नांदेड : सुप्रसिद्ध नाटककार, समीक्षक तथा विचारवंत प्रा. दत्ता भगत लिखित ‘समतासंगराचा महानायक कालपटावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या नोंदीच्या स्वरुपात लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र ग्रंथाचे (बुधवार, २८ सप्टेंबर ) प्रकाशन होणार आहे. कुसुम सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होईल. हिंदी- मराठीतील ज्येष्ठ समीक्षक तथा अनुवादक डॉ. सुर्यनारायण रणसुभे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
अश्मक, खेळीया, वाटा पळवाटा, पुस्तकी वांझ चर्चा, आधारवेल माता रमाई अशा बहुचर्चित नाटकांचे त्यांनी लेखन करणाऱ्या प्रा. दत्ता भगत यांनी नाट्य लेखक म्हणून स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ८६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. नाट्य लेखनाशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आणि कार्याचे डोळस आकलन वाणी आणि लेखणीतून प्रकट करणारे एक चिंतनशील विचारवंत म्हणूनही ते सुपरिचित आहेत. महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषणे व लेखन प्रकाशन समितीचे सदस्य सचिव म्हणून ही त्यांनी काम केले आहे. ‘समतासंगराचा महानायक कालपटावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर' हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राची मौलिक सामग्री उपलब्ध करून देणारा संदर्भग्रंथ आहे. या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय कार्याची संपूर्ण कालिक सूची दिली आहे. इ. स. १४९८ ते १ मे १९६० अशा जवळपास ४६२ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील महत्त्वाच्या घटनांची या ग्रंथात तारखांसहित नोंद करण्यात आली आहे. पुण्यातील सायन पब्लिकेशन्सने हा ग्रंथ ५१८ पृष्ठांचा हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
या प्रकाशन सोहळ्यास अभ्यासक, वाचक व चळवळीतील कार्यकर्त्यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कल्चरल असोशिएशन नांदेड, सायन पब्लिकेशन्स, पुणे आणि प्रकाशन सोहळा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment