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेने सिद्धार्थ उद्यानात भरवलेल्या चित्र प्रदर्शनाला स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक, लोक प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला मोठ्याप्रमाणात भेट देत आहेत. मुक्तिसंग्रामाचा इतिहास जाणून घेत आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्तिसंग्राम दिनी केले होते. प्रदर्शनास केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी भेट देऊन चित्र प्रदर्शनाचे कौतुक करत नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन औरंगाबादकरांना केले आहे. 

 प्रदर्शनास देवगिरी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन किशोर शितोळे, आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या प्रमुख पूनम पाटील, ज्युबली पार्क येथील गृहपाल सुनिता लासे, चंद्रकला गजभारे, कृषी सहायक संजीव साठे पाटील, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाची विद्यार्थीनी शारदा खोकले, धनेश्वरी नर्सिंग कॉलेजची सुमित्रा पावरा, रिना वसावे, उज्ज्वला बहिरम, कलावती पावरा, नैनिका वसावे आदी आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थींनी, संबोधी अकादमीचे डॉ. कैलास फुलंबरकर, प्रा. भाग्यश्री सातदिवे आदींसह अकादमीतील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी प्रदर्शनास भेट देऊन प्रदर्शनाची संकल्पना आणि आयोजकांचे कौतुक केले. यासह नागरिकांनी या प्रेरणादायी अशा प्रदर्शनाचा लाभ घ्यायला हवा, असे आवर्जून सांगितले. 

देशभक्तीपर गीत, स्केच पेंटिंग

 चित्र प्रदर्शनातील देशभक्तीपर माहिती वाचून प्रभावित झालेल्या भारत प्रतिभूती मुद्रणालयातून सेवानिवृत्त झालेले सुभाष धिंगण यांनी देशभक्तीपर गीत गायले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेला उत्स्फूर्त दाद दिली. याचठिकाणी चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या जे. जे. स्कूलमधून उत्तीर्ण असलेला व मूळचा धुळ्यातील प्रशांत सोनवणे याने धिंगण यांचे केवळ दहा मिनिटात हुबेहुब स्केच पेंटिंग रेखाटली. त्याच्या कलेचेही  उपस्थितांनी कौतुक केले. 


No comments:

Post a Comment

Pages