औरंगाबाद | महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात अनुसूचित जातीच्या एम.फिल व पीएच.डी करणाऱ्या व पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे (बार्टी) अर्ज केलेल्या ८८० संशोधक विद्यार्थ्यांना सारथी व महाज्योतीप्रमाणे कुठलीही परीक्षा किंवा मुलाखती न घेता फक्त कागदपत्राची पडताळणी करून सरसगट फेलोशिप मंजूर करावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती- २०२१ संशोधक विद्यार्थी कृती समिती औरंगाबादच्या वतीने भरत हिवराळे यांनी केली आहे.
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF २०२१) साठी ७ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. यात राज्यभरातील विविध विद्यापीठात एमफिल व पीएच.डी करणाऱ्या अनुसूचित जातीच्या संशोधक १०३३ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यापैकी बार्टीने परीक्षेसाठी पात्र केलेल्या ८८० संशोधक विद्यार्थ्यांची बार्टी नोव्हेंबरमध्ये लेखी परीक्षा घेणार आहे. त्यानंतर त्यातून मुलाखतीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेवून त्यातून फक्त २०० संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करणार आहे. त्यामुळे उर्वरित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे बार्टीकडे फेलोशिपसाठी आलेल्या अर्जातून पात्र झालेल्या ८८० संशोधक विद्यार्थ्यांची कुठलीही लेखी परीक्षा व मुलाखती न घेता सारथी व महाज्योतीप्रमाणे सरसगट डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती- २०२१ मंजूर करावी. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-२०१८ च्या एम.फिलच्या १९४ फेलोशिपधारक संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी फेलोशिप नियमित केल्याची यादी संकेतस्थळावर टाकण्यात यावी, तसे न केल्यास संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने अनुसूचित जातीच्या न्याय, हक्कासाठी लढा उभारून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती २०२१ संशोधक विद्यार्थी कृती समिती औरंगाबादच्या वतीने भरत हिवराळे यांनी दिला आहे.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवरच का अन्याय
बार्टी संस्थेकडे फेलोशिपसाठी आलेल्या अर्जातून पात्र झालेल्या ८८० संशोधक विद्यार्थ्यांवरच का अन्याय केला जात आहे. सारथी फेलोशिपसाठी अर्ज केलेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांची कुठलीच परीक्षा किंवा मुलाखती न घेता केवळ कागदपत्राची पडताळणी करून सारथी ८५६ संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली आहे. मग, अनुसूचित जातीच्याच केवळ २०० संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप का ? त्यांनाही सरसगट ८८० संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करा, नसता लोकशाही मार्गाने आंदोलन छेडू असा इशारा भरत हिवराळे यांनी दिला आहे.
त्या १९४ जणांना फेलोशिप िनयमित केल्याची यादी जाहिर करा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-२०१८ च्या एम.फिलच्या १९४ फेलोशिपधारक संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डीपर्यंत नियमित फेलोशिप मिळावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती २०१८ संशोधक विद्यार्थी कृती समिती औरंगाबादच्या वतीने वेळाेवेळी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एमफिलच्या १९४ फेलोशिपधारक संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप नियमित करण्याचे आदेश दिले. या आदेशाला एक वर्ष उलटत आले तरी बार्टीने एमफिलच्या १९४ संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डीपर्यंत फेलोशिप मंजूर केल्याची यादी अद्यापीही बार्टीच्या संकेतस्थळावर टाकली नाही. त्यामुळे या १९४ संशोधक विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, असेही भरत हिवराळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment