‘नाफेड’ने साठविलेली शेकडो पोते तूर कीड लागून गेली वाया; चौकशीची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 24 September 2022

‘नाफेड’ने साठविलेली शेकडो पोते तूर कीड लागून गेली वाया; चौकशीची मागणी

किनवट,दि.24 (प्रतिनिधी):  ‘नाफेड’ तर्फे शेतकर्‍यांची तूर खरेदी केल्यानंतर ते धान्य येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठवणूक करून ठेवली होती. सध्याच्या गोदामपालाच्या दुर्लक्षितपणामुळे त्यातील शेकडो तुरींच्या पोत्यांना कीड लागून ती पूर्णत: वाया गेली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून  दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी येथील  शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्रिभुवनसिंह ठाकून यांनी निवेदनाद्वारे वखार महामंडळाच्या महाव्यवस्थापकाकडे केली आहे.


  निवेदनात म्हटले की, ‘नाफेड’ तर्फे  खरेदी केल्या गेलेली तूर गत दोन वर्षापासून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ लातूर विभाग ता. किनवट यांच्या गोकुंदा येथील ब.पा.महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या भाड्याच्या गोदामात साठवणूक करून ठेवलेली होती. सुरुवातीच्या काळात या गोदामाची देखरेख राठोड नावाचे गोदामपाल करीत होते. त्यांची बदली झाल्यानंतर अर्जुन भांगे नावाचे गोदामपाल त्यांच्या जागी रुजू झालेत. भांगेच्या काळात गोदामात ठेवलेल्या तुरींच्या थप्पींवर कीड इत्यादी लागू नये म्हणून ठराविक काळानंतर केली जाणारी औषधांची फवारणी केल्या गेली नाही. परिणामी, सदर गोदामातील थप्पी क्र. 2 व 4 सह इतरही काही थप्पीतील तुरीचे शेकडो पोते कीड लागल्यामुळे खराब होऊन त्याचे अक्षरश: पीठ झालेले आहे. गोदामपालाच्या दुर्लक्षितपणामुळे भारत सरकारची कोट्यावधी रुपयांची हानी झालेली आहे. तसेच यापूर्वीसुद्धा गोदामात साठविलेला हरभरासुद्धा असाच खराब व टोकर झाल्यामुळे त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचे कळते. त्यामुळे या खराब झालेल्या तुरीसह विल्हेवाट लावलेल्या हरभर्‍याचीही चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केलेली आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी वखार महामंडळाचे लातूर येथील विभागीय व्यवस्थापक व येथील सहा.जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages