आदर्श कॉलेज बदलापूर येथे महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे ३८ अधिवेशन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 26 October 2022

आदर्श कॉलेज बदलापूर येथे महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे ३८ अधिवेशन

कल्याण :

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे ३८ वे अधिवेशन दि. ८ ते १० डिसेंबर या कालावधीत आदर्श कॉलेज बदलापूर  येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाची मध्यवर्ती संकल्पना 'स्वातंत्र्याची ७५ वर्षे : स्थित्यंतरे' ही आहे. या अधिवेशनात दोन परिसंवाद होतील. पहिला परिसंवाद 'बहुसांस्कृतिकवाद' व दुसरा परिसंवाद 'नवीन शैक्षणिक धोरण : मूल्यशिक्षण आणि तत्त्वज्ञानाची प्रासंगिकता' या विषयावर होणार आहेत.  


अधिवेशनाच्या संमेलन  अध्यक्षपदी  मुंबई विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाच्या प्राध्यापिका तथा ज्येष्ठ तत्त्वचिंतक डॉ. मीनल कातरणीकर या आहेत.  उद्घाटक  म्हणून  आय.सी.पी.आर. दिल्ली चे सेक्रेटरी डॉ. सच्चिदानंद मिश्रा, तर  प्रमुख पाहुणे  म्हणून प्राचार्य डॉ. अजय भामरे, प्र-कुलगुरू मुंबई विद्यापीठ, मुंबई व डॉ. सुधीर पुराणिक, रजिस्टर, मुंबई विद्यापीठ, मुंबई हे उपस्थित राहणार आहेत.


अधिवेशनादरम्यान दोन व्याख्याने आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिले व्याख्यान ग्रीस देशातील इन्निनो विद्यापीठचे प्राध्यापक डॉ. पॅनाॅस इलिओपाऊलोस याचे असेल. तर दुसरे व्याख्यान प्रा. अनुराधा भोसले याचे असणार आहे. 


तसेच या अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांकरीता  विद्यार्थी निबंध सादरीकरण स्पर्धा  ठेवण्यात आली आहे. सदर स्पर्धेचे विषय, "१) व्यक्तिमत्व जडणघडणीत वाचन संस्कृतीचे महत्त्व २) पर्यावरण संवर्धनातील माझी भूमिका ३)आजची समाज माध्यमे निपक्ष आहेत का?" हे आहेत. या शिवाय अधिवेशनात विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा देखील असेल. या स्पर्धेचे विषय "१) ऑनलाईन शिक्षण फायदे आणि तोटे २) कोरोनाने मानवाला काय शिकवले ३) भारताने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात काय कमावले व काय गमावले." हे आहेत. तसेच सर्व वयोगटातील अभयसकांसाठी स्वातंत्र्य लढ्यातील संतांचे योगदान  या विषयावर खुली निबंध स्पर्धा देखील या अधिवेशनात आयोजित करण्यात आली आहे. 


या अधिवेशनासाठी विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक आणि तत्त्वज्ञान प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन अधिवेशनाचे आयोजक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता पांडे, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुनीलदत्त गवरे कार्याध्यक्ष डॉ. अमन बगाडे, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच स्थानिक सचिव डॉ. संदीप भेले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages