ओला दुष्काळ जाहिर करा,पिक विमा परतावा द्या - काॅ.अर्जुन आडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 30 October 2022

ओला दुष्काळ जाहिर करा,पिक विमा परतावा द्या - काॅ.अर्जुन आडे

किनवट,ता.२९ :आधीच अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याला परतीचा पावसाने पुरते डबघाईस आणल्याने या वर्षी शेतकरी अन्नालाही मुकला आहे. जीवन कसे जगावे हा त्याच्यापुढे यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारकडे सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची व्यथा मांडत असतानाही शेतकऱ्याला सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून निव्वळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे. या करिता किसान सभेच्या वतीने मांडवी(ता.किनवट)  येथे अर्जुन आडे यांच्या उपस्थितीत नुकताच शेतकरी मेळावा घेण्यात आला.

   मेळाव्यात ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक साह्य द्या,पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आणि पंचनामापासून वंचित ठेवलेल्या शेतकऱ्यांनाही १०० टक्के पिक विमा मंजूर करा, मंजूर करण्यात आलेल्या पिक विम्याची अग्रीम रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा , ओल्या दुष्काळच्या अनुषंगाने पर्यायी व्यवस्था करा, अशा मागण्या मेळाव्यात करण्यात येऊन नोव्हेंबर महिण्यामध्ये महाराष्ट्र बंद व शेतकरी एल्गार आंदोलनाच्या नियोजनाचे एकमताने ठराव करण्यात आले.

 या वर्षी नैसर्गिक संकटाने म्हणजेच अस्मानी संकटाने शेतकऱ्यांना आपली शेती करणे महागात पडले आहे. दुबार, तिबार पेरणीने शेतकऱ्यांकडे होत नव्हतं सगळं गमावलं, शेतकरी कर्जबाजारी झाला, पुन्हा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिके सुद्धा हिसकावून घेतली. अश्या या कठीण प्रसंगी सरकारने अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून आपले नैतिक कर्तव्य निभवावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. परंतु, शासन शेतकऱ्यांची उपेक्षा करीत निव्वळ भांडवलदारांच्या खिदमतगरीत मश्गुल आहे. शेतकरी अस्मानी संकटासोबत सुलतानी उपेक्षेच्या बळी पडत आहे. शेतकऱ्यांच्या निव्वळ तोंडाला पाने पुसल्या जात असल्याचे मत यावेळी बोलतांना किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे यांनी व्यक्त केले.

  कृषिप्रधान देशात शेतकऱ्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतीव्यवस्था मोडकळीस आल्यास देशाची आत्मनिर्भरता धोक्यात यायला वेळ लागणार नाही. यासाठी शेतकरी जगला पाहिजे, त्यासाठी त्याच्या सर्व गरजा भागविल्या गेल्या पाहिजे याकरिता आगामी काळातील संघर्ष मजबूत करण्याचा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

मेळ्याव्यास किसान सभेचे इंदल राठोड,रमेश नलमलवार,मनोज सल्लावार,अभिमान घोडाम,नामदेव शेडमाके,गज्जु इटलीवार,संतोष रेड्डी, आशन्ना भिमनवार,निर्दोश आडे,प्रसराम पवार,द्यानेश्वर भुरे,भुमन्ना भुयरवार,किसन किनाके,सीताराम गेडाम,शाम जाधव,नागारेड्डी बोकावार,व्यकंट रेड्डी,रवी सुरेशवार,प्रवीण वाघाडे,अरविंद जाधव यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages