सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलांची गरुडझेप ; पाच विद्यार्थ्यांना कँम्पस निवडीद्वारे मिळाले २१ लाखापर्यंतचे पॅकेज - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 23 September 2022

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलांची गरुडझेप ; पाच विद्यार्थ्यांना कँम्पस निवडीद्वारे मिळाले २१ लाखापर्यंतचे पॅकेज

पुणे, दि. २३: शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमधून कोणत्याही खासगी वसतिगृहांपेक्षा उत्कृष्ट आणि अधिक सुविधा मोफत मिळत असून गुणवंत विद्यार्थी त्यांचा लाभ घेत आपल्या आयुष्याला आकार देत आहेत. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विश्रांतवाडी येथील तीन वसतिगृहातील पाच विद्यार्थ्यांची कँपस मुलाखतीद्वारे नामांकित खासगी कंपन्यांमध्ये निवड झाली असून त्यांना सुमारे १३ ते २१ लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.


सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी तालुका, जिल्हा तसेच विभागीय स्तरावरील वसतिगृहे सुरू केलेली आहेत. यामध्ये वसतिगृहाच्या स्वरुपानुसार कनिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक महाविद्यालय, बिगर व्यावसायिक वरिष्ठ महाविद्यालय तसेच विद्यालय स्तरावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.


मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मोफत निवास, नाश्ता, जेवण, वसतिगृहाच्या स्वरुपानुसार ५०० रुपये ते ८०० रुपये निर्वाह भत्ता, कला, विज्ञान, वाणिज्य कनिष्ठ ते वरिष्ठ महाविद्यालय, पदविका, पदवी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, शारीरिक शिक्षण महाविद्यालय आदी अभ्यासक्रमांच्या स्वरुपानुसार शालेय विद्यार्थी, तसेच महाविद्यालयाचा ड्रेसकोड असल्यास दरवर्षी गणवेशांच्या दोन जोडांसाठी रक्कम, वैद्यकीय ॲप्रन, स्टेथोस्कोप लॅब ॲप्रन, बॉयलर सूट, ड्रॉईंग बोर्ड, स्टेशनरी व इतर साहित्य, शैक्षणिक सहल, प्रकल्प (प्रोजेक्ट) आदींसाठी नियमानुसार रक्कम मुलांच्या बँक खात्यावर जमा केली जाते.


विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आवारात संत ज्ञानेश्वर शासकीय वसतिगृह विश्रांतवाडी,  १००० क्षमतेचे शासकीय वसतिगृह युनिट- १ विश्रांतवाडी आणि शासकीय वसतिगृह कोरेगाव पार्क अशी तीन सर्व सुविधायुक्त सुसज्ज शासकीय वसतिगृहे आहेत. येथे राहणाऱ्या किरण उत्तम केळगंद्रे, पियुष संजय चापले, शुभम राजकुमार सोमवंशी, प्रितेश अमोल शंभरकर आणि स्वप्निल मारुती जोगदंड यांची मुलाखतीद्वारे नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.


औरंगाबाद जिल्ह्यातील पानवी बु. ता. वैजापूर येथील किरण केळगंद्रे या विद्यार्थ्याने सांगितले, आईवडील शेतमजुर असल्याने घरची परिस्थिती कठीण होती. अशातही जिद्दीने, कष्टाने दहावी तसेच बारावीच्या आणि सीईटीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवल्याने पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेत इलेक्ट्रॉनिक ॲण्ड टेलिकम्युनिकेशन या बी. टेक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. गुणवत्ता क्रमांकानुसार १००० क्षमतेचे शासकीय वसतिगृह युनिट- १ येथे प्रवेश मिळाला. 


किरणने येथील मोफत, निवास तसेच अन्य सोयीसुविधांबरोबरच ग्रंथालय, अभ्यासिका, मोफत वायफाय- इंटरनेट सुविधा आदींचा पुरेपूर वापर करत अभ्यासास पोषक वातारवणाचा लाभ घेतला. त्याचा फायदा संस्थेत घेण्यात आलेल्या कँपस इंटरव्यूव्हमध्ये झाला आणि २१ लाख वार्षिक वेतनाचे पॅकेजवर ‘सॅमसंग सेमीकंडक्टर इंडिया रीसर्च’ (एसएसआयआर) कंपनीच्या बंगलोर प्लँटसाठी निवड झाली आहे.


अशाच पद्धतीने नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा, ता. नरखेड येथील पियुष संजय चापले यानेही अत्यंत कठीण परीस्थितीला तोंड देत यश मिळवले आहे. त्याचे आई- वडील लहानपणीच अपघातात मृत्यूमुखी पडल्यानंतर पुढील पालनपोषण आजीने केले. १२ वी व सीईटीच्या गुणांनुसार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे (सीईओपी) येथे संगणक अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. त्याची कँपस इंटरव्यूव्हद्वारे बजाज फिनसर्व्ह या कंपनीमध्ये १२ लाख ८१  हजार रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे.


शुभम राजकुमार सोमवंशी हा लातूर जिल्ह्यातील शिऊर ता. निलंगा येथील राहणारा असून वडील मजुरी त्याचीही घरची परिस्थिती बेताचीच आहे. दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर लातूर येथे बारावीचे शिक्षण घेतले. त्याही वेळी शासकीय वसतिगृहाच्या योजनेचा लाभ घेतला. बारावीनंतर सीईटीमध्ये ९९.५१ टक्के गुण मिळवत सीईओपी येथे संगणक अभियांत्रिकीला प्रवेश मिळवला. कोरोगाव येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला. त्याची कँपस इंटरव्यूव्हद्वारे ‘सोसायट जनरल’ या कंपनीमध्ये १४ लाख ९६  हजार रुपयांच्या वार्षिक वेतनाच्या पॅकेजवर निवड झाली आहे.


प्रितेश अमोल शंभरकर या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यानगर ब्रह्मपुरी येथील विद्यार्थ्याने येथील सीईओपीमध्ये २०१९-२०२३ साठी बीटेक इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. त्याला संत ज्ञानेश्वर शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला. त्याचीही ‘सोसायटी जनरल’ या कंपनीत वार्षिक वेतन १४ लाख ९६ हजार रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली आहे. स्वप्नील जोगदंड या चिंचोली बाळनाथ जिल्हा लातूर येथील विद्यार्थ्यानेही अशाच प्रतिकूल परिस्थितीवर मात मिळवत यश मिळवले आहे. पदविकेनंतर २०१९-२०२२ मध्ये एमआयटी मध्ये बीटेक संगणक अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेल्या स्वप्नीलची स्नोफ्लेक ईन्स, पुणे या कंपनीत वार्षिक वेतन १५ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली आहे.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विभागाचे सचिव मा. सुमंत भांगे , विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नरनवरे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

तसेच सदर विद्यार्थ्यांचा पुणे प्रादेशिक उपायुक्त श्री बाळासाहेब सोळंकी यांनी विभागाच्या वतीने प्राथमिक स्वरूपात सन्मान केला आहे यावेळी गृहपाल संतोष जैन समाज कल्याण अधिकारी मल्लिनाथ हरसुरे, हे उपस्थित होते. पुणे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता डावकर यांनी मुलांना शाबासकी दिली आहे


शासनाची साथ, शिक्षणाची आस आणि जिद्द, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, वसतिगृहांचे गृहप्रमुख, गृहपाल तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी वर्गाचे सततचे मार्गदर्शन यामुळे आत्मविश्वास आलेल्या या मुलांचे जीवन घडत आहे.


No comments:

Post a Comment

Pages