भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची महती देशापरदेशात पोहचण्यासाठी कार्यवाहीचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे पाहणीप्रसंगी निर्देश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 10 October 2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची महती देशापरदेशात पोहचण्यासाठी कार्यवाहीचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे पाहणीप्रसंगी निर्देश

 नवी मुंबई  : नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सर्वच दृष्टीने आगळेवेगळे व उल्लेखनीय असून याठिकाणी राज्यातीलच नव्हे तर देशापरदेशातील जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी यादृष्टीने स्मारकाच्या व्यापक प्रचार, प्रसिध्दीवर भर द्यावा व या स्मारकाची माहिती जगभरात पोहचविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले.


          नवी मुंबई महानगरपालिकेने सेक्टर 15 ऐरोली नवी मुंबई येथे उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी तेथील सुविधांची बारकाईने पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत शहर अभियंता श्री. संजय देसाई, समाजविकास विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिऱीष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री. संजय दादासाहेब पाटील व श्री. प्रविण गाडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


          स्मारकातील सभागृहामध्ये यापुर्वी झालेली जागर व्याख्यानमाला तसेच विचारवेध शिर्षकांतर्गत मान्यवरांच्या व्याख्यानांमुळे स्मारक चर्चेत राहिले असून यापुढील काळात अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यासाठी वार्षिक कॅलेंडर तयार करावे अशा सूचना आयुक्तांनी केल्या. सभागृह विविध प्रकारच्या संस्कृती संवर्धक उपक्रमांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत नियमावली तयार करण्याबाबत तत्परतेने कार्यवाही करावी असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.


          स्मारकातील ग्रंथालयाची समृध्दता वाढविण्यासाठी आवश्यक ग्रंथसंपदा उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करावी तसेच बाबासाहेबांची संसदेतील भाषणेही ग्रंथालयातील ई-लायब्ररीमध्ये अभ्यासकांसाठी उपलब्ध करून घेण्याकरिता कार्यवाही करण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सूचित केले.


          बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर आधारित दुर्मिळ छायाचित्र संग्रहालयातील पॅनल्सचे बारकाईने निरीक्षण करीत, त्यावरील मजकूर वाचत काही सुधारणा त्यांनी सूचविल्या. सभागृह वापराप्रमाणेच पहिल्या मजल्यावरील ध्यानकेंद्रही लवकरात लवकर वापरात येईल यादृष्टीने तत्परतेने नियोजन करण्याचे आयुक्तांनी सूचित केले. 


          बाबासाहेबांच्या इतर कुठल्याही स्मारकापेक्षा ज्ञान हीच शक्ती हा विचार संदेश देणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे हे स्मारक सर्वच दृष्टीने अत्यंत वेगळे असून याचे वेगळेपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे व या माध्यमातून बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ लोकांना घेता यावा यादृष्टीने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशित करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घडवून आणाव्यात व त्यांच्या माध्यमातून प्राप्त होणा-या मौलिक सूचनांची अंमलबजावणी करून स्मारकाच्या लौकीकात भर घालण्याच्या दृष्टीने कृतिशील कार्यवाही करावी असे निर्देशित केले.



No comments:

Post a Comment

Pages