आज महात्मा फुले यांचा सत्यशोधक होण्याची गरज - यशवंतभंडारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 24 September 2022

आज महात्मा फुले यांचा सत्यशोधक होण्याची गरज - यशवंतभंडारे

सत्यशोधक समाजाची स्थपणा करण्याच्या घटनेस आज 150 वर्षे पूर्ण होत आहेत ... २४ सप्टेंबर १८७३ रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करुन वर्षानुवर्षे पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारा पासून आणि येथील धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करुन व त्यांना हक्काची जाणीव करून दिली...  


निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला. निसर्गा विषयी निर्मिक हा शब्द वापरला...'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो... सत्यशोधक समाजातर्फे 'दीनबंधू' नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे... 'सर्वसाक्षी जगत्पती। त्याला नकोच मध्यस्ती।' हे या समाजाचे घोषवाक्य होतं ... सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली...


सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली...त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे आणि  तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते...  अंधश्रद्धा, कर्मकांड, देवधर्म तसेच मानसिक गुलामगिरी यांवर प्रहार करणारी सत्यशोधक समाजाची स्थापना ही राष्टपिता ज्योतीराव फुलेंनी सुरु केलेली अंधश्रद्धा निर्मूलनाचीच चळवळ होती ... 


महात्मा जोतीराव फुले यांच्या नंतर ही चळवळ ब्राम्हण इतरांची चळवळ म्हणून प्रसिद्ध झाली ... ब्राम्हणांना विरोध हीच आपली भूमिका असा समज करून दिली गेली ... त्यातून महात्मा फुले यांच्या मूळ भूमिकेशी फारकत घेतली गेली असं स्वरूप या सत्यशोधक समाजाच्या चळवळीला आलं ... त्यातून  बाहेर पडण्याची संधी असताना अनेक सत्यशोधक स्वातंत्र्य चळवळी दरम्यान काँग्रेस मध्ये गेले ...सत्यशोधक समाजाच्या चळवळीला उतरती कळा आली ..नव्हे तर संपल्यात जमा झाल्याचे बोलले जाऊ लागले पण काही सजग मंडळींनी महात्मा फुले यांचे हे कार्य सुरूच ठेवले पण त्यातही गतिधीलता राहिली नाही ... आज सत्यशोधक समाजाच्या चळवळीला गतिमान करावयाचे असेल तर ब्राम्हणास विरोध न करता समाजातील प्रत्येकालीतील ब्राम्हन्या ग्रस्ता घालवण्याची चळवळ होण्याची गरज आहे ...  


सत्यशोधक चळवळीनं महात्मा फुले यांच्या प्रेरणेतून जनसामान्यांच्या उत्थानाचा अभूतपूर्व लढा उभारला... शेतकरी, कष्टकरी, कामगार, बहुजन, वंचित वर्गापासून डोंगरकपारीतील महादेव कोळ्यांपर्यंत सामान्य जनसमुदायानं उत्स्फूर्तपणे चालवलेली आणि शहरापासून खेड्यापाड्यातील वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचलेली सत्यशोधक चळवळ, ही आधुनिक भारतातील पहिली परिवर्तनवादी लोकचळवळ होती... 


सत्यशोधक चळवळीनं वैदिक धर्म आणि वर्णजातिप्रधान समाजव्यवस्थेची कठोर चिकित्सा केली... त्यांनी सर्वप्रथम प्रस्थापित ब्राह्मणी वैदिक परंपरेपासून स्वतःला अलग करून शेतकरी वर्गात अत्यंत आदराचं स्थान असलेल्या बळीराजाच्या परंपरेशी स्वतःचं  नातं  जोडून घेतलं ... शूद्रातिशूद्रांची अस्मिता आणि अभिमानाची गौरवशाली परंपरा म्हणून लोकसंस्कृतीचा पुरस्कार केला...  


धर्मग्रंथांची बुद्धिवादी समीक्षा करून त्यांचा सत्यशोधकीय दृष्टीतून अन्वयार्थ लावला गेला ... बहुजन समाजाची मानसिक गुलामगिरी आणि अधोगती यासाठी हिंदू धर्म, शास्त्रग्रंथपुराणे तसेच ब्राह्मणी वर्चस्व यांना जबाबदार धरण्यात आलं ...  लोकसंस्कृतीतील परंपरा, प्रतीकं , लोकदैवतं यांना नवा अर्थ आणि आशय देऊन पर्यायी संस्कृतीचा विचार मांडला गेला... 


सत्यशोधकांनी ग्रंथप्रामाण्य आणि  शब्दप्रामाण्य मानण्यास नकार दिला... प्रत्येकाने व्यक्तिगत बुद्धीनं संशोधन करावं,  असा त्यांनी आग्रह धरला... पोथीवाद नाकारून बुद्धिवादाचा पुरस्कार केला...  सत्यशोधकांनी सर्व प्रकारच्या मध्यस्थांना विरोध केला... देव आणि  भक्त यांच्यामधील भटजी तसेच धर्मव्यवस्थेवर कब्जा केलेली भिक्षुकशाही यांच्या समूळ उच्चाटनाचा विचार मांडला...  


सत्यशोधकांनी विविध धर्मांतील धर्मगुरूंच्या विरोधात जगभर चालू असलेल्या धर्मसुधारणा चळवळींना पाठिंबा देऊन त्यांच्याशी आपले वैश्विक नातं  जोडलं ...  सत्यशोधक चळवळीनं  धार्मिक स्वातंत्र्य, समता, मानवी प्रतिष्ठा, इहवाद, विवेक, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता आणि बुद्धिवाद या आधुनिक मूल्यांची प्रतिष्ठापना करण्याचे प्रयत्न केले... ते प्रयत्न सुरू ठवण्याची आज खूप गरज आहे.. .

               - यशवंत भंडारे, औरंगाबाद

                                 

No comments:

Post a Comment

Pages