दंडार : आदिवासी समाजाच सांस्कृतिक परंपरा जपणारं लोकनृत्य - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 23 October 2022

दंडार : आदिवासी समाजाच सांस्कृतिक परंपरा जपणारं लोकनृत्य

किनवट : महाराष्ट्र-आंध्र सीमेवरील किनवट तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही आदिवासी बांधव आपली संस्कृती, परंपरा कायम जपून आहेत. दंडार नृत्य हा त्यांचा सर्वात मोठा उत्सव विविध कलागुणांनी पारंपरिक नृत्यांनी ते साजरा करतात. त्यात दस-याच्या दिवसापासून आदिवासी बांधव देवदेवतांना साक्षी ठेवून पारंपरिक पोषाख परिधान करतात. मोराच्या पिसांचा टोप डोक्यात घालून जवळपास 15 ते 20 जण दंडार नृत्यासाठी सज्ज असतात. त्यातील एकास प्रमुख मानून त्याला घुसाडी ही उपमा देण्यात येते.

 दस-यापासून दिवाळीपर्यंत मोरपिसाचा टोप घातलेला समुदाय कोणी झगा, कोणी साडी, तर कोणी पंजाबी ड्रेस घालून आदिवासी समाजातील प्रमुख समजल्या जाणा-या महाजन यांच्या घरी दररोज सायंकाळी 8 ते 11

वाजेपर्यंत ढेमसा व तुडबुडी या वाद्यांवर ‘चच्चह चच्चह छा बाई छा बाई, वव्वारी वव्वारी वाह रे वाह’, असे म्हणत नृत्य सादर करतात. दिवाळीच्या दिवशी हा समुदाय गावात घरोघरी दंडार नृत्य सादर करून देणगी जमा करतात.

विशेष म्हणजे मोरपिसांचा टोप डोक्यात घातलेला समुदाय दस-यापासून ते दिवाळीपर्यंत आंघोळ करीत नाही व आपल्या घरीसुद्धा जात नाही.

किनवटसारख्या मागास क्षेत्रात आदिवासी समाज अजूनही आपली संस्कृती टिकवून आहेत. दस-यापासून दिवाळीपर्यंत चालणारे दंडार नृत्य हा त्या परंपरेचाच एक भाग आहे.

आदिवासी संस्कृती संवर्धनाबरोबर समाज जोडणाऱ्या दंडार या लोकनृत्याची लोकप्रियता माहिती तंत्रज्ञान युगात आजही टिकून आहे.

कामधंदा, नोकरी किंवा शिक्षणासाठी शहरी संस्कृतीत वाढणाऱ्या आदिवासी समाज बांधवांना गाव-खेड्यातील आपली संस्कृती दिवाळीनिमित्त गावात आल्यावर दंडार या लोकनृत्याच्या माध्यमातून पहावयास मिळते.

गाण्याच्या बोलावर व वाद्याच्या ठेक्यावर चाल धरून कलावंत टिपरी नृत्य, समूहनृत्य, घुसाडीनृत्य सादर करतात. या नृत्याचे खास आकर्षण हे घुसाडी असते. तो मानवी चेहरा कोरलेला लाकडी टोप किंवा मोरपंखापासून बनविलेला मुकुट परिधान केलेला असतो. घर अंगणात येताच महिला वर्ग घुसाडीचे औक्षण करून सोपस्कार उरकून घेतात. विशेष म्हणजे, गोंडी बोलीभाषेत संवाद साधून समाजप्रबोधनाचे छोटे मोठे किस्से सादर केले जातात. तसेच नृत्य साजरे केले जाते.

दिवाळीनंतर समारोप करताना गोळा झालेल्या मिळकतीतून गावात स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात येतो.

No comments:

Post a Comment

Pages