सर्वांच्या एकत्रित सहभागातून नवी मुंबईचे मानांकन उंचाविण्याचा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचा निर्धार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 12 October 2022

सर्वांच्या एकत्रित सहभागातून नवी मुंबईचे मानांकन उंचाविण्याचा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचा निर्धार

 


नवी मुंबई : शहराच्या स्वच्छता व सुंदरतेतील बदल हे दृश्यात्मक स्वरुपात दिसत असून यामध्ये स्वच्छताकर्मी, अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय कर्मचारी त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी, नागरिक व प्रसारमाध्यमे अशा  सर्वांच्याच सहभागाचा फार मोठा वाटा आहे. “स्वच्छ सर्वेक्षण 2022” मध्ये देशात तृतीय क्रमांकाच्या व राज्यात प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन संपादन करताना इतरांच्या आपल्या शहराविषयीच्या अपेक्षा वाढल्या असून त्यामुळे आपली जबाबदारीही वाढली असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी यापुढील काळात स्वच्छताविषयक कांमाचा वेग व व्याप्ती वाढवून “निश्चय केला - नंबर पहिला” हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करूया व नवी मुंबईचा नावलौकिक उंचवूया असे आवाहन केले.


          नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटरमध्ये संपन्न झालेल्या “स्वच्छ सर्वेक्षण 2023 – स्वच्छतेची नवी दिशा” या विशेष कार्यक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ 2 चे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर तसेच इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


          स्वच्छतेमध्ये मानांकन उंचाविण्याचे ध्येय जेव्हा आपण नजरेसमोर ठेवतो तेव्हा त्यामध्ये शहरातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग गरजेचा आहे. नागरिकांकडून दररोज घरातूनच नियमितपणे कच-याचे वर्गीकऱण होणे अपेक्षित असून त्यादृष्टीने स्वच्छतेची मानसिकता तयार करण्याची गरज विषद करीत आयुक्तांनी यासाठी विविध माध्यमांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातील असे सांगितले.


          मा. पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतील शहरांच्या पातळीवर विभागाविभागांमध्ये स्वच्छतेविषयी अंतर्गत निकोप स्पर्धा व्हावी व या माध्यमातून स्वच्छ शहर निर्मिती कार्याला गतीमानता यावी यादृष्टीने स्वच्छ मंथन स्पर्धा घेतली जाते याबद्दल समाधान व्यक्त करीत यामध्ये दिला जाणारा फिरता चषक हा नावाने फिरता असला तरी तो फिरता न राहता आपल्याकडेच रहावा यासाठी प्रत्येक विभागाने झोकून देऊन काम करावे असेही आयुक्तांनी सांगितले.


          “स्वच्छ मंथन 3.0” स्पर्धेच्या दुस-या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणा-या बेलापूर विभाग कार्यालयास स्वच्छ मंधन स्पर्धेचा फिरता चषक प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे हा फिरता चषक पहिल्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणा-या वाशी विभागाच्या विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त श्री. दत्तात्रय घनवट यांच्याकडून बेलापूर विभागाच्या विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त श्रीम. मिताली संचेती यांच्याकडे प्रदान करण्यात आला. आपल्या विभागाला मिळालेला चषक आपल्या हातून दुस-या विभागाला सुपुर्द करावा लागणे यासारखे मोठे दु:ख नाही अशी प्रतिक्रिया देत या माध्यमातून आपली कामगिरी नेहमीच सर्वोत्तम राहील याकडे विभाग कार्यालये अधिक लक्ष देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


          स्वच्छ सर्वेक्षण 2022 मधील यशस्वीतेचा उल्लेख करताना त्यामध्ये सर्वाधिक महत्वाचा वाटा असणा-या स्वच्छताकर्मींचा गौरव करण्याची परंपरा कायम राखीत बेलापूर ते दिघा अशा आठही विभागातील शौचालय स्वच्छतेसाठी महत्वपूर्ण योगदान देणा-या पुरुष व महिला स्वच्छताकर्मींचा महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.


          याप्रसंगी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते घरगुती घातक कच-याविषयी जनजागृती करणा-या ‘कर्तव्य’ या लघुपटाचे तसेच सफाईमित्र सुरक्षा चॅलेंजमुळे मलनि:स्सारण वाहिन्या स्वच्छ करणा-या कामगारांच्या जीवनात झालेल्या आमुलाग्र बदलाविषयीची माहिती देणारा ‘परिवर्तन’ या लघुपटाचे अनावरण करण्यात आले.


          ‘इंडियन स्वच्छता लीग’ अंतर्गत 22 सप्टेंबर रोजी सेक्टर 10 ए, मिनी सी शोअर, वाशी याठिकाणी लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगाने 207 तृतीयपंथी नागरिकांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या “बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स” मध्ये नोंद झालेल्या विशेष उपक्रमाबद्दल लेट्स सेलिब्रेटच्या प्रमुख श्रीम. रिचा समीत तसेच तृतीयपंथी नागरिक समुहाचे प्रमुख यांचा आयुक्तांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला. 


          इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत ‘युथ वर्सेस गार्बेज’ या टॅगलाईननुसार सीबीडी, बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात राबविण्यात आलेल्या भव्यतम उपक्रमास केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम युवक सहभागाबद्दल प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला. त्याचप्रमाणे या उपक्रमाची विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ मध्येही झाली. 53 हजाराहून अधिक युवकांच्या सहभागाने संपन्न झालेल्या या उपक्रमात सर्वाधिक विद्यार्थी युवकांचे रजिस्ट्रेशन तसेच कार्यक्रम स्थळी स्वच्छतेच्या विषयानुरुप उत्तम सादरीकरण करणा-या तीन शाळांचा सन्मानपत्रे देऊन गौरव करण्यात आला.


          यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळांच्या गटातून नमुंमपा शाळा क्र. 33 पावणे ही शाळा प्रथम क्रमांकाची तसेच शाळा क्रमांक 4 सीबीडी बेलापूर ही शाळा व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली. शाळा क्र. 53 चिंचपाडा ऐरोली आणि शाळा क्र. 22 तुर्भे स्टोअर या शाळांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले.


          अनुदानित शाळांच्या गटात भारती विद्यापीठ सीबीडी बेलापूर ही शाळा प्रथम, नवी मुंबई विद्यालय कोपरी ही शाळा व्दितीय आणि ज्ञानविकास विद्यालय कोपरखैरणे ही शाळा तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.


          कायम विनाअनुदानित शाळांच्या गटामध्ये फिनिक्स इंटरनॅशनल स्कूल ऐरोली, साई होली स्कुल कोपरखैरणे, झेनीत स्कुल ऐरोली या तीन शाळा अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.


          प्रास्ताविकपर मनोगतात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये “देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा मिळालेला बहुमान”, कचरामुक्त शहराचे “फाईव्ह स्टार मानांकन” प्राप्त करणारे तसेच ओडीएफ कॅटेगरीत सर्वोच्च “वॉटरप्लस” मानांकन मिळविणारे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर या अभिमानास्पद उपलब्धीबद्दल सर्वांचे अभिनंदन करीत यामध्ये योगदान देणा-या सर्व घटकांचे आभार व्यक्त केले. यापुढील काळात स्वच्छतेचा हा जागर असाच उंचावत ठेवून आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक चांगले काम करून शहराचे मानांकन आणखी उंचवूया असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


          याप्रसंगी आरंभ क्रिएशन्सच्या कलावंतांनी सादर केलेल्या कचरा वर्गीकरणाविषयक मनोरंजनातून प्रबोधनात्मक पथनाट्याला आयुक्तांसह उपस्थितांनी पसंतीची दाद दिली. “स्वच्छ सर्वेक्षण 2023” ला सामोरे जाताना देशात प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून उपस्थितांनी “निश्चय केला – नंबर पहिला” असा सामुहिक गजर केला.



No comments:

Post a Comment

Pages