औरंगाबाद :
कालपासून आकाशात दिवाळीनिमित्त फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळत असतानाच, आज आकाशात सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळणार आहे. मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. औरंगाबाद येथून सायंकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी वाजता सूर्यग्रहणास स्पर्श होईल, अशी माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.
या विषयी बोलताना श्रीनिवास औंधकर म्हणाले की, आश्विन अमावास्या मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. ते भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून पहायला मिळणार आहे. औरंगाबाद येथून सायंकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी वाजता सूर्यग्रहणास स्पर्श होईल.
ग्रहण मध्य सायंकाळी 5 वाजून 42 मिनिटांनी होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36 टक्के भाग झाकून टाकील. पश्चिम आकाशात सूर्यास्तावेळी हे सुंदर दृश्य पाहता येईल. नंतर ग्रहण सुटण्याआधीच सायंकाळी 6 वाजून 09 मिनिटांनी सूर्यास्त होईल. ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसणार आहे.
No comments:
Post a Comment