प्रा. दत्ता भगत यांचा ग्रंथ डॉ आंबेडकरांच्या चिकित्सक चरित्र लेखनाची उत्कृष्ट सामग्री_' समता संगराचा महानायक' ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. रावसाहेब कसबे यांचे प्रतिपादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 29 September 2022

प्रा. दत्ता भगत यांचा ग्रंथ डॉ आंबेडकरांच्या चिकित्सक चरित्र लेखनाची उत्कृष्ट सामग्री_' समता संगराचा महानायक' ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. रावसाहेब कसबे यांचे प्रतिपादन

नांदेड- महापुरुषांची गुणगौरव करणारी चरित्रे वाचून महापुरुष कळत नसतात. त्यासाठी त्यांची चिकित्सक चरित्रे हवीत.चिकित्सक चरित्रामुळेच म. गांधी जगाला कळाले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यायचे असेल, तर त्यांचे चिकित्सक चरित्र  लिहावे लागेल. त्यामुळे प्रा. दत्ता भगत यांनी अत्यंत  परिश्रमपूर्वक लिहिलेला 'समता संगराचा महानायक' हा ग्रंथ म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या चिकित्सक चरित्र लेखनाची उत्कृष्ट सामग्रीच आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.

      कल्चरल असोसिएशन नांदेड व सायन पब्लिकेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. दत्ता भगत लिखित 'समता संगराचा महानायक कालपटावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या ग्रंथाचे व या ग्रंथाचा डॉ.  सूर्यनारायण रणसुभे यांनी हिंदीत अनुवादित  केलेल्या 'डॉ. आंबेडकर का राजनीतिक संघर्ष'  या ग्रंथांचे डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  कुसुम सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध समीक्षक डॉ.  सूर्यनारायण रणसुभे होते. तर यावेळी  ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता  भगत  व सौ. सुमन भगत आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

        डॉ. रावसाहेब कसबे यांनी आपल्या भाषणात प्रा.  दत्ता भगत यांनी ग्रंथ  लेखनासाठी घेतलेल्या कष्टांचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. त्यांच्या या कामाला ‘सॅल्यूट’ करण्यासाठी मी इथे आलो आहे. असे ते म्हणाले. आपल्या प्रदीर्घ भाषणात डॉ.  रावसाहेब कसबे यांनी भारताचा इतिहास क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या शृंखलेचा इतिहास आहे, असे सांगत वैदिक प्रतिक्रांतीच्या विरोधात उपनिषदांनी क्रांती केली. उपनिषदांची निर्मिती ही क्षत्रियांनी केली आहे. बुद्ध महावीर हे ही क्षत्रिय होते, असे सांगून वारकरी संप्रदायाच्या क्रांतीकडे पुरोगामी मंडळींनी दुर्लक्ष केले, याबद्दल खंत व्यक्त केली. संत नामदेव हे वारकरी चळवळीचे गुरु होते.  संत चोखोबाची पत्नी सोयराबाई यांच्या अभंगांतील तत्त्वज्ञान हे उच्च प्रतीचे होते. तर संत तुकारामांच्या अभंगातून अप्रत्यक्षपणे बुद्धाचे तत्वज्ञान प्रगटले आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला पारंपरिक बुद्ध नाही तर नवा बुद्ध दिला. डॉ. आंबेडकरांचा बुद्ध ध्यान करीत नाही. तो विपश्यना सांगत नाही. कर्मकांड सांगत नाही. डॉ. आंबेडकरांचा बुद्ध नव्या क्रांतीला पोषक ठरेल असे माणसांचे मन घडवितो. जग बदलण्याची भाषा करतो. माणूस हाच इतिहासाचे अपत्य असतो आणि तोच इतिहासाचा निर्माताही असतो.  त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्येच नवा समाज घडवण्याचे सामर्थ्य आहे, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले.

           प्रा. दत्ता भगत यांनी आपल्या मनोगतात पुस्तकाच्या निर्मितीत ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. शिवाय ग्रंथलेखना मागची प्रेरणा नेमकेपणाने विशद केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची  उपलब्ध चरित्रे ही पुरेशी परिपूर्ण नाहीत. त्यांच्या राजकीय आणि राष्ट्रीय भूमिकांचा सामग्रीच्या अभावामुळे उल्लेख केला जात नाही. ही कमतरता हा ग्रंथ काही अंशाने तरी पूर्ण करेल, असे त्यांनी सांगितले.

                     अध्यक्षीय समारोप करताना डॉ. सूर्यनारायण रणसुभे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वग्रह दूषित आणि राजकीय हेतूंनी प्रेरित झालेल्या अनेक चरित्रांची प्रसिद्धी हिंदी प्रदेशामध्ये होत आहे. या प्रदेशातील शोषित, दलितांना परिवर्तनाची पार्श्वभूमी नसल्यामुळे तीच माहिती खरी असे गृहीत धरून राजकारण केले जात आहे. या अपप्रवृत्तीला पायबंद घालणारा हा मराठीतला ग्रंथ तातडीने हिंदीत यावा म्हणून मी प्रा.  भगत यांच्या ग्रंथाचा हिंदी अनुवाद केला आहे.

              कार्यक्रमाच्या आरंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  डॉ. दिलीप चव्हाण यांनी केले. तर डॉ.  राजेंद्र गोणारकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

 प्रा. दत्ता भगत लिखित 'समता संगराचा महानायक कालपटावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या ग्रंथाचे ज्येष्ठ विचारवंत  डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी (डावीकडून) सौ. सुमन भगत, प्रा. दत्ता भगत, डॉ. रावसाहेब कसबे डॉ.सूर्यनारायण रणसुभे व डॉ. राजेंद्र गोणारकर


No comments:

Post a Comment

Pages