तर वेळप्रसंगी लम्पी लसीकरणासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनाही सोबत घेऊ - जिल्हाधिकारी अभिजित राऊत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 30 September 2022

तर वेळप्रसंगी लम्पी लसीकरणासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनाही सोबत घेऊ - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

नांदेड दि. 30 :- जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज रुजू होताच लम्पी आजाराबाबत सविस्तर आढावा घेऊन यात अधिकाधिक जागरुकता आणि लोकसहभागातून व्यवस्थापन अधिक परिणामकारक कसे करता येईल यावर भर दिला. जिल्ह्यात उपलब्ध असलेली पशुधनाची संख्या, पशुवैद्यकिय विभागाकडे असलेले मनुष्यबळ याची सांगड नियोजनातूनच परिपूर्ण होऊ शकते. आजच्या घडीला लम्पी नियंत्रणात आहे ही चांगली गोष्ट आहे. तथापि इतर राज्यांच्या अनुभव लक्षात घेता यासाठी सर्व पातळीवर तयार असणे अत्यंत आवश्यक आहे. वेळप्रसंगी लसीकरणासाठी ग्रामपंचायतींचाही सहभाग घेऊन त्यांच्या नियोजनाप्रमाणे ही जबाबदारी देऊ याची सुतोवाचही त्यांनी केले. 


जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे, अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.


मध्यप्रदेश, राज्यस्थान या राज्यांच्या अनुभव लक्षात घेता चराईबंदी करणे अत्यावश्यक आहे. मध्यप्रदेश, गुजरातच्या सीमेवर नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात सामुहिक चराई मुळे जनावरातील लम्पीचे प्रमाण वाढले. हे लक्षात घेता चराईबंदीचे काटेकोर पालन व लसीकरणावर भर देण्याचे निर्देश त्यांनी पशुसंवर्धन विभागाला दिले. 


प्रारंभी प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील प्रशासकिय कामांचा आढावा त्यांना सादर केला.


No comments:

Post a Comment

Pages