ओल्या दुष्काळाचे सावट; नजरअंदाज पैसेवारी मात्र ५२.६७ टक्के ; किनवट तालुक्यात यंदा नऊ वेळा झाली अतिवृष्टी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 11 October 2022

ओल्या दुष्काळाचे सावट; नजरअंदाज पैसेवारी मात्र ५२.६७ टक्के ; किनवट तालुक्यात यंदा नऊ वेळा झाली अतिवृष्टी

 


किनवट,ता.११(बातमीदार) : यंदाच्या खरीप हंगामात किनवट तालुक्यात तब्बल नऊ वेळा अतिवृष्टी झालेली आहे. सततचा पाऊस व पूर परिस्थितीमुळे सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. परिणामी,सर्वच पिकांची उत्पादकता कमी झालेली आहे. अशातच महसूल प्रशासनाने नजरअंदाज पैसेवारी ५२.६७ टक्के जाहीर केल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.


          या वर्षीच्या हंगामात सुरुवातीपासूनच सततचा पाऊस बरसल्यामुळे नुकसान होत आले आहे. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. त्यात जून महिन्याच्या अपेक्षित सरासरीच्या ८३.५ टक्के पाऊस झाला. मात्र, जुलैमध्ये पावसाने आपले रौद्ररूप दाखविले.३१ पैकी तब्बल २६ दिवस पाऊस कोसळला. त्यात ता.४ ला जलधरा मंडळात पहिली, ९ ता.ला इस्लापूरला दुसरी, १० ता. ला शिवणीत तिसरी आणि १३ तारखेला तर उमरीबाजार (अतिवृष्टीच्या जवळपास ६१.८ मि.मी.) वगळता उर्वरीत आठही मंडळात धुवांधार पावसाने कहर केला. शिवणी मंडळात ७२.५ मि.मी तर  इस्लापूर,जलधरा,मांडवी,दहेली १५० ते २०० मि.मी.दरम्यान आणि किनवट, बोधडी व सिंदगी मोहपूर मंडळात २०० मि.मी.च्या वर पावसाची नोंद झाली. ही चौथी अतिवृष्टी तर पुढे २३ तारखेला इस्लापूर,जलधरा व शिवणी मंडळात पाचव्या अतिवृष्टीची नोंद झाली. या नंतर २६ तारखेला जलधरा मंडळात सहाव्या अतिवृष्टीची नोंद झाली. दरम्यान, ऑगस्टमध्ये मात्र पावसाचा जोर ओसरून त्याने तब्बल १९ दिवस विश्रांती घेतली. ऑगस्टमध्ये अधून-मधून केवळ १२ दिवस पावसाच्या सरी कोसळल्या. सप्टेंबरमध्ये परत ४ ता.ला मांडवी व सिंदगी मंडळात सातवी, ११ ता.ला किनवट,इस्लापूर व जलधरा मंडलात आठवी तर १२ तारखेला परत पावसाने कहर केल्यामुळे आठ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. ती तालुक्यातील नववी अतिवृष्टी ठरली. यावेळी किनवट (५४ मि.मी.) सोडून बोधडी,मांडवी,सिंदगी व उमरीबाजार या चार मंडळात ७५ ते १०० मि.मी.दरम्यान तर इस्लापूर,जलधरा व शिवणी मंडळात १५० ते २०० मि.मी.दरम्यान पाऊस कोसळला. सप्टेंबरच्या ३० दिवसांपैकी १५ दिवसच पाऊस पडला. मात्र, यात शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास नाहीसा झाला.


           तालुक्यातील यंदाच्या खरीपातील जिरायती पिकाखालील एकूण क्षेत्र ७८ हजार १४४ हेक्टर आहे. जुलैमधील अतिवृष्टीमध्ये त्यातील ५३ हजार ४५१ शेतकर्‍यांचे ४९ हजार ३३२ हेक्टरवरील कापूस,सोयाबीन, तूर व इतर पिके अतिवृष्टीमुळे बाधित झालेली आहेत. हा कृषी व महसूल विभागाचा अहवाल आहे. सप्टेंबरमधील नुकसानीचा अंतिम अहवाल अजून प्राप्त झाला नाही. विशेष म्हणजे केवळ तीन महिन्यातच पावसाने वार्षिक  सरासरी ओलांडली आहे. दुसरे म्हणजे, नांदेड जिल्ह्यात नांदेड, किनवट व धर्माबाद वगळता इतर १३ तालुक्यातील पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वात जास्त हानी पोहोचलेल्या तालुक्यात किनवट सुद्धा आहे. मग,याच तालुक्याची पैसेवारी ५० पेक्षा जास्त का? हा प्रश्न शेतकर्‍यांना सतावतो आहे. कारण,नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदील झालेल्या शेतकर्‍यांना दिलास मिळणे अपेक्षित होते. मात्र, इतक्या विपरित परिस्थितीतही महसूलचे अंदाज वेगळे येऊ लागले आहेत.


          खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करते. पैसेवारीचा संबंध दुष्काळाशी असल्यामुळे, पर्जन्यमान कमी वा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैशाच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र आहे. दरवर्षी  सप्टेंबरमध्ये नजरअंदाज, ऑक्टोबरमध्ये सुधारीत तर डिसेंबरमध्ये पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. पैसेवारीच्या आधारावरच शासन दुष्काळाची परिसीमा ठरवते. पैसेवारी ५० टक्क्याच्या खाली आल्यास पीक परिस्थिती गंभीर आणि ५० टक्क्यांच्या वर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे समीकरण आहे. किनवट तालुक्यात १९१ महसूली गावे असून, १०७ वाडी-तांडे आहेत. १० गावे बेचिराख आहेत. उर्वरीत १८१ गावे खरीप पीक लागवडीसाठी योग्य असून, त्यातील तब्बल १७६ गावाची पैसेवारी महसूल विभागाने ५० पैशापेक्षा जास्त घोषित केलेली आहे. त्यामुळे जाहीर नजरअंदाज पैसेवारी आणि प्रत्यक्ष पिकांची स्थिती विपरित असल्याचे दिसून येत आहे.


“नजरअंदाज पैसेवारीत सुधारणेला वाव असतो. आता पुढे पीक कापणी प्रयोग होणार आहेत. यामध्ये पिकांच्या उत्पादकेतेची वस्तुस्थिती समोर येईलच. इतक्या नुकसानीनंतर सुधारीत पैसेवारी  ५० पैशापेक्षा कमी येणे गरजेचे आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून, किनवट तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केल्या जाईल”

 - आ.भीमराव केराम. किनवट-माहूर मतदारसंघ

No comments:

Post a Comment

Pages